इंग्लंडच्या राणीचा सिंधी शेजारी तिच्यापेक्षा डबल श्रीमंत आहे

कोहिनुर सारखा हिरा आपल्या मुकुटात ठेवणारं इंग्लंडचं राजघराणं. भारतासकट निम्म्या जगावर इंग्लंडची व्हिक्टोरिया राणी राज्य करायची. असं म्हणतात की तिच्या साम्राज्यावर सूर्य मावळायचा नाही. तिची पणती म्हणजे सध्याची राणी एलिझाबेथ. आजही जवळपास इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा सकट १६ देशांची ती साम्राज्ञी आहे.

अशा या क्विन एलिझाबेथच्या आलिशान राजवाड्याच्या शेजारी घर आहे एका भारतीय कुटूंबाचं. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते इंग्लंडच्या राणीपेक्षाही श्रीमंत आहेत.

ते आहेत हिंदुजा बंधू. एकूण चार जण आहेत. श्री हिंदुजा, गोपी हिंदुजा, प्रकाश हिंदुजा आणि अशोक हिंदुजा. 

त्यांच्या यशाची कहाणी सुरु होते शंभर वर्षांपूर्वी या हिंदुजांच्या पप्पांपासून, परमानंद हिंदुजा. अस्सल बनिया सिंधी माणूस. असं म्हणतात की सिंध मधल्या शिकारपूर इथे त्याच किराणा मालाचं दुकान होतं. तिथला माल खरेदी करायच्या निमित्ताने मुंबईला आला. चौकस बुद्धी, धाडस करण्याची खुमखुमी यातून पर्शिया म्हणजे आजचे इराण इथे जाऊन पोहचला.

मुंबईतून इराणला जाणाऱ्या कापड, व इतर वस्तुंच्या आयात निर्यात व्यापारात त्यांनी जम बसवला.

१९१९ सालापर्यंत भारत आणि इराण दरम्यानच्या व्यापारात परमानंद हिंदुजा हे मोठं नाव झालं. हीच हिंदुजा ग्रुप या साम्राज्याची सुरवात होती. इराण मार्फत इतर अनेक आखाती देशांमध्ये त्यांनी हात पाय पसरण्यास सुरवात केली.

परमानंद याना एकूण पाच मुले होती त्यातील मोठा गिरिधरचंद हा लवकर वारला. त्यांचा दुसरा मुलगा श्रीचंद हा लवकर धंद्यात आला. तो वडिलांच्याही एक पाऊल पुढे होता. त्याने १९६४ साली राज कपूरच्या संगम या सिनेमाचे ओव्हरसीज डिस्ट्रिब्युशनचे राईट्स मिळवले. आखाती देशांमध्ये त्याने हा सिनेमा रिलीज केला आणि त्यात तुफान पैसे कमवला.

असं म्हणतात कि संगम बनवणाऱ्या राज कपूरना फायदा झाला नसेल तेवढा हिंदुजांना झाला.

हे श्रीचंद हिंदुजा यांच्या सक्सेसफुल करियरचं पहिलं पाऊल होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या भावांच्या मदतीने हिंदुजा ग्रुपचा व्यवसाय अनेक पटीने वाढवला.

साधारण १९७९ सालापर्यंत हिंदुजा ग्रुपचे हेडक्वार्टर इराण हेच होते. मात्र त्या वर्षी तिथे राज्यक्रांती झाली, तेहरान मधून तिथल्या राजाला पदच्युत करण्यात आलं. कट्टरतावाद्यांच्या हातात सत्ता गेली होती. त्या धामधुमीत अनेक भारतीय व परदेशी कुटूंबानी इराण मधून आपले बस्तान हलवले. यात हिंदुजा देखील होते.

त्यांनी या संकटालाच एक नवी संधी समजली आणि इराणच्या ऐवजी इंग्लंड ही आपली कर्मभूमी बनवली.

ते व त्यांच्या पाठचा भाऊ गोपीचंद हे लंडनमध्ये आपल्या हेडक्वार्टरमधून व्यवसाय सांभाळायचे तर तीन नंबरचा भाऊ स्वित्झर्लंड येथे तर सगळ्यात धाकटा अशोक भारतातील व्यवहार हाताळायचे. युरोपमध्ये गेल्यावर त्यांनी हिंदुजा ग्रुपचे पंख आणखी मोठे केले.

१९८४ मध्ये त्यांनी गल्फ ऑइल आणि १९८७ मध्ये अशोक लेलँड यांच्यामार्फत भारतात गुंतवणूक केली. हा व्यवहार मोठा फायदेशीर ठरला.

पुढे काही वर्षांनी अशोक लेलँड कंपनीची मालकीचं त्यांच्याकडे गेली. आजही हा हिंदुजा ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी समजली जाते. ट्र्क बनवण्यापासून संरक्षण साहित्य बनवण्यापर्यंत अशोक लेलँडचा दबदबा राहिलेला आहे.

