कोरोना लढ्यात मुंबई की केरळ कोणतं मॉडेल बेस्ट आहे. वाचा आणि समजून घ्या

देशात एका बाजूला कोरोना वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची परिस्थिती हाताळण्यात सातत्यानं अपयशी ठरल्याची टीका होतं आहे. त्यावरून सोशल मीडियामधून मागच्या काही दिवसात त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. तर दुसऱ्या बाजूला काल पासून या लढ्याची जबाबदारी नितीन गडकरींकडे द्यावी अशी मागणी सुरु आहे.

मात्र अशा सगळ्या नकारात्मक वातावरणात सध्या कोरोनाच्या लढाईतील २ ठिकाणच्या मॉडेलची चर्चा चांगलीच सुरु आहे. यातील एका ठिकाणच्या मॉडेलवर खुद्द सर्वोच्च न्यायालयानं शिक्का मारला आहे. तर दुसऱ्या मॉडेलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देशातील विविध ठिकाणी कौतुकाचा वर्षाव होतं असतो. मग यात कधी ऑक्सिजनच्या सप्लायसाठी, तर कधी लसीकरणाच्या कामगिरीच्या बाबतीत.

हे २ मॉडेल म्हणजे पहिलं मुंबईच आणि दुसरं केरळचं. 

यातील मुंबईच्या मॉडेलवर खुद्द सर्वोच्च न्यायालयानं खुश होऊन कौतुक केलं होतं

तर केरळच्या मॉडेलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मार्क्सवादी पक्षाच्या प्रकाश करात यांनी कौतुकांचा वर्षाव केला होता. यात मग ऑक्सिजन असो कि लस सगळ्याच पातळ्यांवर कोरोनाच्या लढाईत आशेचा किरण दिसत असलेल्या दोन्ही मॉडेलबद्दल बोललं जात आहे.

पण नेमकी काय आहेत ही दोन्ही मॉडेल?

मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण सातत्यानं घटतं आहेत. रोज बाधित रुग्णांपेक्षा उपचारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच ऑक्सिजनच्या बाबतीत देखील टंचाई जाणवताना दिसत नाही, त्यामुळे याच मॅनेजमेंट दिल्ली आणि इतर राज्यांनी शिकावं असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. तर लसीकरणाच्या बाबतीत देखील मुंबई महाराष्ट्रात नंबर १ वर आहे.

यात टप्प्या-टप्प्याने मुंबईने कसं काम केलं आहे ते आधी पाहू.

कोरोना रुग्णांवर उपचार – 

पहिल्यांदा महानगर पालिकेने २४ वार्डात असलेल्या वॉर रूम आणि जम्बो कोविड केंद्राकरिता नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली. हे नोडल अधिकारी २ शिफ्टमध्ये म्हणजेच दुपारी ३ ते रात्री ११ त्यानंतर रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत काम करतात.

त्यानंतर वॉर्ड वॉर रूम्सचे नोडल अधिकारी जंबो फिल्ड हॉस्पिटल आणि वॉर रूम एकमेकांशी सतत संपर्कात असतात, जेणेकरून रूग्णांना त्यांच्या स्थितीनुसार बेडचे वाटप करणं सहज शक्य होईल. आणि मुख्य म्हणजे हि सगळी प्रक्रिया त्वरेनं करणं बंधनकारक आहे.

हे झालं जे पॉजिटीव्ह आहेत त्यांच्यासाठी. पण जे संशयित आहेत यात मग ज्यांचा अहवाल आलेला नाही, किंवा अद्याप ज्यांची चाचणी झालेली नाही अशांसाठी जंबो फील्ड हॉस्पिटलमध्ये बेड्स वाटप करण्यात येते. या या जम्बो हॉस्पिटलमध्ये येताच त्यांना बेडच्या संशयास्पद वार्डात ठेवण्यात येते.

एप्रिल पर्यंत प्रशासनानं १२ हजारापासून २२ हजार बेड वाढवले. तसेच आयसीयू बेड १५०० वरून २८०० पर्यंत नेले. याशिवाय मुंबईच्या २४ वॉर्डांमध्ये ७०० डॉक्टर्सची टीम ३ शिफ्टमध्ये काम करत आहेत, सोबतच लक्षण असणाऱ्या रुग्णांसाठी २४० मेडिकल टीम, २४० एम्ब्युलन्स तैनात केल्या.

