खरंच आंध्रप्रदेशच्या खासगी रुग्णालयात कोरोना बाधितांवर मोफत उपचार होत आहेत का?

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी. सध्याच्या राजकारणातील सर्वात करिष्माई व्यक्तिमत्व. वडिलांच्या मृत्यूनंतर अगदी कमी वयात त्यांनी राजकारणात एंट्री घेतली. काँग्रेस बरोबर पंगा घेत स्वतःचा नवीन पक्ष स्थापन केला. जेलमध्ये जाऊन आले. पण जोरदार लढा देत मुख्यमंत्री बनले.

मोदी लाटेत देखील चंद्रबाबू नायडू सारख्या नेत्याला धोबीपछाड देत १७१ जागेपैकी १५१ जागेवर विजय मिळवणारे जगनमोहन रेड्डी यांची जादू अजूनही राष्ट्रीय राजकारणातल्या कित्येकांना समजत नाही. देशभरातल्या प्रादेशिक पक्षांमध्ये सर्वात वजन असणारा पक्ष म्हणून रेड्डी यांच्याकडे पाहिलं जातं .

त्यांची मुख्यमंत्रीपदाची आजवरची कारकीर्द देखील धडाकेबाज राहिली आहे. विशेषतः कोरोना काळात त्यांनी केलेलं कार्य संपूर्ण देशात आदर्श मानता येईल असं आहे. जेव्हा महाराष्ट्रासारख्या इतर राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुडवडा जाणवत होता तेव्हा आंध्रने त्यांना सढळ हाताने मदत केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मागणीला साथ देत जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला नुकतेच ३०० व्हेंटिलेटर दिले.

म्हणूनच फक्त आंध्र प्रदेश नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जगनमोहन रेड्डी यांचा चेहरा ओळखीचा आणि लाडका बनला आहे.

अशातच गेल्या काही दिवसात एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यात जगनमोहन रेड्डी यांनी राज्यातील सर्व खासगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णावर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा केली असल्याचं दिसंत होतं.

भारतात अशा प्रकारे कोरोनाच्या रुग्णावर खासगी रुगणालयात मोफत उपचार करणारे आंध्रप्रदेश एकमेव राज्य बनले असल्याचा दावा सोशल मिडीयावर करण्यात आला.

संपूर्ण देशभरात हा व्हिडीओ फेमस झाला.

 

जगनमोहन रेड्डी हेच खरे हिरो असल्याचे सांगून सोशल मिडीयावर त्यांचे फोटो तो व्हिडीओ शेअर करण्यात आला. कित्येकांच्या स्टेटसवर जगनमोहन रेड्डी दिसत होते. त्यांच्यावर कौतुक सोहळ्याचा वर्षाव होत होता आणि अचानक कोणी तरी प्रश्न उभा केला की खरंच अशी मदत आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केलीय का?

अनेकजण म्हणत होते कि स्वतः व्हिडिओमध्ये जगनमोहन रेड्डी सांगतोय म्हणजे ती बातमी खरीच असली पाहिजे. 

फॅक्ट चेकचा अभ्यास केल्यावर हे लक्षात आलं की हा संपूर्ण दावा खोटा आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी कोरोना काळात जनतेसाठी चांगलं काम करत आहेत मात्र त्यांच्याकडून खासगी रुग्णालयात कोरोना बाधितांवर मोफत उपचार करण्यात येईल अशा प्रकारची कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.

खाजगी रुग्णालयात भ्रष्टाचाराची शक्यता असल्यामुळे तिथे सरकारच्या वतीने मोफत उपचार दिले जात नाहीत. गोरगरिबांसाठी सरकारी रुग्णलयात सर्व उपचार मोफत पुरवले जातील याची खात्री सरकारच्या वतीने दिली जात आहे. 

या शिवाय जर खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णाकडून उपचारासाठी अधिकची  रक्कम घेण्यात येत असल्याचा आरोप झाल्यानंतर आंध्रप्रदेश सरकारने कोरोना उपचारा संदर्भात दरपत्रक ठरवून दिले आहेत. मात्र हे सगळं असलं तरी कोरोनाचे उपचार खाजगी रुग्णालयात देखील मोफत केले जातील याची माहिती कुठे मिळत नाही.

https://www.facebook.com/watch?ref=search&v=1015733549232949&external_log_id=11367d40-a815-41b0-abcd-6aaa7e9a3973&q=%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8%20%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80

 

आंध्र सरकारच्या वतीने कोरोनाची  सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णासाठी खासगी रुग्णालयांनी ४ हजार रुपये शुल्क घ्यावे. ऑक्सिजन बेडसाठी ६ हजार ५०० रुपये, आयसीयू बेडसाठी १२ ते १ हजार आणि व्हेंटिलेटरसाठी  १६ हजार अशी रक्कम अशी ठरवून दिली आहे. त्यापेक्षा अधिक पैसे घेणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सर्व खासगी रुग्णालयांना उपचाराचे दरपत्र लावण्याचे आदेश दिले आहे. जर रुग्णालयांनी अधिक पैसे घेतले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत जगनमोहन रेड्डी यांनी दिले.

मग हा प्रश्न उरतो की तो व्हिडीओ कुठून आला. अनेकांचं म्हणणं आहे की सदरचा व्हिडीओ जुना आहे आणि तो चुकीच्या पद्धतीने एडिट व कट केल्या असल्यामुळे ही अफवा पसरत आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.