पुण्यात अत्रेंवर हल्ला झाला तेव्हा तळवलकरांनी हॉकी स्टिक्सने गुंडांना पळवून लावलं….
मराठी रंगभूमीवर अनेक जबरदस्त कलाकार होऊन गेले जे प्रेक्षकांच्या मनात कायमचे अजरामर झाले. नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीवर आणि एकंदरीत मराठी मनावर त्यांनी कैक वर्षे गारुड निर्माण केलं होतं. त्यात अनेक कलाकार हे आजही आपल्याला आपल्या घरातले वाटतात त्यापैकीच एक कलाकार म्हणजे शरद तळवलकर.
मराठी मनं या माणसाला एक अभिनेता म्हणून कधीच विसरू शकणार नाहीत. पण आज आपण शरद तळवलकरांच्या हाणामारीचा किस्सा बघू.
शरद तळवलकर आपल्याला मुख्यत्वे लक्षात राहतात ते म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लक्ष्यामामा अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यांचे वडील म्हणून.
धुमधडाका सिनेमात जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे एक हॉरर स्टोरी सांगत असतात, तेव्हा शरद तळवलकर यांच्या चेहऱ्यावर दिसणारे एक्सप्रेशन म्हणजे एकदम कहर आणि हसून हसून बेजार करायला लावणारे होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा घाबरट बाप अशीच इमेज त्यांची होती.
केवळ सिनेमातच नाही तर वैयक्तिक आयुष्यात सुद्धा शरद तळवलकर प्रचंड कॉमेडी करायचे. अंगी असलेला हजरजबाबीपणा त्यांनी वेळोवेळी वापरला.
आपल्या टकलावरचा शरद तळवलकर यांचा विनोद सर्वश्रुतच होता.
‘‘सकाळी उठल्यावर आरशात बघताना तोंड कुठपर्यंत धुवायचे, हे मला समजत नाही!’’
एकदा पोटाच्या विकाराने ते आजारी होते. जहांगीर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होते. एक्स-रे काढण्यासाठी घेऊन जाताना वॉर्डबॉयने त्याला विचारले, ‘‘काका, सध्या तुमचा कोणता पिक्चर चालू आहे?’’ तेव्हा शरद तळवलकर त्यावर उत्तरले, ‘‘हे तू काढतो आहेस तेच शेवटचे!’’
सिनेमात तर शरद तळवलकर फॉर्मला होतेच शिवाय समाजकार्यातसुद्धा त्यांचा हात कोणी धरत नव्हतं. एकदा एसपी कॉलेजला प्र. के. अत्रे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं. तिथं शरद तळवलकर सुद्धा जातीने हजर होते. अत्रेंची घणाघाती भाषणं त्याकाळात तुफ्फान गाजायची. हजारोंच्या संख्येनं गर्दी जमायची इतकी क्रेझ अत्रेंची होती. अत्रेंचं भाषण पूर्ण रंगात आलेलं होतं पण अचानक अत्रेंवर काही गुंडांनी हल्ला केला. जमाव पिसाळला आणि वाट फुटेल तिकडे पळू लागला. चांगले सात आठ जण अत्रेंचा समाचार घेण्यासाठी धावू लागले होते.
त्याच वेळी सिनेमाची हिरोची ओरीजनल हिरोगीरी शरद तळवलकर यांनी दाखवली.
आयोजकांच्या समजावणीच्या नादी न लागता त्यांनी हॉकी स्टिक घेतली आणि थेट गुंडांना बदडून काढायला सुरवात केली. शेवटी गुंड शरद तळवलकर यांच्या शौर्याला पाहून पळू लागले पण एवढ्यावर थांबतील ते शरद तळवलकर कसले?
त्यांनी पळून पळून हॉकी स्टिक्सने गुंड फोडून काढले आणि शेवटी अत्रेंचा जीव वाचवत गुंड पळवून लावले.
फक्त पडद्यावर हिरोगिरी करून फायदा नसतो, ती हिरोगिरी प्रत्यक्षात पण कामाला आली पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे शरद तळवलकर यांनी अत्रेंचा जीव वाचवण्याचा हा प्रसंग…!
हे ही वाच भिडू :
- लक्ष्यासारख्या खोडकर मुलाचा कलंदर बाप म्हणून शरद तळवलकर शोभून दिसायचे
- लक्ष्या, तू फक्त मराठी सिनेमा जगवला नाहीस, तर आमचं बालपण अगदी मज्जेत घालवलस..
- सणासुदीत वशाट खावं वाटलं किंवा जातीबाहेर लग्न करावं वाटलं तर हा पिच्चर तुमच्यासाठीय…
- रजनीकांत जसा कंडक्टर पासून सुपरस्टार झाला तसेच मोहन जोशी ट्रक-ड्रायव्हर पासून स्टार झाले