२०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या धर्मेंद्रने अमेरिकेला जाण्याची ऑफर धुडकावून लावली होती….

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आणि बॉलिवूड आयकॉन असलेला धर्मेंद्र हा सिनेमा विश्वातला एकेकाळचा सगळ्यात मोठा सुपरस्टार होता. दिल भी तुम्हारा या सिनेमातून धर्मेंद्रने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर तो कधी थांबलाच नाही. तेव्हापासून ते आजवर त्याची क्रेझ फॅन्समध्ये टिकून आहे. बॉलिवूडवर जेव्हा अमिताभ, विनोद खन्ना, राजकुमार, देवानंद यांचं राज्य सुरु होतं तेव्हा धर्मेंद्रने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं या अभिनेत्यांच्या बरोबरीने आपलं स्थान निर्माण केलं.

पण बॉलिवूडमध्ये पाय ठेवण्याअगोदर धर्मेंद्र हा भयानक संघर्ष करत होता. एका मुलाखतीत धर्मेंद्रने हा किस्सा सांगितला होता. जर ती संधी धर्मेंद्रने स्वीकारली असती तर आज अमेरिकेत धर्मेंद्र फेमस झालेला दिसला असता. तर जाणून घेऊया नक्की काय किस्सा होता. 

पंजाबमधून जेव्हा धर्मेंद्र मुंबईत आला तेव्हा तो एका गॅरेजमध्ये राहत होता कारण मुंबईत नवीन असल्याने त्याला घरही नव्हतं. मुंबईत तग धरून राहण्यासाठी धर्मेंद्र एका अमेरिकन ड्रिलिंग कंपनीत कामाला होता.

२०० रुपये तेव्हा रोजंदारीने धर्मेंद्र काम करत असायचा. ओव्हरटाईम करून जास्त पैसे मिळवायचा. अमेरिकन ड्रिलिंग कंपनी हि तेव्हा नव्यानेच उदयास येत होती आणि आपल्या कामगारांविषयी ती आपुलकी बाळगणारी होती.

या अमेरिकन ड्रिलिंग कंपनीने धर्मेंद्रला अमेरिकेला  पाठवण्याचा निर्णय घेतला आणि धर्मेंद्रला अमेरिकेला जाणार का अशी ऑफरसुद्धा दिली. पण धर्मेंद्रने ती ऑफर धुडकावून लावली कारण त्याला मुंबईतच राहून ऍक्टर बनायचं होतं. सिनेमाचं वेड त्याच्या अंगात भिनत चाललं होतं. अमेरिकेच्या ऑफरला फाट्यावर मारून मुंबईत राहूनच स्ट्रगल करणे धर्मेंद्रने पसंत केलं. 

७०-८०च्या दशकातला एक नावाजलेला स्टार म्हणून धर्मेंद्र उदयास आला. पण सिनेमात येण्याअगोदर एक दिलीप कुमारांचा सिनेमा धर्मेंद्रने पाहिला आणि सिनेमात करियर करण्याचा निर्णय घेतला. हे जेव्हा त्यांच्या आईला कळलं तेव्हा त्यांनी वडिलांसमोर हि गोष्ट न बोलण्याचा निर्णय घेतला कारण धर्मेंद्रचे वडील हे कडक शिस्तीचे होते.

आपला पहिला सिनेमा दिल भी तुम्हारा मध्ये धर्मेंद्रची शरीरयष्टी जर बघितली तर कळेल कि तेव्हा राहण्याचे आणि खाण्यापिण्याचे वांदे असल्याने तो एकदम काटकुळा नायक होता. पण पुढे एकामागोमाग एक सिनेमे करत धर्मेंद्र बॉलिवूडमध्ये हिट झाला. फुल और पथर, अनुपमा, सीता और गीता आणि शोले हे धर्मेंद्रचे काही गाजलेले सिनेमे होते. पुढे भारत सरकारने त्यांना विशेष योगदानामुळे पदम भूषण हा पुरस्कार दिला. 

आज घडीला इतकी क्रेझ धर्मेंद्रची आपल्याला दिसते पण त्यामागे त्याचा संघर्ष सुद्धा खूप मोठा आहे. काही वेळा तर भाडेकरू म्हणून एका बाल्कनीतसुद्धा धर्मेंद्र राहत होता. अमेरिकन ड्रिलिंग कंपनीतून जर धर्मेंद्र अमेरिकेला गेला असता तर एका चांगल्या अभिनेत्याला बॉलिवूड मुकलं असतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.