रानबाजार आणि ओटीटीच्या दुनियेचा बाजार… कशी होते ओटीटी प्लॅटफॉर्म्सची कमाई?

सध्या वेबसीरीजच्या दुनियेत प्लॅनेट मराठीवरच्या ‘रानबाजार’नं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. या वेबसीरीजबद्दल बोलूच पण आधी या ओटीटींच्या धंद्याबद्दल बोलू, तुमच्या आमच्या सबस्क्रिप्शनवर यांचं ‘भागतं’? आणि असं असेल तर मग नेटफ्लिक्स तोट्यात असल्याच्या बातम्या कशा?

ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि सबस्क्राईबर्सचा खेळ

ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा व्यवसाय चालतो तो सबस्क्राईबर्सवर. सबस्क्राईबर्स म्हणजे पैसे देऊन वेबसीरीज किंवा सिनेमे पाहणे. सुरूवातीला फक्त एमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्स असे दोनच प्लॅटफॉर्म होते पण, जसं भारतात इंटरनेटचे दर कमी झाले तसं सगळ्यांनाच ओटीटीचा व्यवसाय खुणावू लागला, हॉटस्टार, वूट, झी5 असे अनेक खेळाडू या मैदानात दाखल झाले.

जसं हिंदी न्यूज चॅनलचा धंदा चालताना पाहून प्रादेशिक वाहिन्या सुरू झाल्या अगदी तस्संच हिंदी इंग्रजी ओटीटी प्लॅटफॉर्म्सना मिळणारा प्रतिसाद पाहून प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्म्सनीसुद्धा आपापले प्लॅटफॉर्म्स सुरू केले.

आहा, होईचोई हे त्यापैकी गाजलेले प्रादेशिक प्लॅटफॉर्म्स, तर मराठीतही आपला हक्काचा प्लॅटफॉर्म असावा या हेतूने अक्षय बर्दापूरकर आणि सौम्या विळेकर यांनी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ हा प्लॅटफॉर्म सुरू केला.

याबाबत अक्षय बर्दापूरकर म्हणतात,

“मराठी कंटेट इतर भाषिकांच्या स्पर्धेत कुठंही कमी नाही, पण त्यांच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ हवं होतं म्हणून प्लॅनेट मराठीची सुरूवात केली, आम्ही हरप्रकारच्या कंटेटला प्लॅनेट मराठीवर जागा देऊ”

या प्लॅटफॉर्मला एक वर्षही अजून व्हायचंय तसं म्हणायला गेलं तर हा प्लॅटफॉर्म हा अजूनही बाल्यावस्थेतच म्हणायला हवा, मात्र, ‘जून’ सिनेमा आणि ‘अनुराधा’ या वेबसीरीजनं ओटीटीच्या दुनियेत ‘प्लॅनेट मराठी’ची हवा केली, पण, ‘रानबाजार’नं सबस्क्रायबर्स मिळवून दिले. ज्यावर ओटीटीचा खरा बिझनेस चालतो.

ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा धंदा

ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे प्रामुख्यानं तीन प्रकार आहेत, AVOD, SVOD, TVOD. AVOD म्हणजे ऍडव्हाटायझिंग व्हिडिओ ऑन डिमांड, यात पैसे देऊन सबस्क्रिप्शन घ्यावं लागत नाही, प्लॅटफॉर्म्सला जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळतं.

म्हणजेच कंटेट पाहताना अधेमध्ये जाहिराती सहन कराव्या लागतात. याची सुरूवात यूट्यूबनं केलेली तर आता एमएक्स प्लेयर हा आघाडीचा AVOD प्लॅटफॉर्म आहे. एमएक्स प्लेअरनंसुद्धा स्वतःचा SVOD सुरू केलाय.

SVOD म्हणजे सबस्क्रायबर्स व्हिडिओ ऑन डिमांड, यात कंटेंट पाहण्यासाठी वार्षिंक किंवा मासिक ठराविक एक रक्कम देऊन कंटेट पाहता येऊ शकतं. ऍमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, डिस्ने-हॉटस्टार किंवा मराठीत प्लॅनेट मराठी हे प्लॅटफॉर्म्स ही सुविधा देतात.

तिसरा प्रकार आहे TVOD म्हणजे टिकिट व्हिडिओ ऑन डिमांड,

याची सुरुवात तशी टाटा स्कायनं केलेली, एखादा सिनेमा पाहायचा तर ठराविक रक्कम देऊन त्या कंटेंटचं काही तासांसाठी सबस्क्रिप्शन मिळवणे, टाटा स्काय त्यात नवनविन सिनेमा दाखवायचं, त्यानंतर झी5 नं ‘खाली-पीली’ नावाचा सिनेमा त्यांच्याच प्लॅटफॉर्मवर TVOD फॉरमॅटमध्ये उपलब्ध केला, प्लॅनेट मराठीनंही जून हा सिनेमा TVOD याच पद्धतीनं रिलीज केला होता.

