जम्मू काश्मीरमध्ये लाईट गेली तरी आर्मीलाच बोलवायला लागतंय!

समजा तुम्ही शहरात राहता आणि तुमच्या घरातली लाईट गेली तर तुम्ही काय करता ? लाईटची वाट बघत बसतो म्हणाल.

हेच जर लाईट गावाकडं गेली तर तुम्ही काय कराल ? गावातल्या वायरमन ला फोन कराल आणि सांगाल बाबा अरे लाईट गेलीय, तेवढं डांबावर काय जळलयं का बघ….!

पण हेच जर लाईट जम्मू मध्ये गेली ना तर डायरेक्ट इंडियन आर्मीला बोलवायला लागतं. होय जम्मू काश्मीरचा विषयचं एवढा हार्ड असतोय.

जम्मूच्या काही भागातली लाईट शनिवार पासून गुल झालीय. जम्मू व्यतिरिक्त पुंछ, राजौरी, कठुआ, डोडा, किश्तवाड़ या भागात लाईटच नाहीये. आणि आता लाईट नाही म्हणून इंडीयन आर्मीला निमंत्रण गेलंय.

त्याच झालंय असं की, जम्मू-काश्मीरमधील वीज क्षेत्राचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे वीज विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या निषेधार्थ हजारो कर्मचारी शनिवारी संपावर गेलेत. हा संप अनिश्चित काळासाठी आहे.

त्या कामगारांच म्हणणं आहे की, रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी आणि कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या इंजिनिअरला कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावं.

पण मग इंडियन आर्मीला का बोलावलं ?

कर्मचारी संपावर गेल्यानंतर जम्मूच्या प्रशासनाने १९ डिसेंबर ला संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली आणि संप मिटवण्याचा कोणताही मार्ग निघाला नाही. त्याचा परिणाम लाईट गेली.

आता तुम्ही म्हणाल लाईटच गेली ना त्यात एवढं विशेष काय आहे ?

तर भिडूनो आपल्या गावात लाईट गेली तर ठिकाय ओ.. पण जम्मू आणि काश्मीरमध्ये लाईट जाऊन चालत नसते. अशा संधींचा फायदा दहशतवादी घेतात. म्हणून या समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने इंडियन आर्मीला बोलावलं.

रविवारी, १९ डिसेंबर ला जम्मू-काश्मीर पोलीस पॉवर ग्रीडमध्ये पोहोचले. त्यानंतर सायंकाळपर्यंत आर्मीचे इंजिनिअर्स आल्यावर पोलिसांनी वीज विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. आणि सरतेशेवटी लाईट आली बघा.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.