फ्रान्सने राफेलबाबत केलेल्या एका कृतीने भारताच्या राजकारणात खळबळ उडालीय….

आज सकाळी ट्विटर ओपन केलं, तर सगळीकडे एकच हॅशटॅग ट्रेंड होतंय ते म्हणजे #RafaleScam. माध्यमामध्ये देखील या हॅशटॅगबद्दल माहिती दिली जात आहे. राफेल घोटाळ्याच्या अपडेट झळकवल्या जात आहेत. विरोधी पक्षाचे नेते, जाणकार मंडळी हा हॅशटॅग वापरत केंद्रावर निशाणा साधतायेत.

पण नेमकं काय आहे त्यामागील कारण? आणि पुन्हा एकदा हा स्कॅम चर्चेत का आलाय?

तर भारतानं फ्रांससोबत राफेल या फायटर विमानासाठी डील झाली होती. ही डील २०१६ मध्ये करण्यात आली होती. त्यानुसार पुढच्या वर्षापर्यंत सगळी ३६ राफेल फायटर जेट्सची डिलिव्हरी पूर्ण होणारे. आतापर्यंत टप्प्याटप्याने भारताला २१ राफेल विमान मिळालीयेत.

पण गेल्या ४-५ वर्षांपासून यामुळे नवनवीन वाद सुरु व्हायला लागलेत. दरम्यान, सध्या फ्रांसने या भष्ट्राचारा प्रकरणी चौकशी सुरु केलीये. त्यानुसार, डसॉल्ट एव्हिएशन आणि भारत सरकार यांच्यात झालेल्या या डिलमध्ये कथित भ्रष्टाचार आणि आरोपांची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी एका न्यायाधीशाची नेमणूकही करण्यात आलीये. 

फ्रांसच्या एका इन्वेस्टिगेटिव्ह जर्नलनुसार, दोन्ही देशाच्या सरकारांमध्ये १४ जून २०१६ ला  ज्या करारावर सह्या केल्या होत्या, त्यावर एक उच्चस्तरीय संवेदनशील तपासणी कमिटी बसवली गेलीये. तिथल्याच एका मीडिया पोर्टलनं खुलासा केला होता की, या घोटाळ्याची तपासणी एका स्वतंत्र न्यायाधिशाकडून केली जाईल.

फ्रान्सच्या याच एका कृतीनंतर भारताच्या राजकारणात खळबळ उडाली आहे…

फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रांसिस ओलांद यांच्या या डीलच्या निर्णयावर उपस्थित झालेल्या प्रश्नांची चौकशी करतील.

जेव्हा भारत आणि फ्रांस दरम्यान राफेल जेट डील झाली होती. तेव्हा फ्रान्सिस ओलांद राष्ट्रपती होते. तर सध्याचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो त्याच सरकारमध्ये अर्थमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत होते.

या प्रकरणी फ्रान्सची आर्थिक गुन्हे शाखा फ्रेंच पब्लिक प्रॉसिक्युशन सर्व्हिसने (PNF) म्हंटल होत कि, ३६ राफेल विक्रीच्या भ्रष्टाचार आणि आरोपांची चौकशी करण्यात येईल. त्यानुसार आता ही चौकशी सुरु करण्यात येत आहे.

राफेल प्रकरणी असलेले आरोप

काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या एका मीडिया हाऊसनं देशातील भ्रष्टाचारविरोधी एजन्सीच्या तपासाचा हवाला देत एक बातमी छापली होती. ज्यात म्हंटल होत कि, डॅसॉल्ट एव्हिएशनने या प्रकरणी मध्यस्थी करणाऱ्या एक भारतीय व्यक्तीला दहा लाख युरोची लाच दिली होती.

फ्रेंच भ्रष्टाचारविरोधी एजन्सी एएफएच्या चौकशी अहवालाच्या आधारे प्रकाशित झालेल्या बातमीनुसार,

डॅसॉल्ट एव्हिएशनने काही बोगस पेमेंट केल्याचे आढळले. कंपनीच्या २०१७ च्या खात्यांच्या ऑडिटमध्ये ५ लाख ८ हजार ९२५ युरो म्हणजेच जवळपास ४.३९ क्लाईंट गिफ्टच्या नावावर खर्च केल्याचं दाखवलं. पण एवढ्या मोठ्या रकमेबाबत कोणतंही ठोस असं स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. 

या आरोपानंतर डॅसॉल्ट एव्हिएशनच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं कि, फ्रेंच भ्रष्टाचारविरोधी एजन्सी सोबतच  बर्‍याच अधिकृत संघटनांकडून चौकशी केली गेलीय. ३६ विमानांच्या खरेदीत भारताशी झालेल्या कराराच्या रचनेचा कोणताही भंग झालेला नाही.

तसेच त्यांनी सांगितलं कि, आर्थिक सहकार आणि विकास संघटनेच्या (ओईसीडी) लाचलुचपत प्रतिबंधक प्रस्ताव आणि राष्ट्रीय कायद्यांचे काटेकोरपणे पालन केले गेलेय.

विरोधी पक्षानं केंद्राला धारेवर धरलयं

केंद्रातील एनडीए सरकारने फ्रेंच एरोस्पेस कंपनी डसॉल्ट एव्हिएशनकडून ३६ राफेल जेट खरेदी करण्यासाठी ५९,००० कोटी रुपयांच्या करारावर साह्य केल्या होत्या. तेव्हापासूनच विरोधी पक्ष काँग्रेस ह्या ना त्या कारणानं केंद्रावर आरोप करतंय. २०१९  च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी देखील  कॉंग्रेसने विमानाच्या दर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांसह या कराराबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले होते, परंतु सरकारने सर्व आरोप फेटाळून लावले होते.

त्यानंतर आता जेव्हा फ्रांसने यावर चौकशी नेमलीये. फ्रान्सच्या याच हालचालीनंतर पुन्हा एकदा या वादानं डोकं वर काढलंय. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विटरवर, “चोर कि दाढी..” #RafaleScam असं लिहत पोस्ट शेअर केलीये. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.