विदर्भाच्या पोट्ट्याचं जंगली मधाचं स्टार्टअप आदिवासींना सुद्धा चांगलं इनकम मिळवून देतंय

महाराष्ट्र शेती आणि नैसर्गिक व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या बड्या राज्यांपैकी एक. विविधता आणि समृद्धतेने नटलेलं हे राज्य आहे, जिथं वेगवगेळ्या भागानुसार आणि हवामानानुसार इथं वेगवगेळी पीक घेऊन शेती केली जाते. नैसर्गिक उत्पादनासाठी तर इथलं वातावरण एकदम भारी आहे. पण कधी नैसर्गिक कारणामुळे झालेलं नुकसान आणि त्यामुळे उभा राहिलेला कर्जाचा डोंगर यामुळे दरवर्षीं कित्येक शेतकरी आत्महत्येचा निणर्य घेतात. यात मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असते. 

पण भिडू असं म्हणतात ना प्रत्येक उन्हाळा आणि पावसाळा सारखा नसतोय. तसंच एखाद्या गोष्टींन साथ दिली नाही म्हणून खचून जायचं नसतंय. कारण आधीच सांगितलंय, महाराष्ट्र सुद्धा विविधता आणि समृद्धतेने नटलेलं राज्य आहे. निसर्गानं आपल्याला भरभरून गोष्टी दिल्यात, त्याचा फक्त योग्य तो वापर करता आला पाहिजे. 

आता तुम्ही म्हणाल बोलणं लय सोपं असतंय, पण भिडूची सवय तुम्हाला माहितेय. विथ प्रूफ आपण कुठलीचं गोष्ट बोलत नाही आणि याचं सुद्धा सक्सेसफुल उदाहरण म्हणजे ‘भावेश वानखेडे’. विदर्भातल्या या पोट्ट्यानं आपल्या निसर्गातल्या गोष्टींचा पुरेपूर वापर करून जंगली मध, हळद आणि गायीचं तूप अशी उत्पादन तर तयार केलीतचं, पण या सोबतचं कित्येक आदिवासी शेतकऱ्यांना रोजगाराचा साधन उपलब्ध करून दिलंय.

आपल्या या व्यवसायाबद्दलचा भावेशने बोल भिडूशी चर्चा करताना सांगितलं कि, 

मी मूळचा अमरावतीचा. तशी ट्राइब ग्रोनची कन्सेप्ट पूर्णपणे माझ्या वडिलांची होती. विदर्भातला असल्यामुळं मला शेतीमध्येचं करियर करायचं होत. पण नेमकं काय करायचं हा गोंधळ उडालेला. तेव्हा मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या कॉलेजबद्दल माहिती मिळाली आणि तिथून मी सोशल आंत्रप्रेन्युअरला ॲडमिशन घेतलं. २ वर्षांची मास्टर्स डिग्री पूर्ण केल्यानंतर २०१७ ला मी पास आउट झालो.  

तिथून बाहेर पडल्यानंतर दोन ऑप्शन होते, एकतर कुठेतरी नोकरी करायची आणि दुसरं सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्येच स्वतःचं काही तरी सुरु करायचं. तेव्हा वडिलांनी म्हंटल कि, तिकडे नोकरी करण्यापेक्षा तू या भागात येऊन स्वतःचं काहीतरी सुरु कर.

भावेशचे वडील एक मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह होते. निसर्ग आणि निसर्गातल्या गोष्टींचा त्याचा चांगलाचं अभ्यास होता. जेव्हा कधी कामातून रिकामा वेळ मिळायचा ते मित्रांसोबत सातपुड्याच्या जंगलात भटकंतीसाठी निघायचे. तिथल्या बारीक -सारीक गोष्टी निरखून पाहायचे, जंगलात राहणाऱ्या आदिवासींसोबत गप्पा मारायचे, त्यांच्या ज्या काही अडी-अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्या सोडवण्यावर भर द्यायचे. 

भावेश सांगतात वडिलांनीचं ठरवलं कि, या आदिवासी लोकांना सोबत घेऊन आपण दोघांनी मिळून एक स्टार्टअप सुरु करायचं. वडील फिल्डचं सगळं काही  बघणार होते, तर ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग मी बघणार होतो. ठरल्याप्रमाणे आम्ही स्टार्टअपला २०२० मध्ये सुरुवात केली. १२,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर आणि तिथल्या काही आदिवासी शेतकऱ्यांना घेऊन सगळ्यात आधी जंगली मधावर भर दिला.

काम सुरु केल्यावर आम्हाला आमची पहिली ऑर्डर मिळाली होती, आधी त्यांना आमच्यावर विश्वास नव्हता, पण आम्ही स्वतःहून अप्रोच करून पटवून दिल्यांनतर त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली.  ५ किलो मध आम्ही पुण्याला पाठवलं होत, पण आठवड्या भरातचं वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर भावेशलाच सगळ्या गोष्टी पहाव्या लागल्या.