अहवालाच्या बाबतीत पालिकेकडून सर्व प्रयोगशाळांना २४ तासाच्या आत अहवाल देणं बंधनकारक केलं आहे. जे पॉजिटीव्ह असतील त्यांची यादी सकाळी ६ वाजता पालिकेला सादर केली जाते. ज्यामुळे सर्व रुग्णांची सकाळी ८ वाजल्यापासून वॉर्ड वॉर रूम्सकडून फोन केला जाऊन उपचार सुरु करण्यात येतात.

ऑक्सिजन :

मुंबईत साधारण पणे १२ ते १३ हजार ऑक्सिजन बेड आहेत. यातील बहुतांश बेड हे आधी ऑक्सिजन सिलेंडरवर होते. मार्चमध्ये पालिकेनं एक कॅम्पेन लॉन्च करून सिलेंडरच्या जागी पाईपद्वारे ऑक्सिजनच्या पुरवठा करण्याचं नियोजन केलं आणि यातील बेड पाईपबेस ऑक्सिजनवर आणले.

सोबतच एका खाजगी कंपनीसोबत करार करून रोजच्या ५० मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था केली.

महापालिकेनं यासोबत ऑक्सिजन नर्सना तैनात केलं. रुग्णांच्या ऑक्सिजन पातळीवर नियंत्रण ठेवणं, म्हणजेच ९६ वर ठेवणं. मार्च मध्ये प्रति रुग्ण ऑक्सिजन ६ कि.ग्रॅ. पर्यंत पोहोचला होता, तोच आता एप्रिलमध्ये ४.२ कि. ग्रॅ. पर्यंत आला आहे.

खाजगी हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन राखून ठेवणं. 

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी सांगतात, आपण उद्यासाठी पाण्याचं नियोजन करून ठेवतो, कमी पडणार असेल तर साठवून ठेवतो, आणि लोकांना पाण्याच्या संदर्भातून अलर्ट करतो. पालिकेनं खाजगी हॉस्पिटल्सच्या बाबतीत तेच काम केलं, इथं आपल्या पुरवठयापैकी २० टक्के ऑक्सिजन राखून ठेवला, आणि हे पण सांगितलं कि कमी पडला तर आम्ही आहे.

लस

मुंबईत महाराष्ट्रातील सर्वाधिक लसीकरण झालं आहे. यात लोकसंख्या जास्त असल्यामुळे हे प्रमाण साहजिक आहे. पण यात महानगरपालिकेच्या नियोजनाचा पण मोठा वाटा आहे. यात सरकारी आणि खाजगी लसीकरण केंद्राचा समावेश तर आहेच. पण महानगपालिकेचे सूक्ष्म नियोजन सांगायचे तर एकच उदाहरण पुरेसं होईल.

अपंग आणि वृद्ध माणसांना लस घ्यायला त्रास होऊ नये, रांगेत उभं राहायला लागू नये यासाठी देशातील पाहिलं पार्किंग लसीकरण केंद्र नुकतच सुरु करण्यात आलं. यात अगदी गाडीत बसूनच येणाऱ्यांना लस दिली जाते. अशा नियोजांमुळेच ६ मे अखेर २० लाख नागरिकांनी पहिला आणि ६ लाख नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. हे प्रमाण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक आहे.

डिस्चार्ज रुग्णांची स्थिती – 

या सगळ्या प्रयत्नांमुळे आपण मागच्या ६ दिवसातील स्थिती बघितली तर मुंबईत दररोजच्या पॉजिटीव्ह पेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णाचं प्रमाण जास्त आहे.

  • ६ मे : बाधित – ३०५६, बरे झालेले – ३८३८
  • ५ मे : बाधित – ३८७९, बरे झालेले – ३६८६
  • ४ मे : बाधित  – २५५४, बरे झालेले – ५२४०
  • ३ मे :बाधित – २६६२, बरे झालेले – ५७४६
  • २ मे : बाधित  – ३६७२, बरे झालेले – ५५४२
  • १ मे : बाधित – ३९०८, बरे झालेले – ५९००

केरळ

केरळमध्ये पण कोरोनाचे रुग्ण आहेत. अगदी महाराष्ट्राच्या खालोखाल आहेत. सध्या तिथं लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आलं आहे. काल तर जवळपास ४१ हजार जण बाधित सापडले. पण तरीही केरळ मॉडेलच कौतुक होतं आहे. असं काय आहे नेमकं?

