चुकून भरलेल्या एका फॉर्मने सुरेखा सिक्रि छोट्या पडद्यावरच्या दादीसा बनल्या….

टीव्हीवर सिनेमांपेक्षा सगळ्यात जास्त मालिका पाहिल्या जातात यात तर काही वादच नाही. दिवसभर या सिरीयल चालू असतात आणि अनेक लोकांना या सिरियलचा लळा लागतो. छोट्या पडद्यावर दिसणाऱ्या या मालिकांमधील पात्र इतक्या जवळची वाटू लागतात आणि निदान त्यांना बघण्यासाठी तरी अनेकजण या सिरीयल पाहतात. तर आज छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेत्री सुरेखा सिक्रि यांचं निधन झालं.

सुरेखा सिक्रि यांचं करियर हे वेगळ्या मार्गाने सुरु होतं पण अपघाताने त्या या क्षेत्रात आल्या होत्या. सुरेखा सिक्रि यांचे वडील आर्मीत होते, भारतीय वायुसेनेत त्यांचे वडील कार्यरत होते. दिल्लीमध्ये त्यांनी बराच काळ वास्तव्य केलं, कॉलेजला असताना लिखाण करणं त्यांना प्रचंड आवडायचं. आपल्या रिकाम्या वेळात त्या कविता लिहीत असे. 

लिहिण्याची सवय असल्याने कवितांबरोबरच त्या आर्टिकल, निबंध वैगरे लिहीत असे. या लिहिण्याच्या छंदातूनच त्यांना पत्रकार व्हायचं होतं. सुरेख यांची मोठी बहीण मनारा सिक्रि यांना अभिनयाची आवड होती. मनारा यांना एनएसडी मध्ये जाऊन नाटक आणि सिनेमा शिकायचा होता. सुरेखा यांनीही दोन तीन नाटक केली होती मात्र त्यांना पत्रकारच व्हायचं होतं.

सुरेखा यांची बहीण मनारा यांनी एनएसडी मध्ये जाण्यासाठी एक फॉर्म विकत आणला होता. पण अचानक मूड चेंज झाल्याने सुरेखा यांच्या बहिणीने तो फॉर्म तसाच ठेवून निघून गेल्या. आता तो फॉर्म तसाच पडून राहिला. सुरेखा यांच्या आईने तो फॉर्म पाहिला आणि मनाराचा फॉर्म सुरेखा सिक्रि यांना भरायला लावला. 

आईच्या सांगण्यावरून मनाराचा फॉर्म सुरेखा सिक्रीनीं भरला. आता सुरेखा सिक्रीनीं तो फॉर्म चुकून भरला होता कारण त्यांना पत्रकार व्हायचं होतं. सुरेखा सिक्रीनचं सिलेक्शन झालं आणि इंटरव्हिव राउंडसुद्धा त्यांनी क्लीयर केला. हा तो काळ होता १९६७-६८चा जेव्हा एनएसडीमध्ये मुलींची संख्या कमी होती. आणि जास्त मुलींना अभिनय करण्यात इंटरेस्टसुद्धा नव्हता.

जर्नालिझम करणाऱ्या सुरेखा फॉर्मच्या नादात अभिनयाकडे वळल्या. रंगमंचावर त्यांचं मन रमू लागलं आणि थेटरमध्ये त्या पारंगत होत गेल्या. रघुवीर यादव, ओम पुरी आणि नासिरुद्दीन शहा अशा दिग्गज लोकांसोबत त्यांनी अभिनय आणि थेटर केलं. दिल्लीतल्या थेटरग्रुप मध्ये फक्त आणि फक्त सुरेखा सिक्रि यांच्या नावाची चर्चा असे कारण त्यांचा अभिनय हा अगदीच वास्तविक वाटत असे. 

दिल्लीतल्या थेटरग्रुपमधून त्यांचं लक्ष कमी होत गेलं आणि त्या मुंबईत आल्या. मुंबईत आल्यावर त्यांना पहिला सिनेमा मिळाला तो म्हणजे किस्सा कुर्सी का. गोविंद नेहलानी यांच्या तमस मधून त्यांच्या पात्राला भरपूर प्रेम मिळालं. तमसमुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. परिणाती, सलीम लंगडे पे मत रो, नजर, ममो अशा अनेक जबरदस्त सिनेमांमधून त्यांनी आपला अभिनय लोकांना दाखवला आणि अनेक शाबासक्या मिळवल्या.

पॅरलल सिनेमांसोबतच सुरेखा सिक्रि व्यावसायिक सिनेमांकडे वळल्या, यात होता आमीर खानचा सरफरोश, झुबेदा अशा अनेक सिनेमांमधून त्या दिसल्या. पण त्यांच्या करियरचा खरा उत्कर्ष झाला होत छोट्या पडद्यामुळे.

केसर, बनेगी अपनी बात, सात डेरे या अशा मालिकांमधून त्या झळकत होत्या मात्र त्यांचं पात्र पॉप्युलर झालं खरं ते म्हणजे बालिकावधू सिरीयल मधल्या दादीसामुळे.

बालिकावधू सिरीयल जितकी लोकप्रिय झाली त्याच्या दुप्पट सुरेखा सिक्रीनचं पात्र लोकप्रिय झालं. आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर त्यांनी हे पात्र अजरामर केलं. खलनायकी पात्रांमध्येसुद्धा सुरेखा सिक्रि फेमस होत्या. 

बधाई हो या सिनेमांतून त्यांनी मात्र जास्त लोकप्रियता मिळवली. रोल छोटे असो किंवा मोठे एक काम मात्र त्यांनी केलं ते म्हणजे आपल्या अभिनयाने समोरच्या व्यक्तीच्या मनात जागा निर्माण करणे. तब्बल तीन वेळा त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. वयाच्या ७५ व्या वर्षी १६ जुलै २०२१ रोजी त्यांचं निधन झालं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.