तर, आता ऍमेझॉन प्राईमनं ‘KGF2’ आणि ‘रनवे 34’ हा सिनेमा TVOD वर उपलब्ध करून दिलाय. पण, वार्षिक सबस्क्रिप्शनसाठी पैसे मोजूनही पुन्हा नवे सिनेमे पाहण्यासाठी 199 आणि 299 रुपये देणं हे काही प्रेक्षकांना पटलेलं नाही त्यावरून सोशल मीडियावर राडा सुरूय.

पण, खरं तर सब्रस्क्रायबर्सच्या पैशांतून ओटीटीचा धंदा चालवणं हा आतबट्ट्याचा व्यवहार, भारतात नेटफ्लिक्स सध्या प्रचंड तोट्यात आहे, वार्षिक सबस्क्रिप्शन 899 वरून 159 प्रतिमहिना आणूनसुद्धा नेटफ्लिक्स तोट्यात आहे, त्याचं प्रमुख कारण म्हणजे कंटेट, जागतिक दर्जाचं कंटेट दिलं जातंय यात काहीच वाद नाही, अत्यंत जबरदस्त कंटेंट नेटफ्लिक्सवर आहे, पण, ते एकाच धाटणीचं एकाच प्रकारचं असल्याचं पण आपल्या मातीतलं आपल्या माणसांचं कंटेंट नसल्यामुळे भारतात नेटफ्लिक्सचा ग्राफ उतरणीला लागलाय.

नेटफ्लिक्सच्या तुलनेत अत्यंत कमी दरात वार्षिक सबस्क्रिप्शन देऊनसुद्धा ऍमेझॉन प्राईमला काहीच फरक पडलेला नाहीय कारण त्यांचा खरा धंदा हा व्हिडिओ कंटेट पुरवणे हा नाहीच, त्यांच्या खरा धंदा हा ऑनलाईन प्रोडक्ट विक्रीचा आहे, वार्षिक सबस्क्रिप्शन घेतल्यावर फ्री डिलिव्हरी मिळतेय म्हणून सुरूवातीला कित्येकांनी सबस्क्रिप्शन घेतलं, आता वार्षिक फी भरल्यामुळे साहजीकच ऍमेझॉनकडूनचं खरेदीचा लोकांचा कल वाढतो. त्यामुळे ऍमेझॉनला व्हिडिओ कंटेटमधून उत्पन्न नाही आलं तरी फारसा फरक पडत नाही.

SVOD प्लॅटफॉर्म्स बरचंस कंटेंट फ्रीसुद्धा देतात, किंवा प्राईम कंटेंटचं म्हणजे एखाद्या वेबसीरीजचा पहिला भाग फ्रीमध्ये पाहायला देतात.

रानबाजारनं काय केलं?

रानबाजारच्या पहिल्या दोन टीजरमुळे आंबटशौकीनांच्या ‘विच्छा’ चाळवल्या तर ‘सोवळ्या’तल्या कित्येकांनी नाकं मुरडली, मराठीत असलं काही कश्शाला बुवा, संस्कृती बुडाली वगैरे वगैरे नेहमीचे टोमणे तर आलेच पण ट्रोल्ससुद्धा खडबडून जागे झाले, पण, ट्रेलर आल्यानंतर हा धुरळा खाली बसला, वेबविश्वात काहीतरी चांगलं पाहण्यासाठी आसूसलेल्यांचे डोळे आणि कान टवकारले.

एकतर जबरदस्त स्टारकास्ट तसंच वैयक्तिक, राजकीय, आणि सिनेआयुष्यात आक्रमक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिजीत पानसेंचं डिरेक्शन, बास्स! अजून काय हवं एका वेबरसिकाला… तर, रानबाजारनं वेबसीरीजच्या प्रेक्षकाला प्लॅनेट मराठीकडे वळवलं आणि त्यात फक्त मराठी भाषकच नाहीत तर इतर भाषिकांनाही रानबाजारनं मोहिनी घातलीय.

नेहमीचा प्रश्न कुटुंबासोबत बसून पाहता येईल?

एक वाक्य मी आमच्या कॉन्टेंट टीमच्या मीटिंगमध्ये अनेकदा बोललोय, ‘इडियट बॉक्ससमोर बसणारा प्रेक्षक हा इडियट असतो आणि स्मार्टफोनसमोर बसणारा प्रेक्षक हा स्मार्ट..’ या स्मार्ट प्रेक्षकाला काय आणि कुठे पाहायचं हे बरोब्बर कळतं. अर्थात टीव्हीवरचे काही सन्माननीय अपवाद वगळता.

