इतिहासातले असे मोदी, ज्यांनी भर संसदेत CIA चा एजंट असल्याची कबुली दिली होती.

भारतीय राजकारणातल्या सर्वोत्तम ह्युमर असलेल्या राजकीय नेत्यांमधलं सर्वात महत्वपूर्ण नाव म्हणून पिलू मोदींचा उल्लेख केला तर ते अतिशयोक्ती ठरत नाही. आपल्याकडे असलेली कमालीची विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा या दोन गोष्टींच्या आधारे पिलू मोदी जिथे कुठे जायचे ती मैफल ते अगदी सहजच खिशात घालायचे अशी काहीशी परिस्थिती असायची.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पिलू मोदी हे राजकीय विरोधक असले तरी पिलू मोदी जेव्हा कधी संसदेत बोलायचे त्यावेळी इंदिरा गांधी त्यांचं भाषण न चुकता ऐकायच्या. भाषण किती चांगलं झालं आणि भाषणातलं आपल्याला काय आवडलं हे देखील आवर्जून कळवायच्या.

एकदा संसदेत पिलू मोदी आणि इंदिरा गांधींमध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद सुरु होता. पिलू मोदी ज्यावेळी बोलायला लागले ते इंदिराजींना म्हणाले,

“तुम्ही  ‘टेम्पररी’  पी .एम. आहात , मी ‘पर्मनंट ‘पी.एम .आहे .

पी.एम  म्हणजे  पिलू मोदी “

पिलू मोदींच्या बाबतीत अनेकदा असं सांगितलं जातं की त्यांनी अमेरिकन गुप्तचर संघटना ‘सीआयए’चे एजंट असल्याची कबुली दिली होती. पण खरंच असं काही झालं होतं का…? तसं असेल तर त्यामागचं नेमकं कारण काय..?

पिलू मोदी खरंच ‘सीआयए’चे एजंट होते का…?

पिलू मोदी आणि ‘सीआयए’ एजंट प्रकरण यामागे एक अतिशय रंजक किस्सा आहे. किस्सा असा की आपले आजचे सत्ताधारी जसे देशात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना आणि पाकिस्तानला जबाबदार ठरविण्याचा प्रयत्न करतात अगदी तसाच काहीसा प्रयत्न सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धात तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्ष करत असे.

फरक फक्त इतकाच की आता देशातल्या बऱ्या-वाईट गोष्टींसाठी नेहरू आणि पाकिस्तानलां जबाबदार धरलं जायचं, तर त्यावेळी ती जबाबदारी अमेरिकेची गुप्तचर संघटना ‘सीआयए’वर ढकलली जायची.

देशात काहीही घडलं की त्यामागे ‘सीआयए’चा हात असल्याचा सत्ताधारी काँग्रेसकडून करण्यात येत असे. एकदा का विदेशी शक्तींकडे बोट दाखवलं, की सरकारचं उत्तरदायीत्व संपलं असा डाव त्यामागे त्यावेळीही असायचा आणि आताही आहे.

काँग्रेसच्या या सगळ्या प्रकाराला उत्तर म्हणून स्वतंत्र्य पार्टीचे सहसंस्थापक राहिलेले पिलू मोदी हे संसदेच्या ‘सेन्ट्रल हॉल’मध्ये आपल्या गळ्यात एक पट्टी बांधून आले होते. ज्यावर लिहिलेलं होतं,

“मी ‘सीआयए’चा एजंट आहे”

अध्यक्ष महोदयांनी ज्यावेळी पिलू मोदींना गळ्यातली पट्टी काढून टाकण्यास सांगितलं त्यावेळी त्यांनी ती पट्टी तात्काळ काढून टाकली आणि उत्तरले,

“यापुढे मी ‘सीआयए’चा एजंट नाही”

अतिशय व्यंगात्मक पद्धतीने सरकारचे दात सरकारच्याच घशात घालण्यासाठी पिलू मोदींनी हा फॉर्म्युला वापरला होता. आपलं म्हणणं मांडण्यासाठीचं ‘व्यंग’ हे किती प्रभावी अस्त्र आहे, हे दाखवणारं यासारखं उदाहरण भारतीय राजकारणात शोधून सापडणार नाही.

पिलू मोदींचं व्यक्तिमत्व असंच होतं. एकदम मोकळं-धाकळ. जे पोटात, तेच ओठांवर. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे तर एकदा त्यांची पक्षाध्यक्ष होण्याची संधी सुद्धा हुकली होती. काही नेत्यांनी त्यांना जनता पार्टीचे अध्यक्ष बनवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या होत्या. त्यांचं नाव जवळपास निश्चित देखील झालं होतं. पण इथे आडवी आली त्यांची दारू.

झालं असं की जनता पार्टीच्या अध्यक्षपदाच्या दावेदारांमध्ये ज्यावेळी त्यांचं नाव समोर आलं त्यावेळी एका जेष्ठ गांधीवादी नेत्याने त्यांना विचारलं की तुम्ही दारू पिता का..? पिलू महिन्याभरात एखाद-दुसऱ्या वेळी दारू प्यायचे, पण तरीदेखील त्यांनी सांगितलं की, “ हो, मी दारू पितो’

त्यांच्या एवढ्या एका उत्तरामुळे पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीतील त्यांचं नाव मागे पडलं, पण त्याची त्यांना पर्वा नव्हती. आपण काय खावं, काय प्यावं यात कुणीही कसलाही हस्तक्षेप करावा हे त्यांना मान्य नव्हतं.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.