या रिसर्चनुसार, कोरोनानंतर अमेरिकेतल्या लोकांनी भारताची “एकत्र कुटूंबपद्धती” स्वीकारली

लहानपणी गावाकडून इकडं शहरात राहायला येयचं घरच्यांनी ठरवलं तेव्हा काय कळलंच नव्हतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारचं आंब्याच्या झाडाखाली निवांत खेळत असताना आई जवळ आली आणि म्हणाली,

” लवकर हातपाय धुवून कापडं घाल, ५ च्या मुंबई गाडीने निघायचंय”.

”आज तर पप्पा जाणार होतं ना?”

मी आईला विचारलं.

” नाही आज आपण समदी निघणार आहोत, उरक लवकर”

आणि आई निघून गेली.

का जायचंय ? किती वेळ जायचंय ? हे काहीच कळलं नव्हतं . फक्त पप्पांबरोबर मुंबईला जायचं आहे एवढंच माहित होतं. तसाच मग तयारीला लागलो. तयारी कसली, घारापुढल्या रानात पाणी चालू होतं तिथं जाऊन हात पाय धुतले आणि कपडे घालून रेडी झालो.

घरात लगबग चालू होती. गहू, ज्वारी, लसूण,कांदे असा सगळा सराजम बांधून देण्यात काक्यांची लगभग चालू होती. तेवढ्यात आज्जीनं मग चटणीची भरणी भरायला घेतली.

”वर्षभर पुरलं एवढी, उन्हळ्यात माघारी आली का करू अजून मग”

आज्जीचं हे बोलणं ऐकून कळलं  होतं की आता गाव कायमचं सुटलंय आणि आता उन्हळ्यातच पुन्हा गावाचं दर्शन होणार.

मग जर उन्हाळ्यात गावाला जायची ओढ असायची. काय वेगळं वाटतं कळायचं नाही पण मुंबईला ४ जणांच्या कुटुंबात राहायची सवय झालेलो आम्ही जेव्हा गावाला १५-२० जणांच्या गोतावळ्यात राहायला जायचो तेव्हा वेगळाच आनंद मिळायचा.

अगदी पंक्ती बसल्यासारख्या घरातल्या माणसांची जेवणं, दिवसभर भावंडातच खेळणं, रात्री ओसरीवर मोठ्याच्या मोठ्या गोदड्यांवर पहुडणं सगळं असं भरल्यासारखं वाटायचं.

त्यात रात्री घरातले सगळे एकत्र बसायचे. मग सगळ्या पोराबाळांचं काय चाललंय याचा आमचे बाबा(आजोबा ) एक एक करून आढावा घ्यायचे. मग गावात कुणाचं चांगलं  झालं, कुणाचा पोरगा चांगल्या हुद्यावर गेला, कोण कुठं फसलं, कोणाची पोरं वाया गेली असं एक एक करून बाबा सगळ्यांना सांगायचे. बाबा कधी काल्पनिक गोष्टी सांगायचे नाहीत पण रोजच्या पाहण्यातली उदाहरणं सांगून त्यांना जो उपदेश द्यायचा असायचा तो ते बरोबर द्यायचे.

सुट्ट्या संपल्यानंतर जेव्हा पुन्हा निघायला निघायचो तेव्हा अख्या कुटुंबाच्या डोळ्यात पाणी उभा राहायचं. त्यामुळं कुणी किती जरी लहान कुटुंब हे चांगलं आहे, मॉडर्न आहे असं सांगितलं तरी आमचा जीव मात्र आमच्या गावच्या एकत्रित कुटुंबपद्धतीतच अडकलेला.

छोट्या कुटुंबाचं फॅड तसं आलं बाहेरच्याच देशतानं.

एकत्र कुटुंबपद्धतीत स्वतंत्र्यावर गदा येते, ही व्यवस्था प्रॅक्टिकल नाही, काळानुरुप ही व्यवस्था बदलली पाहिजे अशी कारणं देउन एकत्र कुटुंबपद्धती एकादी जुनाट प्रथा असल्यासारखं सांगितलं गेलं.

मात्र हळू हळू जेव्हा नुक्लियर फॅमिलीत वाढलेला एकटेपणा, त्याचा कुटुंबातल्या सदस्यांवर होणार परिणाम, करोनासारख्या संकटकाळात असाह्य झालेली कुटुंब हे सगळं पाहिलं तेव्हा एकत्र कुटुंबपद्धतीचं महत्व सगळ्यांना समजायला लागलं.

ते सोडा ज्या अमेरिकन लोकांची कॉपी करून आपण छोट्या कुटुंबांचा पुरस्कार करत होतो त्या अमेरिकेतही आता जॉईंट फॅमिलीची क्रेझ वाढू लागली आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या एका अहवालानेही याची पुष्टी केली आहे. 

