भांडी धुण्यापासून सुरवात करणारा रणदीप हुडा आज हॉलिवूडचा सुद्धा फेव्हरेट बनलाय..

मागच्या वर्षी नेटफ्लिक्सवर एक सिनेमा आला होता बघा एक्स्ट्रॅक्शन ( extraction ). या नीम हॉलीवूड पटात बरेच भारतीय अभिनेते आणि अभिनेत्रीसुद्धा होत्या. पण यात भूमिका गाजली ती म्हणजे रणदीप हुडाची. बऱ्याच लोकांना रणदीप हुडा ठाऊक असेल, दमदार अभिनय आणि कुठल्याही कॉन्ट्रोव्हर्सि मध्ये न सापडलेला, आपण भलं आणि आपलं काम भलं असा झोन असणारा हा रणदीप हुडा. बॉलिवूडमध्येसुद्धा दर्जेदार सिनेमे तर त्याने केलेच शिवाय एखाद्या हिरोचा एक वेगळा फॅनबेस असतो तशा प्रकारचा हिरो म्हणजे रणदीप हुडा. ज्याच्या कामाविषयी लोकांना अप्रूप वाटतं. तो एकटा फिरत असल्यावर त्याच्या गळ्यात पडू पाहत नाही तर त्याच्याशी सौम्यपणे गप्पा मारू पाहतात. यालाच हिरो आणि अभिनेता यातला फरक म्हणतात.

आता हॉलीवूड आणि नेटफ्लिक्स म्हणलं ना की आपल्या लोकांना भलं मोठं काहीतरी ग्रॅंजर वाटून जातं. याच भल्या मोठ्या नेटफ्लिक्स आणि हॉलीवूड सिनेमात काम करणारा रणदीप हुडा एकेकाळी हॉटेलमध्ये डिश वॉशर ( थाळ्या धुणारा ) म्हणून काम करत होता. सुरवातीपासून हार्डवर्क आणि डेडिकेशन असलेला रणदीप हुडा बॉलिवूडमध्ये कसा आला आणि काय काय उद्योग तो करून आला होता त्याबद्दल आपण जाऊन घेऊया.

बॉलिवूडमध्ये 2 दशकं घालवलेल्या रणदीपला कोणत्याही परिचयाची गरज नाही. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, सरबजीत, हायवे, जन्नत-२, मर्डर-३ यांसारख्या चित्रपटांतून त्याने जबरदस्त फॉलोअर्स बनवले आहेत. पण, इथपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षाने भरलेला होता. गाड्या स्वच्छ करण्यापासून ते रेस्टॉरंटपर्यंत काम केले आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी फिल्मी दुनियेत वेगळी ओळख निर्माण केली.

20 ऑगस्ट 1976 रोजी हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात राहणाऱ्या सर्जनच्या घरी रणदीपचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती त्यामुळे त्याचे बालपण चांगले गेले. सोनीपत येथील MNSS बोर्डिंग स्कूलमध्ये प्रारंभिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तो प्रथम दिल्लीला गेला, नंतर उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेला.

रणदीपने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथून मार्केटिंग आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेतले. यादरम्यान त्याने आपला खर्च भागवण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये काम करणे, वाहने साफ करणे आणि टॅक्सी चालवणे यासारखी अनेक छोटी-मोठी कामे केली. रेस्टॉरंटमध्ये काम करताना वेटर पासून ते डिश वॉशर पर्यंत सगळी काम रणदीप हुडाने केले. भारतात परतल्यावर त्याला चांगली नोकरी मिळाली, पण त्याला जास्त काळ नोकरी चालू ठेवता आली नाही आणि तो चित्रपटसृष्टीकडे वळला.

हळुहळू तो मॉडेल आणि स्टेज अभिनेता म्हणून पुढे आला. प्रचंड संघर्षानंतर अखेर त्याची मेहनत फळाला आली आणि २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘मॉन्सून वेडिंग’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा त्याच्या करिअरमधला पहिला चित्रपट होता. ज्यानंतर त्याचं आयुष्य बदललं. मान्सून वेडिंगनंतर त्याला राम गोपाल वर्मासोबत काम करण्याची संधी मिळाली.

2005 मध्ये आलेल्या ‘डी’ चित्रपटाने रणदीप हुडाला खऱ्या अर्थाने लोकप्रिय केले. दाऊदच्या व्यक्तिरेखेवर बनलेल्या या चित्रपटाने रणदीपला स्टार बनवले. यानंतर रणदीप पुढे गेला आणि यश त्याच्या मागे गेले. आतापर्यंत रणदीपने बऱ्याच चित्रपटात काम केले आहेत आणि त्याच्या चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान आहे. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या सिनेमात त्याने साकारलेली पोलीस अधिकाऱ्याची भूमिका लोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहिली.

सरबजीत सिनेमात तर रणदीप हुडाने अभिनयाचा कळस गाठला होता. त्या पात्रावर त्याने घेतलेली मेहनत आणि सिनेमात केलेला अभिनय निव्वळ लाजवाब होता. वजन कमी करून त्याने जेव्हा सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला तेव्हा लोकांना आश्चर्य वाटत राहिलं की हे कसं शक्य झालं. रणदीप हुडा आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. हिरो जॉनरच्या पल्याड आपल्या आवडीच्या कामात तो खुश आहे आणि त्याची फॅन फॉलोइंग टिकून आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.