तर केरळ कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. मोहम्मद अशील एका हिंदी माध्यमाशी बोलताना सांगतात,

आम्ही सुरुवातीच्या टप्प्यातच रुग्णाची ओळख पटवतो, आणि उपचार सुरु करतो. त्यामुळे रुग्णाला ऑक्सिजन लावण्याची गरज पडत नाही. हे रुग्ण ओळखण्यासाठी आम्ही आशा सेविका आणि स्थानिक लोकप्रतिनीधींची मदत घेतो. हे काय करतात, तर वॉर्ड किंवा आपल्या भागातील कोणालाही ताप आला असेल किंवा लक्षण दिसत असतील तर त्यांची थेट कोरोना चाचणी केली जाते. त्यानंतर त्याला अनुसरुन लगेच उपचार सुरु केले जातात.

जर थेट कोणी टेस्ट केली असेल आणि तो रुग्ण पॉसिटीव्ह आला असले तर प्रशासनाकडून या आशा सेविका, तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्र यांना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना कळवलं जातं. ते बाकीच्या संपर्कातील रुग्णांना तात्काळ विलगीकरणात ठेवतात.

याशिवाय एर्नाकुलमध्ये एक केंद्रीकृत वॉररूम कार्यरत आहे. यात ५० स्वयंसेवक २ शिफ्टमध्ये २४ तास काम करून व्यवस्थापन करणं आणि सतत राज्यातील बेड, ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर्स याची आकडेवारी अपडेट करणं हे काम करत असतात.

तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी त्या त्या भागासाठी वॉर रुम काम करतात. यात रुग्णाची स्थिती बघून त्याला पुढे तालुक्याला न्यायचे, जिल्ह्याला न्यायचे कि इतरत्र मोठ्या हॉस्पिटल्समध्ये हे ठरवलं जात. त्यानुसार त्या – त्या वॉर रूमला कळवून पुढची व्यवस्था केली जाते.

ऑक्सिजन :

ऑक्सिजनच्या बाबतीत देखील केरळ स्वयंपूर्ण आहे. २१ एप्रिलच्या आकडेवारीनुसार केरळच्या हॉस्पिटल्सचा रोजचा ऑक्सिजनचा वापर १०० टन होता. तर राज्याची एकूण उत्पादन क्षमता २०४ मेट्रिक टन आहे. त्यामुळे अगदी आता पर्यंत इतर राज्यांना पुरवठा देखील केला जात होता.

या बद्दल आपण सविस्तर यापूर्वीच लिहिलं आहे, इथं क्लिक करून आपण वाचू शकता. 

तर आता रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केरळनं केंद्राला आम्हाला भविष्यात ऑक्सिजन लागू शकतो, याबद्दल कल्पना देऊन ठेवली आहे.

लस : 

केंद्र सरकारने १ मे रोजी देशातील लसीकरणासंदर्भात आकडेवारी जाहीर केली होती. यात केरळने एकही लस वाया न घालवण्याची कामगिरी केली होती. उलट मिळालेल्या लसीपेक्षा अतिरिक्त नागरिकांचे लसीकरण केले होते.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ट्वीट करत माहिती दिली होती की,

केरळला भारत सरकारकडून लसीचे, ७३,३८,८०६ डोस मिळाले आहेत. आम्ही प्रत्येक कुपीतील उरलेले अतिरिक्त डोस वापरुन, ७४,२६,१६४ डोस दिले आहेत. आमचे आरोग्य कर्मचारी, विशेषत: परिचारिका खूप प्रभावी आहेत आणि कौतुक करण्यास पात्र आहेत.

केरळच्या मुख्यमंत्र्यांचे लसीवरील ट्वीट पुन्हा रीट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,

हे लक्षात घेणे चांगले आहे की आमच्या आरोग्य कर्मचारी आणि परिचारिकांनी लस वाया जाण्यापासून वाचवत एक उदाहरण ठेवले आहे. कोविड -१९ विरूद्ध लढा मजबूत करण्यासाठी लस वाया जाण्यापासून वाचवणे महत्वाचे आहे

या सगळ्या गोष्टींमुळेच देशात मुंबई आणि केरळ मॉडेलच कौतुक झालं. सध्या केरळमध्ये मुंबई एवढा रुग्ण बरा होण्याची आकडेवारी वाढलेली नाही. काल तिथं जवळपास ४२ हजार ४६४ रुग्ण पॉजिटीव्ह आले होते तर २४ हजार १२५ जणांना डिस्चार्ज दिला होता. पण गतवर्षी सारखाच कोरोनावर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी केरळने कंबर कसली आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.