तेव्हा नुकताच काम सुरु केल्यामुळं कंपनीचं काही रजिस्ट्रेशन नव्हतं. पण कस्टमर खुश झाल्यांनतर वाटलं कि ही कन्सेप्ट सक्सेस होईल आणि मग आम्ही ट्रेडमार्क वगैरे जी सगळी प्रोसेस असते, ती पूर्ण केली आणि ‘ट्राइब ग्रोन’ नावानं व्यवसाय सुरु केला. भावेशच्या म्हणण्यानुसार, सध्या अमरावतीला त्यांचं पॅकेजिंग युनिट आहे आणि मध्यप्रदेशात हरदा या ठिकाणी छोटा प्रोसेसिंग प्लांट आहे. 

आदिवासी शेतकऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याबाबत भावेश सांगतात कि, 

आम्ही आधी आदिवासी शेतकऱ्याचे ट्रेनिंग प्रोग्रॅम घेतो कि सस्टेनेबल ग्रीकल्चर ही कन्सेप्ट नेमकी काय आहे. कारण हे शेतकरी जुन्या पद्धतीने शेतीशी निगडित गोष्टी करतात. आधीच त्यांना सध्याच्या प्रवाहात आणणं जरा अवघड असतं.  पण आमचा प्रयत्न असा आहे कि, जुन्या पद्धतीबरोबरच त्यांना मॉडेल पद्धती बद्दल सुद्धा माहिती मिळावी. म्हणजे एकूण काय सस्टेनेबल ग्रीकल्चर बद्दल माहिती देतो. 

या ट्रेनिंगमुळे आता शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स आलाय आणि त्यांना मिळणार उत्पन्न बघून अजून बरेच शेतकरी आमच्याही जोडले जात असल्याचं भावेश सांगतात. सध्या आमच्यासोबत एकूण ५५५ च्या आसपास लोक जोडले गेले आहेत. 

त्यात २००  लोक असे आहेत ज्यांच्याकडे जमिनी नाहीत, म्हणून आम्ही त्यांना मध गोळा करण्यासाठी सोबत घेतलंय. त्यांनतर काही शेतकऱ्यांकडे जमिनी आहेत, ते हळदीची लागवत करतात आणि आम्ही त्यांच्याकडून हळद घेतो. तर काही असे आहेत ज्यांच्याकडे जमीन नाही पण गायी आहेत, त्यांच्याकडून आम्ही तूप घेतो. 

भावेश सांगतात आम्ही थेट शेतकऱ्यांकडून माल घेतो त्यामुळे त्यात कुठलंही केमिकल्स मिक्स नसतात. महत्वाचं म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टींची लॅब टेस्ट करून घेतो. या सगळ्या टेस्ट आम्ही कृषी विज्ञान  केंद्राकडून करून घेतो, त्या लॅब टेस्ट महाग असतात, पण आमचा हेतू एकचं आहे, ग्राहकांपर्यंत केमिकल फ्री प्रोडक्ट पोहोचवणं. 

त्यामुळे भावेश यांच्या ट्राइब ग्रोन कंपनीच्या प्रोडक्टला संपूर्ण महाराष्ट्रात तर मोठी मागणी आहेचं, पण महाराष्ट्राबाहेर दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि सिंगापूर, दुबई, यूएसए या देशांमध्ये सुद्धा ट्राइब ग्रोनच्या प्रोडक्टची मागणी आहे.

भावेश सांगतात, जेव्हा आमचे प्रोडक्ट कस्टमरपर्यंत पोहोचतात. तेव्हा त्यांच्या घरातली मोठी मंडळी अक्षरशः आम्हाला फोन करून रडतात कि, आम्ही लहानपणी असे पदार्थ खायचे किंवा आम्ही आमच्या लहानपणी जेव्हा घरी आईसोबत हळद कांडायचो तशीच या हळदीची चव आहे.

या स्टार्टअपमुळे खरा फायदा आदिवासी शेतकऱ्यांना होतोय, म्हणजे जिथे आधी शेतकरी महिन्याला  २ ते ३ हजार कामवायचे, तिथे आज हेच इनकम ८ ते ९ हजारांवर गेलंय आणि यात स्टार्टअपच्या प्रॉफीटनुसार वाढ सुरूचं आहे.  शेतकरी सुद्धा आमच्याशी स्वतःहून येतात, कारण ज्या मधासाठी त्यांना रस्त्यावरून बसून १०० रुपये मिळतात, तेच मध ट्राइब ग्रोन ३०० रुपयांपर्यंत घेते. म्हणजे डबल फायदा.

सध्या भावेश आपल्या ट्राइब ग्रोन कंपनीच्या प्रोडक्टची सेलिंग कुठल्याही मोठ्या स्केलवर करत नाही, किंवा ऑनलाईन सुद्धा ते विक्री करत नाहीत. कंपनी सध्या ऑफलाईन मार्केटिंगवरच भर देत आहेत. किंवा काही लोक त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून प्रोडक्ट विकत घेत आहेत.

आता सगळ्या गोष्टीनंतर मुद्दा येतो तो प्रॉफीटचा, तर १२,००० रुपये इन्व्हेस्ट करून सुरु केलेल्या कंपनीचा टर्नओव्हर आता ३५ लाख इतका आहे. कंपनीचे सध्या ३ प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत, त्यात वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. पण ते अजून ७ प्रोडक्टवर काम करतायेत.

हे ही  वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.