रहमानने ‘ताल’ साठी किती रुपये मानधन घेतलेलं ठाऊक आहे काय ?

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. भारतीय फिल्म इंडस्ट्रीचे शो मॅन असं ज्यांना ओळखलं जातं ते सुभाष घई आपल्या कोणत्या तरी सिनेमाचं लोकेशन शोधण्यासाठी दक्षिण भारतात गेले होते. ते उटी वगैरे अनेक हिल स्टेशनवर फिरत होते. त्यांनी हे लोकेशन शोधण्यासाठी तिथलाच एक स्थानिक ड्रायव्हर घेतला होता.

उटीचं ते नयनरम्य वातावरण, घाट रस्ते, चहाचे मळे यातून ती गाडी फिरत होती. घईंचा ड्रायव्हर मोठा रसिक होता. त्याने गाडीत त्याला आवडणारी गाणी लावली होती. त्या दऱ्या खोऱ्यात फिरताना घई यांना तो न कळणाऱ्या भाषेतलं आर्त संगीत मनाला भिडत होतं. ती हुरहूर त्यांना अस्वस्थ करत होती. त्यांनी ड्रायव्हरला त्या गाण्याची चौकशी केली.

तो ड्रायव्हर अभिमानाने म्हणाला,

“फिल्म थिरुडा थिरुडा. म्युजिक डिरेक्टर ए.आर.रहमान.”

घई यांनी यापूर्वी हे नाव कधी ऐकलं नव्हतं. त्यांनी ते लक्षात ठेवलं आणि मुंबई ला जेव्हा परतले तेव्हा त्यांनी आपल्या असिस्टंटला ए.आर.रहमान कोण हे शोधून काढायला लावलं. थोड्याच असिस्टंटने त्यांना सगळी माहिती काढून दिली. तो म्हणाला,

वयाच्या विशीतील हे पोरगं दक्षिणेत आपल्या संगीताने धुमाकूळ घालतंय. त्याच्या रोजा या सिनेमातली गाणी हिंदीत देखील डब झाली आहेत. पण त्याला हिंदी येत नाही. त्यामुळे तो फक्त दक्षिणेतल्याच दिग्दर्शकांसोबत काम करतो.

घई म्हणाले त्याला फोन करा. चेन्नईला रहमानशी काँटॅक्ट करण्यात आला. घई यांनी त्याला समजावून सांगितलं की

देशभरात तुझं संगीत जर पोहचवायचं असेल तर हिंदी सिनेमाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तू बॉलिवूड मध्ये काम केलं पाहिजेस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदी भाषा थोडी तरी शिकली पाहिजे.

सुभाष घई यांना दिग्दर्शन जमो अथवा ना जमो पण त्यांना संगीताचं कान आहे असं म्हणतात. त्यांचे आजवरचे सिनेमे कर्ज, हिरो, मेरी जंग, राम लखन, सौदागर, खलनायक हे सिनेमे प्रचंड गाजले तर होते पण त्याच्या पेक्षाही गाणी तुफान हिट होती. सुभाष घई यांनी रहमानला आपण एक म्यूजिकल सिनेमा बनवू अशी ऑफर दिली.

नाही होय म्हणता म्हणता रहमान यासाठी तयार झाला. चेन्नईच्या स्टुडिओमध्ये जाऊन सुभाष घई यांनी त्याला साइन केलं. या सिनेमाचं नाव होतं,

ताल

सुभाष घई यांनी त्याला विचारलं किती रुपये मानधन घेणार?

रहमान म्हणाला, दोन रुपये.

तालची गाणी जेव्हा रेकॉर्ड होत होती तेव्हा घई त्याच्या पंचायतन स्टुडिओ मध्ये रात्रंदिवस बसून होते. त्यांचा उत्साह बघून रहमानला आश्चर्य वाटलं. त्याच्या प्रत्येक गाण्याच्या निर्मितीत त्यांचाही सहभाग होता. त्यांनी दिलेल्या टिप्सचा त्याने विचार केला. दोघांच्यात भांडणंदेखील खूप झाली. या सिनेमासाठी रहमान फक्त हिंदीच शिकला नाही तर तो आनंद बक्षींनी लिहिलेलं लिरिक्स समजून घेण्यासाठी उर्दू देखील शिकला. रहमान म्हणतो,

” ताल हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा सिनेमा आहे. मी पहिल्यांदाच उत्तर भारतीय संगीताचा माझ्या गाण्यांमध्ये प्रयोग केला. घई यांच्या मुळे माझ्या साठी संधीची अनेक दारे उघडली गेली. करोडो श्रोत्यांपर्यंत मी पोहचू शकलो. घई जर नसते तर हे शक्य झालं नसतं.”

ताल रिलीज झाला आणि त्याने  कित्येक रेकॉर्ड ब्रेक केले. ताल से ताल मिला, इष्क बिना, रमता जोगी, नही सामने हि सगळी गाणी प्रचंड गाजली. आशा भोसले सारख्या लिजण्डरी गायिकेपासून ते अलका याद्निक, उदित नारायण, हरिहरन ते नवख्या सुखविंदर सिंग पर्यंत वेगवेगळ्या गायकांना त्यांनी वापरलेलं. सिनेमातली प्रत्येक गाणं एक दंतकथा म्हणता येईल त्या दर्जाला जाऊन पोहचलं.

ताल रिलीज होण्यापूर्वी रहमानचे रंगीला, दिल से, दौड असे अनेक हिंदी सिनेमे येऊन गेले, सुपरहिट देखील झाले. पण ताल हा रहमानचा पहिला सिनेमा ज्याच्या एकाही गाण्यात दाक्षिणात्य संगीताची झलक दिसली नाही.

https://www.facebook.com/watch/?v=418735345898653

ऐश्वर्याचं निखळ सौंदर्य, शिमला कुलू मनालीचं शूटिंग, अनिल कपूर अक्षय खन्नाची जबरदस्त ऍक्टिंग, शामक डावरची कोरिओग्राफी असणारे भव्य नृत्य समूह, सगळ्यात महत्वाचं म्हणजे रहमानची जादू, सुभाष घई यांनी ग्रँड म्यूजिकल सिनेमा बनवण्याचं शिवधनुष्य पेललं होतं.

फक्त दोन रुपयात बनलेल्या या सिनेमाच्या संगीताने इतिहास घडवला.

संदर्भ- सुभाष घई यांनी इंडियन आयडॉल मध्ये हा किस्सा सांगितलेला आहे. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.