गेल्या 50 वर्षांत अमेरिकेत एकत्र कुटुंबांचा कल झपाट्याने वाढला आहे असं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलंय. याला अमेरिकेत मल्टी-जनरेशनल फॅमिलीज किंवा बहु-पिढ्या कुटुंब देखील म्हणतात. या व्यवस्थेमध्ये अनेक पिढ्या एकाच छताखाली एकत्र राहतात. 

1971 नंतर अशा मल्टी-जनरेशनल फॅमिलीजची संख्या चौपट झाली.

जनरेशन युनाइटेड रिपोर्ट 2021 नुसार यू.एस.मधील 18+ वयोगटातील 6 करोडपेक्षा जास्त जनता  मल्टी-जनरेशनल फॅमिलीत राहते. याचाच अर्थ दर चार मधला एक अमेरिकन जॉईंट फॅमिलमध्ये राहतोय. 

मल्टी-जनरेशनल फॅमिलीत राहणारे 10 पैकी 6 (57%) लोकं सांगतात की त्यांनी कोविड-19 साथीमुळं एकत्र राहणं सुरू केलं आहे. तसेच याचवेळी 10 पैकी 7 जणं सांगतात ते इथून पुढं असंच राहणं सुरु ठेवतील.

नुक्लियर फॅमिली व्यवस्था चुकीची नाहीये मात्र त्याचवेळीच करोनाच्या साथीनंतर जॉईंट फॅमिलीतच राहणं प्रॅक्टिकल असल्याचं अमेरिकन लोकं म्हणू लागली आहेत. कोव्हिडच्या काळात हार्वर्ड ने एक स्टडी प्रकाशित केली होती त्यामध्ये अमेरिकेतल्या 18-25 वयोगटातील लोकांना मोठ्या प्रमाणात एकटेपणा अनुभवला होता हे पुढं आलं होतं.

2020 मध्ये, लेखक डेव्हिड ब्रूक्स यांनी त्यांच्या ‘द न्यूक्लियर फॅमिली वॉज ए बिग मिस्टेक’ या लेखात नुक्लियर फॅमिली व्यवस्थेतली एक इंटरेस्टिंग चूक शोधली होती.  

नुक्लियर फॅमिली व्यवस्थेचा पुरस्कार करताना माणूस काही प्रमाणात कॉम्प्रोमाइझ करू शकतो हा फॅक्टच इग्नोर करण्यात आल्याचं डेव्हिड ब्रूक्स यांनी म्हटलं होतं. 

बरं हा शॉर्ट टर्म ट्रेंड नाहीये. करोनाचं संकट संपलं तरी आम्ही असंच राहू असं अमेरिकेतील लोकं म्हणतायेत. ९८% लोकांनी आम्ही अमेरिकेतील मल्टी-जनरेशनल फॅमिलीत खुश असल्याचं म्हटलं आहे. आणि या मागील कारणं लोकांना जेव्हा विचारण्यात आली तेव्हा ते सांगतात जॉईंट फॅमिलीमुळे त्यांचे कुटुंबाशी असेलेले संबंध अजूनच दृढ झाले.

घरातल्या ज्या सदस्यांना आधाराची गरज आहे तो त्यांना वेळेवर मिळाला. तसेच कुटंबातील सदस्यांची आर्थिक स्तिथी सुधारली. शारीरिक आणि मानसिक आरोग्यही जॉईंट फॅमिलीमध्ये राहिल्याने उत्तम राहतं असं या अमेरिकन लोकांचं म्हणणं आहे. 

एवढेच नाही तर तिथल्या बिझनेसेसनेही अशा फॅमिलीच्या गरजा पुरवण्यासाठी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. उदाहरणार्थ मल्टी-जनरेशनल फॅमिलीसाठी तिथल्या बिल्डर्सनी प्रशस्त घरं मार्केटमध्ये आणण्यास सुरवात केली आहे. 

कारोना काळात आपल्यापैकी बऱ्याच जणांनी फॅमिलीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. भारत सुरातीपासूनच एकत्रित कुटुंब व्यवस्था असल्याने या व्यवस्थेला करोनाकाळात बूस्ट मिळाला असं देखील म्हणता येइल. लाइव्ह मिंटने केलेल्या एका सर्वेक्षणात ६२% भारतीयांनी करोना काळात त्यांचे कुटुंबाशी संबंध सुधारल्याचं म्हटलं होतं.

त्यामुळं आता अमेरिकेत आलेला हा जॉईंट फॅमिलीचा ट्रेंड जगभरातदेखील  फॉलो केला जाणार का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.