सदगुरु म्हणाले, १० वर्षात एकही मोठा दंगा झाला नाही, पण आकडेवारी वेगळंच सांगते..

सदगुरु जग्गी वासुदेव, अगदी २१ व्या शतकाला शोभतील असे बाबा. त्यांचा स्टायलिश साधूचा अंदाज, फाडफाड इंग्लिश, बुलेटवरून फिरणं, सेलेब्रिटींमध्येही असणारी सदगुरूंची क्रेझ यामुळं जग्गी वासुदेव आज भारताच्या टॉपच्या बाबांमध्ये येत असतील.

बाबा जसे त्यांचा उपदेशांसाठी, त्यांच्या कॅम्पेनसाठी बातम्यात असतात तसे त्यांच्या वक्तव्यांसाठीही. आता असंच एक बाबांनी वक्तव्य केलं आहे.

गेल्या १० वर्षात एकही मोठा धार्मिक दंगा झालेला नाहीये असं बाबा म्हटले आहेत. 

”जेव्हा आम्ही विद्यापीठात होतो, तेव्हा एकही वर्ष असं नसायचं की देशात मोठी जातीय दंगल झाली नसेल. दरवर्षी कुठे ना कुठे मोठी (दंगल) व्हायची. मात्र गेल्या ५-६वर्षात किंवा १० वर्षात मी (जातीय दंगलींबद्दल) ऐकलेलं नाही” सद्गुरू यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

आता बाबांच्या एनर्जी, डायमेन्शन अशा काय गोष्टी आपल्याला कळत नाही आणि त्यांच्या शिष्याला विचारला तर ते म्हणायचे नुसतं फील कर. इतक्या दिवस तेच केलं मात्र बाबांच्या या गोष्टीबद्दल मात्र डाउट आला. 

देशात रोज हिंदू-मुस्लिम तणावाच्या बातम्या असताना बाबा असं का म्हणतायेत म्हणून शोधा शोध केली तर वेगळीच माहिती बाहेर आली.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) वेबसाइट वर जी आकडेवारी भेटते त्यानुसार देशात २०१४ ते २०२० दरम्यान ५००० हून अधिक धार्मिक दंगली झाल्या आहेत.

गृह मंत्रालय जिथं देखील धार्मिक हिंसाचाराच्या घटनांची नोंद ठेवली जाते त्यांच्या आकडेवाडीनुसार २०१२ आणि २०१३ या दोन वर्षांत जातीय हिंसाचाराच्या १४१९ घटना घडल्या आहेत.

त्यानुसार मग गेल्या १० वर्षांत जातीय हिंसाचारांच्या एकूण घटना ७००० च्या जवळ जातात. 

गृहमंत्रालयाकडून दंगलींचे “मोठ्या” किंवा “लहान” असं वर्गीकरण केलं जात नाही.तसेच गृहमंत्रालयाचा डेटा आणि नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा डेटा यामध्ये देखील फरक असतोय. याबद्दल एकदा माहिती देताना तत्कालीन गृहराज्यमंत्री किरण रिजजु यांनी सांगितलं होतं की एनसीआरबी जो डेटा गोळा करते त्यामध्ये राज्यांमध्ये किती एफआयआर दाखल आहेत यावरून तर गृहमंत्रालयाच्या  डेटामध्ये एफआयआर दाखल केलेला असेलच असं नाही.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा डेटामधून कळून येतं की २०१४ पासून धार्मिक दंगलींच्या प्रकरणांची संख्या कमी झाली आहे परंतु २०१९ पासून त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. 

Untitled design

या दंगलींमध्ये झालेल्या मृत्यूंचा विचार केल्यास २०१२  ते २०१७ या कालावधीत ६१६ लोक मारले गेल्याची माहिती मिळते मात्र २०१७ नंतरची जातीय दंगलीमुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी काय मिळत नाही.

२०१३ मध्ये झालेला उत्तरप्रदेश मधील मुझ्झपूरच्या दंगल ही एक मोठ्या दंगलींपैकी एक होती.

यामध्ये ६० हुन अधिक लोक मारले गेले होते तर दंग्यांमुळे स्तलांतरित झालेल्यांचा आकडा ५०,००० च्या घरात गेला होता.

२०२० मध्ये CAA च्या विरोधात होत असलेल्या आंदोलनांनंतर झालेल्या दिल्लीतील दंग्यात जवळपास ५३ लोकं मारली गेल्याची आकडेवारी मिळते.

२०२१ मध्ये बघायचं झाल्यास त्रिपुरामध्ये बांगलादेशातील घटनांच्या विरोधात मुस्लिमांची घरं जाळण्यात आली होती. याचं लोण अगदी महाराष्ट्रापर्यंत आलं होतं आणि अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये देखील दंगा झाला होता.

२०२२ मध्ये रामनवमीच्या मिरवणूकीत झालेले दंगे आपल्या डोळ्यासमोर आहेत. 

येत्या राजस्तानमध्येच मागच्या ५ महिन्यात ३ मोठे दंगे झाले त्यात दुकानं जाळणे, पोलिसांवर दगडफेक करणे अशा घटना घडल्या होत्या.

म्हणजेच भारतात दंगली घडत होत्या आणि घडत आहेत. त्याचं मीडियातून रिपोर्टींग ही झालं आहे. त्यामुळं गरज आहे ती हा प्रश्न गंभीर आहे हे मान्य करण्याची आणि त्यानुसार पावलं उचलण्याची. बाकी सदगुरु जग्गी वासुदेव जे म्हणाले त्यासंबंधीचे आकडे आम्ही दिली आता यातून अनुमान काय निघतं ते तुम्ही ठरवा.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.