थलापती विजय आई वडिलांविरुद्ध कोर्टात गेलाय. आपलं नाव वापरायचं नाही अशी तंबी दिलीय…

असं म्हणतात की भारताच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऍक्टर्स असतात आणि साऊथ इंडियन फिल्म लाईन मध्ये सुपरस्टार. तिकडे फिल्मस्टार्सना देव समजून आरती केली जाते. थिएटरमध्ये हिरोच्या एंट्रीला पैसे उधळले जातात, हिरोईनच्या लटक्या झटक्यांना शिट्यांची बरसात होते. कॉमेडीला ला हास्याचा गडगडाट होतो.

आणि फायटिंग करावी ती तर साऊथच्या सुपरस्टार्सनीच. रजनीकांतच्या शाळेत शिकून आलेली तिकडच्या सुपरस्टारची पुढची सगळी पिढी स्टाईल आणि फायटिंगची बादशाह आहे. याच पिढीतलं सध्या गाजत असलेलं नाव म्हणजे थलापती विजय.

थलापती हे त्याचं खरं नाव नाही पण रसिकांनी त्याला लाडाने थलापती ही उपाधी दिलीय. थलापती म्हणजे योद्धा.

विजयच खरं नाव विजय चंद्रशेखर जोसेफ. त्याचा जन्म चेन्नईच्या फिल्मी फॅमिलीमध्येच झाला. वडील  सुप्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक तर आई गायिका. वडिलांमुळेच  विजयने वयाच्या दहाव्या वर्षी ‘वेट्री’ या सिनेमातून अभिनयाची सुरुवात केली. बालकलाकार म्हणून देखील तो खुप गाजला. वयाच्या अठराव्या वर्षीच त्याच्या वडिलांनी विजयला हिरो म्हणून लॉन्च केलं. त्यांच्याच रसिगन नावाच्या सिनेमामुळे त्याला पहिल्यांदा यश अनुभवायला मिळालं. नव्वदच्या दशकात त्याच कौतुक झालं पण पण तो थलापती झाला दोन हजारच्या दशकात.

पोक्किरी, सरकार, मर्सल अशी अनेक त्याचे गाजलेले सिनेमे आहेत. बिस्ट या सिनेमासाठी तर म्हणे विजयने १०० कोटी रुपये घेतले होते आणि दक्षिणेतला सगळ्यात महागडा हिरो बनला होता. त्याने प्रसिद्धीच्या बाबतीत थलैव रजनीकांतच्या पावलावर पाऊल ठेवण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.

विजय थलापतीच्या चित्रपटाचे वेड हे केवळ भारतातच नाही तर जगभरात पसरलं. देशोदेशी त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी असून ते विजयच्या चित्रपटांची आतुरतेनं वाट पाहत असतात.

सिनेमात सुपरस्टार असला तरी विजय आपली राजकीय विषयावरील मते खुलेआम बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो पिक्चरमध्ये देखील सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न कतो. श्रीलंकेत अत्याचार होत असलेल्या तामिळी लोकांसाठी त्याने अनेक प्रयत्न केले आहेत. त्यांच्यांसाठी उपोषण करून विजयने आवाज उठवला होता. 

एकदा तर तामिळनाडू विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थलापती विजय हा थेट सायकलवरून आला होता. विजयच्या सायकलवरून येण्याने सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल दरवाढीची चर्चा चांगलीच रंगली होती.

विजय राजकरणात यावा म्हणून अनेक पक्षांचे प्रयत्न चालू होते. त्याच्या पब्लिसिटीचा वापर आपल्या मतांसाठी व्हावा म्हणून कित्येकांनी आपल्या टाचा घासल्या. पण विजय मात्र सक्रिय राजकारणापासून दूरच राहिला.

२००९ साली त्याने स्थापन केलेल्या विजय मक्कल ईयक्कम नावाच्या संस्थेद्वारे तो विविध ठिकाणी गोरगरीब लोकांना, अडल्या नडलेल्याना मदत करत असतो. पण राजकारणात एंट्रीचा त्याने विचार केला नव्हता. पण गेल्या काही दिवसांपासून त्याचा आणि त्याच्या आईवडिलांचा वाद सुरु झाला होता.

झालं असं होतं कि विजयच्या वडिलांनी म्हणजेच एस.चंद्रशेखर यांनी विजयच्या लोकप्रियतेचा फायदा उठवण्यासाठी विजय मक्कल ईयक्कला राजकीय पक्षात रूपांतरित केलं. मागच्या वर्षीच या वरून गोंधळ सुरु झाला होता. विजयचे वडील आणि आई या पक्षाचे जनरल सेक्रेटरी होते तर पदमनाभ नावाची व्यक्ती पक्षाध्यक्ष. विजयने या पक्षाबद्दल तीव्र निषेध केला होता आणि इलेक्शन कमिशनला नोटीस देखील पाठवली होती.

तेव्हा विजयच्या वडिलांनी सांगितलं होत कि आम्ही एकत्रच राहतो. आमच्यात रोज बोलणं देखील होतं. पण राजकीय पक्ष काढण्याबद्दल तो नाराज आहे. पण मी हा निर्णय त्याच्या भल्यासाठीच घेतोय आणि त्याचा पुढच्या काही वर्षात विजयला फायदाच होणार आहे.

तेव्हापासून सुरु असलेला वाद आज कोर्टात पोहचला. कारण तामिळनाडूच्या ९ जिल्ह्यांमध्ये ६ ऑक्टोबर आणि ९ ऑक्टोबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत.   या जिल्हापरिषद निवडणुकीसाठी विजयच्या आई वडिलांनी त्याच्या फॅन्सना तिकीट वाटप केलं आहे.  

यामुळे चिडलेल्या थलापती विजयने आई वडीलांच्या सहित ११ जणांना कोर्टात खेचलं आहे. माझ्या नावाचा गैरवापर टाळावा यासाठी त्याने या पक्षावर बंदी घालण्याची मागणी केलीय. येत्या २७ सप्टेंबर पर्यंत या केसचा निकाल लागण्याची शक्यता असली तरी आपल नाव वापरल्याबद्दल थेट आईवडिल आणि लेकाच्या मध्ये सुरु असलेली भांडणं हि सगळ्या दक्षिण भारताला बुचकाळ्यात पाडणारी ठरली आहेत हे नक्की.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.