एकता कपूर येण्याआधी सिरियलचा तो किंग होता, सलमानने त्याला म्युझिक डायरेक्टर केलं…

टीव्ही सिरीयल, रियालिटी शो यांची तुलना सिनेमांशी न केलेलीच बरी कारण एकवेळ सिनेमे मागे पडतील इतकं प्रेम लोकं टीव्ही सिरीयल आणि रियालिटी शो वर करतात. टीव्ही क्षेत्रातून सिनेमात गेलेले लोकं आणि सिनेमात डाळ शिजली नाही म्हणून टीव्ही शो करणारे लोकं असे दोन प्रकार पडतात. आजचा किस्सा असाच एका म्युझिक डिरेक्टरचा आहे.

हिमेश रेशमिया.

जय मातादी लेट्स रॉक, मुझे तेरे घर में रोटी चाहिए अशी अनेक हटके टॅगलाईन निर्माण करणारा हिमेश रेशमिया कोणाला माहिती नसेल ?

हिमेश रेशमियाचा एक काळ असा होता कि मोबाईलची हॅलोट्यून आणि रिंगटोन या दोन्ही हिमेश रेशमियाच्या गाण्याच्या असायच्या.

पण हिमेश रेशमियाचा सुरवातीचा काळ पूर्णतः वेगळा होता.

अगोदरच्या काळात हिमेश रेशमिया हा टीव्ही सिरियलची टायटल करत असायचा. झी टीव्ही या चॅनेलसाठी तो गाणी लिहिणे आणि त्या मालिका प्रोड्युस करणे अशी कामं करायचा. बरेच टायटल ट्रॅक हे हिट झाले होते. अंदाज, अहा, अमन, आशिकी, अमर प्रेम आणि जान या झी टीव्हीच्या मालिकांमध्ये त्याचा मोठा वाटा होता.  

वयाच्या १४ व्या वर्षी हिमेश रेशमियाने सलमान खानला साइन केलं होतं. १९९० च्या सुमारास हिमेशच्या वडिलांनी सलमान खानला घेऊन एक सिनेमा करायचं ठरवलं. त्या सिनेमाचं नाव होतं युवा. हा सिनेमा काही कारणास्तव तयार होऊ शकला नाही. पण त्यावेळी इतक्या कमी वयात हिमेश रेशमियाने बरीच गाणी संगीतबद्ध करून ठेवली होती.

सलमान खान जेव्हा हिमेशला भेटला तेव्हा त्याने ती कंपोज केलेली गाणी ऐकली. सलमानला हिमेशची गाणी प्रचंड आवडली होती आणि त्यावेळी त्याने हिमेशला वचन दिलं कि पुढे मी तुला नक्की काम देईल. पुढे हि गोष्ट मागे पडली आणि हिमेश रेशमिया पुन्हा सिरीयल लाईनमध्ये गुंतून गेला. म्हणजे आजच्या काळात जशी एकता कपूर टीव्ही सिरियल्सची क्वीन समजली जाते तसा हिमेश रेशमिया त्याकाळात टीव्ही सिरियल्सचा बादशहा होता. भरपूर पैसे तो टीव्ही सिरियलसमधून कमवत होता.

एके दिवशी सलमान खान अचानकपणे हिमेशला भेटला आणि त्याला सांगितलं कि तू कंपोज केलेल्या गाण्यांपैकी काही ट्यून्स मी वापरू इच्छितो जब प्यार किया तो डरना क्या या माझ्या नवीन सिनेमात. हिमेश रेशमियाने या संधीच सोनं केलं. १९९८ मध्ये हिमेश रेशमियाचं म्युझिक डिरेक्टर म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं. 

जब प्यार किया तो डरना क्या आणि तुम पर हमी हें अटके हि गाणी प्रचंड हिट झाली. पुढे बंधन, हॅलो ब्रदर हे सिनेमे सुद्धा सलमान खानने हिमेश रेशमियाकडून कंपोज करून घेतले. दुल्हन हम ले जायेंगे हा सिनेमा सोलो म्युझिक डिरेक्टर म्हणून हिमेशचा पहिलाच चित्रपट होता जो सलमान खानने प्रोड्युस केला होता. हमराज या सिनेमासाठी हिमेशने म्युझिक दिलं आणि त्या वर्षीचा बेस्ट म्युझिक डिरेक्टरचा अवॉर्ड हिमेश रेशमियाला मिळाला.

पण खऱ्या अर्थाने हिमेश रेशमिया हिट झाला तो तेरे नाम या सिनेमामुळे.

हा सिनेमा सलमान खानच्या कारकिर्दीतला सगळ्यात बेस्ट सिनेमा ठरवला गेला. त्याचबरोबर या सिनेमातली गाणी प्रचंड गाजली.

२००३ सालचा बेस्ट म्युझिक अल्बम म्हणून हिमेशला अतोनात प्रसिद्धी मिळाली. यानंतर हिमेशची गाडी सुसाट सुटली. तेरे नामच्या प्रसिध्दीने हिमेशला प्रचंड सिनेमांच्या ऑफर येऊ लागल्या.

२ वर्षात हिमेश रेशमियाने ३५ सिनेमांना म्युझिक दिलं होतं इतका तो पॉप्युलर झाला होता. मग त्याने गायन क्षेत्रातही हात अजमावू पाहिले आणि तिथेही तो हिट झाला. आशिक बनाया आपने… या म्युझिक अल्बमने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला. मोठ्या प्रमाणावर कॅसेट विक्री झाली. फिल्मफेअर, आयफा, झी सिने अवॉर्ड अशा सगळ्या अवॉर्डचा मानकरी हिमेश रेशमिया ठरला होता.

तेरा सुरूर, झलक दिख ला जा, जरा झूम झूम, शाकाला का बूम बूम, हुक्का बार अशी अनेक गाणी त्याची हिट झाली. 

एके काळी टीव्ही सीरियलमध्ये अडकून पडलेला हिमेश रेशमिया बॉलिवूडमध्ये आला आणि संगीत क्षेत्रातला सुपरस्टार झाला. तेरे नाम आणि आशिक बनाया आपने या गाण्यांचे अल्बम आजही लोकप्रिय आहेत.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.