आजच्या यूट्युबर्सनाही भारी पडेल असला प्रँक मकरंद अनासपुरे यांनी आणला होता…

तमाशा हा कलाप्रकार गावखेड्यात मनोरंजन आणि करमणुक म्हणून पाहिला जातो. मनोरंजन आणि समाजप्रबोधन अशा दोन्ही बाजूने प्रेक्षकांच्या डोक्यात प्रकाश पाडणारा असा तमाशा. तमाशाला वाईट म्हणणाऱ्या लोकांना फाट्यावर मारून तमाशा कलावंतांनी जोमाने आपली लोककला जगापुढे आणली. आज भलेही तमाशा जगवताना धडपड दिसत असली तरी तो नामशेष होणारा कलाप्रकार मुळातच नाही, कारण तो या रांगड्या महाराष्ट्राच्या बेधुंद मातीतून अवतरला आहे. तमाशात हलगी ढोलकीची जुगलबंदी, लेहरा मग गण, गवळण, बतावणी, वग असा सगळा विशेष माहोल रंगतो.

मग कृष्ण, पेंद्या आणि गवळणी यांचा शाब्दिक वॉर झाल्यावर मग एन्ट्री होते तमाशाच्या सगळ्यात पावरफुल पात्राची म्हणजे मावशीची. तमाशाची आन बाण शान आणि जीव की प्राण असलेली ही मावशी सगळ्या बोर्डवर रंग उधळून प्रेक्षकांना हसवून हसवून बेजार करते. खरंतर हे मावशी पात्रं तमाशात पुरुषच करतात, दाढी मिशी न काढता, हातात घड्याळ घालून हे पात्रं साकारलं जातं. तर याच मावशी या पात्राबद्दलचा हा किस्सा आहे. एखाद्या पात्राचा इम्पॅक्ट किती जबऱ्या असतो जो तुमच्या ओळखीला कारणीभूत ठरतो. ज्यामुळे तुम्ही घराघरात फेमस होतात. याच मावशीचा एक रोल केला होता मकरंद अनासपुरे यांनी आणि त्या रोलमुळे अगदी खेडोपाड्यात मकरंद अनासपुरे फेमस झाले होते.

मकरंद अनासपुरे म्हणल्यावर आपल्याला त्यांच्या एका हटके शैलीत विनोद करण्याचा बाज माहिती आहे, नुसता हास्याचा खळखळाट. तर मकरंद अनासपुरे हे सुरवातीच्या स्ट्रगलच्या काळात मिळेल ते काम करत असायचे. पथनाट्य करत असताना गावोगावी त्यांच्या ओळखी असायच्या. मग पथनाट्य करण्यासाठी जेव्हा ते गावात जायचे तेव्हा तिथल्याच गावकऱ्यांकडून टोपी, मफलर, पटका वैगरे घ्यायचे आणि प्रयोग झाल्यावर परत देऊन टाकायचे यातूनच त्यांच्या भरपूर ओळखी झाल्या. आणि त्याचा पुढे परिणाम असा झाला की महाराष्ट्रातील एकही गाव नसेल की तिथं मकरंद अनासपुरे हे नाव लोकांना माहीत नसेल. अगदी घराघरांत ते लोकप्रिय आहेत.

तर गोष्ट आहे 1996 ची किंवा त्या आसपासच्या काळातली. प्रायव्हेट चॅनल तेव्हा आलेले नव्हते किंवा उदयास येत होते. सह्याद्री वाहिनीवर मावशी नावाचा एक 15 मिनिटांचा शो असायचा. या स्किटमध्ये मावशी साकारायचे मकरंद अनासपुरे स्वतः. त्यांची ही मावशी प्रेक्षकांना खळखळून हसवायची. मकरंद अनासपुरे यांच्या तोंडून ते विनोद मावशीचं पात्र इतक्या जबरदस्त पद्धतीने समोर यायचं की पब्लिक खल्लास व्हायचं. हे पात्र अजूनही बऱ्याच लोकांच्या लक्षात असेल. स्ट्रगलचा काळ होता, थोडीफार नाटकं आणि इकडे ही सिरीयल असं सगळं अनासपुरे यांचं सुरू होतं. त्यांचं मावशी हे पात्र मात्र भाव खाऊन गेलं होतं.

मग काळ पुढे सरकत गेला तसं ती सिरीयल बंद झाली आणि मकरंद अनासपुरे यांचा तो रोलही गेला. पण सिरीयल बंद झाली म्हणून मकरंद अनासपुरे मुळीच दुःखी झाले नाही. त्यांनी गावोगावी पथनाट्य करताना ते मावशी पात्र वापरून लोकांसोबत प्रँक करायला सुरुवात केली. मस्त साडी वैगरे नेसून सायकल वर टांग टाकून अनासपुरे पथनाट्य ज्या गावी असेल तिथल्या लोकांसोबत हा खेळ करायचे. लोकही अगोदर घाबरायचे आणि नंतर मनमुराद दाद द्यायचे. अनासपुरे याच कारणामुळे खेडोपाड्यात हिरो ठरले.

म्हणजे बघा आत्ता यूट्यूबवर प्रँक करणारे हजारो लोकं आपल्याला पाहायला मिळतात पण असे जबऱ्या प्रँक गाजवण्याचं काम आपल्या मकरंद अनासपुरे यांनी लई आधी करुन ठेवलंय हे ही तितकंच खरं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.