साधारण नव्वदच्या दशकात त्यांचं जागतिक पातळीवर मोठं नाव झालं. इंग्लंडच्या सर्वात मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जात होत. सिंधी डोकं आणि उद्द्यमशील वृत्ती त्यांच्या उत्तरोउत्तर प्रगतीसाठी कारणीभूत ठरली. इतकं असूनही या भावाभावांमधील प्रेमाचे सर्वत्र दाखले दिले जायचे.

त्यांचा साधेपणा, कितीही श्रीमंती आली तरी सर्व व्यसनापासून लांब अंतर राखणे, शाकाहारी जेवण याबद्दल जगभरात कौतुक केलं जायचं.

एक सारखे दिसणारे, एक सारखा पोशाख करणारे, एकाच घरात राहणारे चारही भाऊ भारतीय एकत्र कुटूंबाचा प्रतीक मानले गेले.

रियल इस्टेट कंपनी पासून ते तेल कंपनी, डिफेन्स सेक्टर पासून ते टेलिकॉम सेक्टर, आयटी कंपनी पासून बँका सगळ्यात हिंदुजा जाऊन घुसले. आपल्या कठोर मेहनतीने त्यांनी हे सर्व व्यापार यशस्वी देखील करून दाखवले. हिंदुजा हॉस्पिटल सारखे चॅरिटी कार्य देखील एका बाजूने सुरूच होते.

 त्यांचा राजकीय प्रभाव देखील वाढत गेला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून ते इंग्लंडच्या राणीपर्यंत सर्वत्रत्यांचं मोठं वजन निर्माण झालं.

मात्र याच राजकीय हितसंबंधातून काही वादांमध्ये देखील त्यांचं नाव जोडलं गेलं. राजीव गांधी यांच्या बोफोर्स घोटाळ्यामध्ये हिंदुजा बंधूंचा हात आहे असा आरोप केला गेला. २००१ साली जेव्हा त्यांनी इंग्लडच्या नागरिकत्वसाठी प्रयत्न केले तेव्हा वशिले बाजी केली म्हणून तेव्हाच्या इंग्लंडच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला होता.

पण प्रत्येक वेळी वाईटच गोष्टींमुळे नाही तर चांगल्या गोष्टींसाठी देखील त्यांचं नाव चर्चेत आलं.

जेव्हा १९९८ साली अणुचाचणी मुळे भारतावर इंग्लंडने निर्बंध लादलेले तेव्हा भारताच्या बाजूने लॉबीयिंग करण्यासाठी अटलजींनी एस.पी.हिंदुजा यांनाच जबाबदारी दिलेली. त्यात ते यशस्वी देखील झाले.

२००० च्या दशकापासून इंग्लंडच्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचा पहिला दुसरा क्रमांक कायम असायचा. हजारो कोटी पौंड इतकी त्यांची संपत्ती झाली. त्यांच्या श्रीमंतीबद्दल सांगायचं झालं तर लोक आपले पैसे ठेवण्यासाठी स्विस बँकेकडे जातात यांनी सरळ एक स्विस बँक खरेदी केली आणि तिला हिंदुजा हे नाव दिलं. आता बोला.

इतकंच नाही तर इंग्लडच्या राणीच्या बकिंगहॅम पॅलेस जवळ त्यांनी एक मोठा महाल देखील खरेदी केला.

सतराव्या शतकात बांधलेल्या या कार्लटन हाऊसमध्ये कधी काळी इंग्लंडचे राजकुमार राहायचे. आजच्या दरात विचार करायचा झाला तर साधारण तीन हजार कोटी रुपयांचा हा महाल आहे.

असं सांगितलं जातं कि एलिझाबेथ राणी तर्फे या हिंदुजा बंधूना शेजार धर्म म्हणून कधी डिनरला बोलावलं तर हे भाऊ आपल्या घरातून शुद्ध शाकाहारी डब्बा बांधून घेऊन जातात.

आपण अंबानींच्या पोराच्या लग्नात बच्चन शाहरुख जेवण वाढत होते म्हणून टीका करतो तर या हिंदुजांच्या पोरांच्या लग्नाला उदयपूर येथे हॉलिवूड मधून जेनिफर लोपेझ सारखे सुपरस्टार आले होते म्हणजे विचार करा.

पण गेले काही दिवस झाले या भावांच्यातही संपत्तीवरून भांडणे सुरु झाली आहेत. एवढी वर्ष एका स्वयंपाकघरात जेवण बनवून खाणारे हिंदुजा बंधू टिपिकल भारतीय एकत्र कुटूंबाप्रमाणे वाटण्यांसाठी झगडू लागली आहेत.

बाकी काही का असेना भारतावर राज्य करणाऱ्या, गुलाम म्हणून आपली हेटाळणी करणाऱ्या खाष्ट इंग्रजांच्या, आपला चोरलेला कोहिनुर मुकुटात ठेवणाऱ्या राणीच्या नाकावर टिच्चून त्यांनी तिथला सर्वात श्रीमंत हे बिरुद मिळवलंय आणि गेली कित्येक वर्षे टिकवून देखील धरलंय हे विशेष.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.