आदित्य ठाकरे 2.0 : पेज थ्री राजकारणी आदित्यंचं आत्ता नवं व्हर्जन सुरू झालंय का..?
शिवसेनेचा ‘आवाज’ असलेले संजय राऊत सद्या ईडीच्या कोठडीत आहेत. मग शिवसेनेचा आवाज मांडणार कोण असा प्रश्न उभा राहिला आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे सुपुत्र तसेच युवासेना प्रमुख असलेले आदित्य ठाकरे यांचं नाव आपसूकच समोर आलं. ठाकरे घराण्यातला पहिलाच ‘ठाकरे’ ज्याने निवडणूक लढवली अन मंत्रीपद मिळवलं असलं तरीही त्याही पलीकडे जाऊन ‘ठाकरे’ असण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आहेच…
मुद्दा आहे तो म्हणजे सेनेत जसं बंड सुरु झालं तसं आदित्य ठाकरेंचा आक्रमक बाणा, त्यांची भूमिका सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे…
आदित्य ठाकरेंचं व्हर्जन 2.0 बद्दल आज बोलूया.
पहिलं म्हणजे आदित्य ठाकरे हे विद्यार्थी सेनेमध्ये कसे लॉन्च झाले ?
भारतीय विद्यार्थी सेना ही शिवसेनेची अधिकृत विद्यार्थी विंग असून विद्यार्थ्यांच्या समस्यावर काम करणारी ही संघटना आहे. कधीकाळी याच विद्यार्थी सेनेच्या रूपात राज ठाकरेंनी स्वतःची राजकीय ताकद निर्माण केली होती. आज त्याच विद्यार्थी सेनेचं काम आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालतं. आदित्य ठाकरे कॉलेजच्या वयात असताना त्यांनी कॉलेजस्तरावरचे प्रश्न हाताळत विद्यार्थ्यांमधला एक चेहरा बनले. महाविद्यालय आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या आंदोलनात ही संघटना सहभाग घेत गेली आणि हळूहळू आदित्य ठाकरेंचं नाव होत गेलं.
मग २०१० चं साल आलं आणि आदित्य ठाकरेंची युवासेना स्थापन झाली.
१७ ऑक्टोबर २०१० रोजी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरेंकडे सोपवलं आणि त्यांच्या रूपाने ठाकरे घराण्याची तिसरी पिढी राजकारणात आली होती. शिवसेनेचीच एक उपशाखा म्हणून युवसेनेची स्थापना झाली. मुळात आदित्य ठाकरेंना राजकारणात लाँच करण्यासाठी युवसेनेची स्थापना करण्यात आलेली तेंव्हापासून आदित्य ठाकरे हेच युवासेनेचे अध्यक्ष आहेत.
पूर्वीपासून जशा शिवसेनेच्या गावा गावात शाखा असायच्या तशाच काही प्रमाणात युवा सेनेच्याही शाखा गावोगावी दिसतात. तरुण तरुणींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, नोकरी महोत्सव, मैदानी खेळांच्या स्पर्धा तसेच महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ अशा विषयाला धरून युवासेनेने बरीच आंदोलनंही केलीत.
विध्यार्थी सेना आणि युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे राजकारणात आले, युवा नेता बनले, पक्षात त्यांचं महत्व वाढू लागलं..ते स्वतःच्या भूमिका मांडू लागले, .
पण या भूमिका कशा आहेत ? तर पारंपरिक शिवसेनेच्या विरोधातल्या पेज थ्री टाईप भूमिका..
याची २ उदाहरणं निघता येतील एक म्हणजे व्हॅलेंटाईन डेला समर्थन आणि दुसरं म्हणजे नाईटलाईफ
एकेकाळी शिवसेना ‘वेस्टर्न फेस्टिव्हल’ म्हणून व्हॅलेंटाईन डेला विरोध करत असायची, हा परकीय सण आम्ही साजरा करणार नाही असं शिवसैनिक म्हणायचे.
पण आदित्य ठाकरेंनी याच्याविरुद्ध भूमिका घेतली. २०१० मध्ये युवासेना स्थापन झाली आणि २०११ मध्ये व्हेलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांना युवासेना विरोध करणार नाही असं आदित्य ठाकरेंनी जाहीर केलं होतं.
