फडणवीसांनी दोन वेळा कारसेवा केली, १५ दिवस तुरूंगात होते… असा होता घटनाक्रम

शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्टर सभा घेतली, त्या प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी उत्तर सभा घेतली. दोन्ही सभेत चांगलीच शेरेबाजी रंगली.

उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले,

“फडणवीस म्हणतात, मी बाबरी पाडताना तिथे होतो. अरे ती काय शाळेची सहल होती? फडणवीस बाबरीच्या ढाच्यावर चढले असते तरी ढाचा पडला असता.”

या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं, ते म्हणाले,

“माझं वजन १०२ किलो आहे. बाबरी पाडायला गेलो तेव्हा १२८ किलो होतं. सामान्य माणसाचा एफएसआय १ असेल, तर माझा एफएसआय १.५ आहे आणि बाबरी पाडायला गेलो एफएसआय २.५ होता.

रामजन्मभूमी आंदोलनावेळी अयोध्येत तुमचा एकही नेता नव्हता. त्याच्या वर्षभर आधी ज्यावेळी पहिली कारसेवा झाली, कोठारी बंधूंना मारलं तरी ढाच्यावर झेंडा फडकला. तेव्हा देवेंद्र तिथे होता. बदायूच्या तुरुंगात होतो. आम्ही वाटत पाहत राहिलो, शिवसेनेचं कोणी येईल. पण शिवसेनेचं कोणी आलंच नाही.

आम्ही गोळ्या चालताना पाहिल्या, संघर्ष पाहिला. जर आवश्यकता असेल तर आम्ही पुन्हा कारसेवा करू.”

याआधी भाजपच्या बूस्टर सभेत बोलतानाही त्यांनी, ‘बाबरी पडली तेव्हा आपण तिथं होतो,’ असं वक्तव्य केलं होतं. 

साहजिक प्रश्न पडतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस बाबरी मशिदीच्या पाडकामावेळी कुठे होते व ते काय करत होते.  

देशभर हिंदूत्वाची व अयोद्धेत राम मंदीर उभारण्याची लाट ही लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेनंतर निर्माण झाली. त्यावेळी देशभरातल्या विविध ठिकाणाहून कारसेवक अयोद्धेला जाण्याचं निश्चित करण्यात आलं. अशा दोन कारसेवा झाल्याचा इतिहास सांगतो. त्यापैकी एक झाली होती ती, 

३० ऑक्टोंबर १९९० साली आणि दुसरी झाली होती ती ५ डिसेंबर १९९२ साली. 

या दोन्ही कारसेवांवेळी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पहिल्या कारसेवेवेळी देवेंद्र फडणवीस २० वर्षांचे होते. त्या वेळी ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम पहायचे. 

पहिल्या कारसेवेवेळी देवेंद्र फडणवीस यांना १५ दिवसांचा कारावास भोगावा लागला होता. 

३० ऑक्टोंबर १९९० साली नागपूरमधून अनेक कारसेवक अयोद्धेत राम मंदीर उभारण्याचा संकल्प घेवून अयोद्धेला जाण्याचं निश्चित झालं होतं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा देखील यात सहभाग होता. नागपूर मधून निघालेल्या एका गटात देवेंद्र फडणवीस देखील होते. रेल्वेने हा गट अलाहाबादला पोहचला होता. तिथे देवराह बाबा आश्रमात मुक्काम करण्यात आला. 

पुढे न जाता इथेच थांबून सत्याग्रह करण्याची सुचना वरिष्ठांनी दिली मात्र पुढे जायचेच हा निर्धार करुन त्रिवेणी संगमाजवळ असणाऱ्या सीताराम मंदिरात या गटाने मुक्काम केला. 

तिथे भजन किर्तन करत पाच ते सहा दिवस काढण्यात आल्यानंतर शंकराचार्यांच्या नेतृत्वात हा गट अयोद्धेच्या दिशेने गेला ३० किमी चालत गेल्यानंतर एका पुलावर या गटाला आडवण्यात आलं. लाठीमार व गोळीबार करण्यात आला. 

या गटाला अटक करुन बदायुच्या कारागृहात डांबण्यात आलं होतं. हा कारावास १५ दिवसांचा होता. या गटात सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री संतोष गंगवार हे देखील होते. या पंधरा दिवसाच्या कैदेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी कारागृहात घरी पत्र पाठवून आपण सुखरुप असल्याचं देखील कळवलं होतं. 

अयोद्धेत पाय ठेवून न देता अटक करुन १५ दिवस जेलमध्ये ठेवून या गटाला लखनौच्या रेल्वेस्टेशनवरून पुन्हा नागपूरला पाठवण्यात आलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांची दुसरी कारसेवा झाली ती बाबरी मशिदीच्या पाडकामावेळी अर्थात ५-६ डिसेंबर १९९२ रोजी.. 

३० नोव्हेंबरला २५० जणांचा कारसेवकांचा जत्था अयोद्धेला रवाना झाला यात देखील देवेंद्र फडणवीस सामिल होते. १ तारखेला ते अलाहाबादला पोहचले. या २५० जणांसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या कारसेवकांची व्यवस्था विलास फडणवीस व रवी जोशी पहात होते. 

अलाहाबादमध्ये मुक्काम करून त्रिवेणी संगमावर स्थान करुन हा जत्था अयोद्धेच्या दिशेने रवाना झाला. २ ते ६ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस अयोद्धेच्या काळाराम मंदिरात मुक्काम करत होते. या काळात जत्था दिवसभर ‘मंदिर वहीं बनाऐंगे’चा नारा देत  फिरत असे. याच काळात देशभरातून ५० हजाराहून अधिक कारसेवक अयोद्धेत जमले व वातावरण तापत गेलं. 

५ तारखेच्या रात्री पार पडलेल्या बैठकीत देखील देवेंद्र फडणवीस सामील होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सभा सुरू झाली. एक गट घुमटावर चढला व बाबरी मशिदीचा घुमट पाडू लागला. पहिला, दूसरा आणि तिसरा घुमट संध्याकाळपर्यन्त पाडून झाला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित होते मात्र या काळात त्यांना कारावास झाला नसल्याची माहिती मिळते. 

ही आठवण देवेंद्र फडणवीस यांनीच लिहून ठेवली आहे..

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.