त्यामुळे कुटुंबासोबत बसून पाहण्याचा प्रश्नच नाही. आणि असंही कुटुंबासोबत बसून न पाहण्यासारखं असं आता काय उरलंय? सगळ्या चॅनल्सनही सगळंकाही ‘दाखवून’ टाकलंय.

आणि आता शेवटचा मुद्दा, अगदीच ‘सोवळ्यातलं’ काही पाहायचं असेल तर चिक्कार चॅनल्स आहेत, पण, ‘सोवळ्यात’ही कसला कसला बाजार चालतो हे पाहायचं असेल तर मग रानबाजार नक्कीच पाहायला हवी.

रानबाजार पाहण्यासाठी शुक्रवारी (20 मे) दुपारपासूनच उड्या पडू लागल्या होत्या.

नवीन सबस्क्रिप्शन घेण्याऱ्यांची संख्या ही दुपटीतिपटीनं वाढू लागली होती, आता जर मी या ठिकाणी फक्त नवीन सबस्क्रायबर्सचा आकडा टाकला तरी तुम्ही ते आकडे वाचेपर्यंत हा आकडा आणखी काही हजारांनी पुढे गेलेला असेल! जसं, नेटफ्लिक्सला ‘सेक्रेड गेम्स’नं, एमेझॉन प्राईमला ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘मिर्जापूर’नं सोनी लीवला ‘द स्कॅम’नं प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोहोचवलं तेच काम ‘रानबाजार’नं प्लॅनेट मराठीसाठी केलं.

रानबाजारचा धमाका

 

20 मे रोजी बरोब्बर दुपारी 1 च्या सुमाराला दहापैकी पहिले 3 एपिसोड्स स्ट्रीम झाले आणि बाकी सगळ्यांचा बाजार उठला..! बाकी सगळ्यांचा म्हणजे त्याचवेळी नेटफ्लिक्सवर सुपरडुपर हिट आरआरआर स्ट्रीम होत होती तर झी5 वर सुपरहिट झोंबिवली, पण, पहिली पसंती मिळाली ती रानबाजार या वेबसीरीजला.

दहापैकी फक्त तीनच एपिसोड्स पाहायला मिळाल्यामुळे काहींनी थेट आम्हाला फोन करून जाब विचारला, तर काहींनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. या टीजर-ट्रेलरसह आलेल्या कमेंट्सचीच संख्या सात-आठ हजारांच्या आसपास आहे. यावरून किमान किती जणांनी पहिल्या फटक्यात ही सीरीज पाहिली असेल याचा अंदाज नक्कीच येतो.

प्लॅनेट मराठीवरच्या या बाजारानं फक्त मराठीचं नव्हे तर हिंदीतल्याही मनोरंजनाच्या बाजारात खळबळ नक्कीच उडवून दिलीय.

तसं, आतापर्यंत मराठी वेबसीरीजवरून कधी सोशल मीडियावर खळबळ माजली नाही पण, रानबाजारवरून प्रचंड मीम्स व्हायरल झालेत.

 

काय आहे स्टोरी?

कथा आहे राज्यातल्या राजकारणातल्या सगळ्यात मोठ्या ‘बाजाराची’! सत्तेसाठी कोण कसं, कुणाला एवढंच काय तर स्वतःला कसं विकतं, इतरांची सौदेबाजी करून सत्तेतला स्वतःचा खुंटा बळकट करतं याची. आणि त्या सगळ्या ‘बाजारात’ दोन ‘फुलपाखरां’मुळे जी काही उलथापालथ होते, ते म्हणजे सत्तेचा, लालसेचा, वासनेचा, पैशांचा रानबाजार!

RaanBaazaar Trailer

 

ता.क. सीरीजमध्ये एक गाणं आहे, अगदी थेट यूपी-बिहारमधल्या लोकगीतासारखं, हे गाणं कुठून आणलं याबाबत हिंदीतल्या अनेकांनी या मला विचारणा केली, फक्त डफ आणि पेटी या दोनच वाद्यांवर आणि डॉ पल्लवी श्याम सुंदर यांच्या पहाडी आवाजातलं हे गाणं हिंदी सर्किटमध्ये धुमाकूळ घालतंय.

सीरीजमधल्या जबरदस्त बॅकग्राऊंड म्यूजीकबरोबर या गाण्याचं श्रेयही एव्ही प्रफुल्लचंद्र यांना.

 

सुनील बोधनकर

लेखक प्लॅनेट मराठीच्या कंटेट टीममध्ये क्रिएटिव्ह म्हणून कार्यरत आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.