बरं २०११ पासून ते आजपर्यंत युवासेना या भूमिकेवर ठाम आहे. अशी भूमिका घेणाऱ्या आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलेलं की, ‘तरुणांपर्यंत पोहोचायचं असेल, तर ही भूमिका बदलावी लागेल’. त्यांच्या या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आलेलं.
बरं आदित्य ठाकरेंची भूमिका ही व्हॅलेन्टाईन डेला समर्थन देण्यापुरतीच मर्यादित नाही राहिली तर त्यांनी मुंबईत नाईटलाईफ सुरु केली.
२०१९ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी, वरळी विधानसभा मतदार संघातून आदित्य ठाकरेंची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली. ठाकरे घराण्यातील एकमेव सदस्य आदित्य ठाकरे हे निवडणुकीला सामोरे जात होते. त्याचदरम्यान त्यांनी नाईट लाईफचा मुद्दा समोर केला होता.
मुंबईतील रेस्टॉरंट्स, कॅफे, केमिस्ट, मॉल्स, थिएटर्स, नाईट क्लब, पब, जिम, स्पा हे सर्व रात्रभर उघडे ठेवण्याची मागणी त्यांनी जोर लावून धरली. रेल्वे स्टेशन आणि हायवे जवळच्या भागात रात्रभर खाण्याचे आणि चहाचे स्टॉल्स उघडे असावेत.
वरळीसारख्या इलाईट एरियात लोकांमध्ये उतरणं, कोळी महोत्सव भरवणं यासारखे वेगवेगळे उपक्रम आदित्य ठाकरेंनी राबवले आणि आमदार म्हणून २०१९ मध्ये वरळीतून निवडूनही आले. सत्तेत सहभागी झाले आणि राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री बनले.
सत्तेत येताच त्यांनी २६ जानेवारी २०२० पासून मुंबईतल्या नाईटलाईफची अंमलबजावणीला सुरुवात होईल असं घोषित केलं.
२१ ऑगस्ट २०२० रोजी आदित्य ठाकरेंनी NDTV या वृत्त संस्थेला एक ओपिनियम आर्टिकल लिहिलं होतं की, ज्यात त्यांनी लिहिलेलं की, मुंबई नाइटलाइफमुळे “the City that Never Sleeps” म्हणजेच कधीही न झोपणारं शहर बनेल.
न्यूयॉर्क आणि लंडनसारखी शहरे देखील २४ तास सुरूच असतात. तसंच मुंबईच्या नाइटलाइफमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल म्हणून नाइटलाइफसाठी प्रयत्न चाललेत असं स्पष्ट केलं होतं.
पण या सगळ्या प्रयत्नानांमधून आदित्य ठाकरेंनी आपली पेज थ्री इमेज सेट केली.
आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीत पर्यटन, पर्यावरण मंत्री बनले. भलेही या खात्यात कुणी जास्त इंटरेस्ट घेत नसेल तरीही आदित्य ठाकरेंनी हे खातं निवडलं आणि महत्वाचे निर्णय घेतले.
- कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकल्प त्यांनी रद्द केला. आरेमधील कारशेडला विरोध करणाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आल्याची घोषणा केली.
- राज्यात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ‘इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१’ ची घोषणा केली.
- २०२७ पर्यंत मुंबईतील बेस्टच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक असतील, असा शब्द आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना दिला होता.
- हवामान बदल कमी करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ सुरू केलं.
- इतकंच नाही तर, नागपुरातील एक २०० वर्ष जुनं झाड तोडू न देण्याचा निर्णय देत पर्यावरण प्रेमींची मनं जिंकली होती.
तसेच त्यांनी पर्यावरण आंतरराष्ट्रीय परिषदा देखील गाजवल्या.
नोव्हेंबर २०२१ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या हवामान बदल परिषदेतून महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला.
स्कॉटलंडमधील ग्लास्गो शहरात झालेल्या जलवायू परिषदेत महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री या नात्याने आदित्य ठाकरेंना इन्स्पायरिंग रिजनल लीडरशिप’ हा पुरस्कार देण्यात आला. या सगळ्या प्रयत्नांमधून त्यांनी आपण पर्यावरणासाठी जागरूक असल्याची प्रतिमा निर्माण केली.
