शिवसेनेने दिलेल्या शब्दामुळे झहीर खानचं करियर वाचलं होतं.

झहीर खान हा एकमेव खेळाडू असावा ज्याचे सर्वात कमी हेटर असतील. वर्ल्डकपच्या वेळी त्याने केलेली धारदार गोलंदाजी असो किंवा त्याने टेस्ट मध्ये बॉलिंगची केलेली दहशत असो सगळ्या गोष्टींमध्ये झहीर खान अग्रेसर होता. भारतीय संघाच्या मुख्य गोलंदाज म्हणून तो कार्यरत असताना युवा खेळाडूंना मार्गदर्शन सुद्धा तो करत असे.

अहमदनगरच्या श्रीरामपूर मधून आलेला झहीर खान मराठमोळा खेळाडू होता क्रिकेटप्रती असलेलं त्याच वेड त्याला मुंबईत घेऊन आलं आणि मुंबईतून तो थेट भारताच्या संघात निवडला गेला पण याच्या मागे अजून एक बॅकस्टोरी आहे.

पण आजचा किस्सा जरा वेगळा आहे. शिवसेना आणि क्रिकेट हे एक वेगळं समीकरण आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं क्रिकेट प्रेम सर्वश्रुत होतं. जावेद मियाँदादला जागेवर खडसावणारे बाळासाहेब किती कट्टर देशप्रेमी होते याचा प्रत्यय आपल्याला येतो.

१९९२ च्या सुमारास झहीर खान क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी श्रीरामपूरहून मुंबईत राहायला आला होता, त्यावेळी त्याच वय १२ वर्ष होतं. याच काळात बाबरी मस्जिद प्रकरण घडलं आणि धार्मिक दंगली मुंबईत उसळू लागल्या. या धार्मिक दंगलीची व्याप्ती इतकी विकृत होती कि निष्पाप लोकांनाही यात प्राण गमवावे लागले.

या प्रकरणातून मुंबई हळूहळू सावरू लागली होती, लोकांनी धार्मिक गोष्टी फाट्यावर मारून एकमेंकाना मदतीचा हात देऊ लागली होती. झहीर खानच्या मनात मात्र या गोष्टीची प्रचंड भीती बसली होती. मुंबई पूर्ववत होण्याच्या मार्गावर वाटचाल करत होती.

क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी आलेला झहीर खान या धार्मिक दंगलींमुळे हादरून गेला होता. या भीतीपोटी झहीर खानने मुंबई सोडण्याचा निर्धार केला. उरलेलं क्रिकेटचं भविष्य श्रीरामपुरात पाहू म्हणत त्याने मुंबईला रामराम ठोकण्याचा निश्चय पक्का केला होता.

विद्याधर पराडकर हे झहीर खानचे प्रशिक्षक होते. मुंबईत गोलंदाजीची धडे विद्याधर पराडकरांकडून झहीर खान गिरवत होता.

झहीरचा निश्चय जर खरंच त्यावेळी पूर्ण झाला असता तर त्याने क्रिकेट खेळण्याची रंगवलेली सगळी स्वप्ने धुळीस मिळाली असती. अशावेळी विद्याधर पराडकरांनी झहीरच्या मनातील घालमेल ओळखली. क्रिकेट क्लबमध्ये पराडकर प्रशिक्षक म्हणून काम बघायचे.

विद्याधर पराडकर हे मुंबईत प्रसिद्ध कोच असल्याने त्यांची ओळख बरीच होती. राजकीय पक्षांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांना सगळीकडे आदराने आणि मानाने बोलावलं जायचं. 

१९९२ च्या बाबरी घटनेनं शिवसेनेने वादळ निर्माण केलं होतं. मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला झाला होता. शिवसेनेचं मुंबईतील वजन बघून पराडकर सरांनी झहीर खानला सोबतीला घेऊन थेट शिवसेनेची शाखा गाठली.

शाखेच्या स्थानिक नेत्याची गाठ घेऊन पराडकरांनी त्या नेत्याला सांगितलं की,

हा झहीर खान माझा शिष्य असून, उत्तम गोलंदाज आहे पण सध्या घडलेल्या प्रकरणामुळे त्याला मुंबईत राहण्याची भीती वाटत आहे.

इतका मोठा माणूस शिवसेनेच्या शाखेत आल्याने शिवसेना नेत्यांनी पराडकर सरांना शब्द दिला कि,

झहीर खानची सगळी काळजी आम्ही घेऊ, त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही, तुम्ही निश्चिन्त राहा.

शिवसेनेने दिलेल्या शब्दामुळे झहीर खानने माघारी फिरण्याचा निर्णय बदलला आणि तो पुन्हा मुंबईत राहू लागला. इथून मात्र त्याने मागे वळून बघितलं नाही. भारतीय संघातील त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने त्याने भारताला जिंकून दिले. २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. जागतिक स्तरावर सुद्धा झहीर खानने आपल्या बॉलिंगच्या स्विंगने दहशत निर्माण केली होती.

पाकिस्तानच्या दौऱ्यावर जेव्हा झहीर खानला विचारलं होतं कि शिवसेना आणि बाळासाहेबांकडून तुला काही त्रास झाला का ? त्यावेळी झहीर खान म्हणाला होता कि,

बाळासाहेब ठाकरे हे अतिशय चांगले नेते आहेत, ते मुस्लिमद्वेषी असल्याची हूल कुणीतरी उठवली आहे. त्यांनी उलट मला मदतच केली आहे.

बाळासाहेब ठाकरेंनी झहीर बद्दल बोलताना सांगितलं होतं कि,

भारताचा सच्चा मुसलमान कोण असेल तर तो झहीर खान आहे….!

शिवसेनेने दिलेल्या हमीमुळे भारताला झहीर खानसारखा कोहिनुर हिरा गवसला.

हे हि वाच भिडू :

1 Comment
  1. Sandeep Shirure says

    बोल भिडू आपल्या लेखामध्ये थोडं थोड खोटी माहिती आहे correction करा 1992 ला झहीर खान च वय 20 एवढं म्हणजे गडबड झाली असे करू नका आम्ही विश्वासानं वाचतो आपला लेख

Leave A Reply

Your email address will not be published.