पण अचानक एकनाथ शिंदेंचं बंड झालं आणि सत्ता गेली.
मवाळ नेता म्हणून भूमिका राहिलेल्या आदित्य यांची भूमिका देखील बदलली हे त्यांच्या आक्रमक वक्तव्यांवरून आणि त्यांच्या दौऱ्यांवरून स्पष्ट होते.
महाराष्ट्रात शिवसेनेला पुन्हा ताकद देण्यासाठी आदित्य ठाकरेंनी ‘शिवसंवाद यात्रा’ सुरु केली. २० ते २३ जुलै दरम्यान त्यांनी शिवसंवाद यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण केला. ज्यात मुंबईतले मतदारसंघ त्यांनी कव्हर केले.
या शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरे सभा घेतायेत, शिवसैनिकांची गर्दी खेचतायेत. ‘गद्दार हा गद्दारच असतो’ असं म्हणत जाईल त्या मतदारसंघात ते बंडखोरांवर टीका करायचा चान्स सोडत नाहीत. इतकंच नाही तर २० जुलै रोजी आदित्य ठाकरेंनी ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या घरासमोर जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला.
याचदरम्यान एकीकडे संजय राऊतांना अटक झाली तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रा चालूच ठेवली.
या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला कोकण आणि मराठवाड्यातील मतदार संघात दौरे काढले, त्यांचा कोकण दौरा देखील बराच गाजला. तसेच पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात त्यांनी मेळावा घेतला आणि कालच शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप पुण्यात झाला. या समारोपच्या सभेला सभेत हजारो शिवसैनिकांची गर्दी केली होती.
पुण्यातल्या समारोपाचं टायमिंग असं काही जुळून आलं कि एकीकडे कात्रजला आदित्य ठाकरेंची सभा सुरु होती आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पुणे दौऱ्यावर होते. नेमकं याच दिवशी शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी हल्ला केला त्यामुळे आदित्य ठाकरेंचा पुणे दौरा बराच गाजल्याचं दिसून येतंय.
आता आदित्य ठाकरेंचा प्लॅन म्हणजे ते पुढील १५ दिवस रत्नागिरी जिल्ह्यात थांबून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणजेच संपूर्ण कोकणात दौरे काढणार असल्याचं सांगण्यात येतंय.
पण आत्तापर्यंत झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी शिवसेनेकडून होणारे शक्तिप्रदर्शन आणि त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष होतं. एकंदरीतच आपल्या संपूर्ण दौऱ्यात आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शिवाय त्यांच्या दौऱ्याला, सभांना, मेळाव्यांना झालेली गर्दी पाहता त्यांना मिळालेला प्रतिसाद चांगला असल्याचं चित्र होतं.
“हिंमत असेल तर बंडखोरी झालेल्या ४० जागांवर निवडणुका घ्या आणि सत्ता जिंकते कि सत्य जिंकते हे कळू द्या असं आवाहन करणं असू द्यात कि “शिंदे-फडणवीस सरकार लवकरात लवकर कोसळणार’ असं वारंवार केलं जाणारं विधान असू द्यात आदित्य ठाकरे बंडखोरांना चांगलंच लक्ष्य करताना दिसून येतायेत.
अशाप्रकारे आदित्य ठाकरे १.० म्हणजेच सुरुवातीचे आदित्य ठाकरे आणि आत्ताचे आदित्य ठाकरे २.० यांच्यामध्ये झालेला फरक स्पष्टपणे दिसतो. आदित्य ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेचा शिवसेनेला येत्या काळात कितपत फायदा होतो हे दिसून येईलच..
हे ही वाच भिडू :
- शिंदे गटाचा आता ‘शिवसेना भवनावर’ दावा मात्र शिवसेना भवनची मालकी कुणाकडे ???
- आदित्य ठाकरेंचे जीवलग ते भाजपकडून विधानसभा अध्यक्ष असा आहे राहुल नार्वेकरांचा प्रवास
- ज्या कोकणामुळे सेना उभारली त्या कोकणाबद्दल ठाकरेंचा काय प्लॅन आहे..?