या ६ गावांमध्ये स्वातंत्र्याच्या तब्बल ७७ वर्षांनी पहिल्यांदा तिरंगा फडकला आहे…

नक्षलवाद्यांचा पगडा असलेल्या छत्तीसगडच्या बस्तर भागातल्या सुकमा आणि विजापूर जिल्ह्यातल्या सहा दुर्गम खेड्यांमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकवला गेला. विजापूर जिल्ह्यातल्या चिन्नागेलूर, टाइमनार आणि हिरोली गावात आणि सुकमा जिल्ह्यातल्या बेद्रे, दुब्बमर्का आणि तोंडामार्का या गावात तिरंगा फडकावून पहिल्यांदा स्वातंत्र्यदिन साजरा झाला.

खरंतर तर ही गावं कट्टर नक्षलग्रस्त आहेत.

त्यामुळे गेली कित्येक दशकं या गावांनी कधीच स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन साजरा केला नव्हता. उलट नक्षलवादी या दोन्ही दिवशी काळा झेंडा फडकवायचे. पण काही काळापासून बस्तर मधल्या चिन्नागेलूर, टाइमनार, हिरोली, बेद्रे, दुब्बमर्का आणि तोंडामार्का सहा गावांजवळ सुरक्षा दलाने आपल्या नवीन छावण्या उभारल्या आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांचं इथे येण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे या पुढे या गावांचा विकास सुद्धा होईल. पण नक्षलवादी बस्तर पर्यंत पोहोचले कसे ? हा प्रश्न राहतोच.

नक्षलवाद कसा जन्माला आला?

१९६७ मध्ये पश्चिम बंगालमधल्या नक्षलबाडीत चारू मुजुमदार यांनी सुरू केलेल्या जमीनदारांविरोधातल्या आंदोलनाने पेट घेतला होता. या आंदोलनालाच पुढे ‘नक्षलवाद’ असं म्हटलं जाऊ लागलं. या वेळी शेतकरी, भूमिहीन मजूर आणि आदिवासींनी नक्षलबारी येथे एका जमीनदाराच्या धान्य कोठारांवर छापा टाकला होता. चारू मुजुमदार यांच्यासोबत कनू सन्याल हे सुद्ध होते. या बंडखोरांना जवळपासच्या गावातल्या लोकांनीच नव्हे, तर चीनच्या पीपल्स रिपब्लिकनेही मदत केली होती. चिनी मीडियाने या आंदोलनाला ‘स्प्रिंग थंडर’ असं नाव दिलं होतं. या चळवळीने सुरुवातीला चीनचे संस्थापक ‘माओ झेडोंग’ यांच्याकडून प्रेरणा घेतली होती.

बस्तर नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला कसा बनला?

नक्षलवादाच्या या ठिणगीने ७०च्या दशकात आंध्र प्रदेशात वणव्याचं रूप घेतलं होतं. व्यवसायाने शिक्षक असलेल्या कोंडापल्ली सीतारामय्या यांनी या वणव्याचं नेतृत्व स्वीकारत आदिलाबाद, वारंगळ, तेलंगणा परिसरात नक्षलवादी चळवळीला आकार दिला. ‘रिव्हॉल्यूशन इज नॉट अ डिनर पार्टी, इट इज सॅक्रिफाइस’ हा माओ झेडुंग यांचा आवडता युक्तिवाद. याच युक्तिवादावर नक्षलवाद्यांनी चळवळ सुरू ठेवली आहे. मात्र, चळवळीचा आवाका वाढल्यानंतर आणि पोलीस-प्रशासनाच्या कारवायांनंतर नक्षलवाद्यांना जंगलांचा आसरा घ्यावा लागला.

तेव्हा ‘सेफ झोन’शोधत कोंडापल्ली सीतारामय्या यांनी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे पाच गट करून त्यांना गोदावरीच्या तटावरच्या जंगलात पाठवलं होतं.

या परिसराला दंडकारण्य म्हणतात. बस्तरच्या सीमारेषेला लागून असलेल्या या दंडकारण्यातूनच नक्षलवाद्यांच्या कारवाया चालू झाल्या आणि अखेर बस्तर केंद्रबिंदू बनला. बस्तर हा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा या राज्यांच्या सीमारेषेवर आहे. चार हजार चौरस किमी परिसरात पसरलेल्या बस्तरच्या जंगलातून तेव्हा मध्य प्रदेश सरकारला दरवर्षी तब्बल २५० कोटींचा महसूल मिळायचा.

बस्तर जिल्ह्यात एकूण २३६ गाव आणि पाडे होते आणि ७६ प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती सुद्धा इथे होत्या. एकूणच बस्तर हा तेव्हा श्रीमंत जिल्हा होता.

मात्र, वनखात्यातील अधिकारी, जमीनदार, कॉर्पोरेट्स यांनी इकडच्या वनसंपत्तीची आणि आदिवासींची लुटालूट केली. तेव्हा या बड्या लोकांपासून बस्तर मधल्या आदिवास्यांचं रक्षण करण्याच्या नावाखाली नक्षलवाद्यांनी इथे आपला डेरा टाकला आणि तेव्हा पासूनच बस्तर नक्षलवाद्यांचं केंद्रस्थान म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

बस्तर हा बराचसा आदिवास्यांचा भाग आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर सुद्धा या भागाकडे सरकारचं दुर्लक्ष झालं होतं.

तेव्हापासूनच प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन इथे साजरे कधी झालेच नव्हते आणि जेव्हा नक्षलवाद्यांचं वर्चस्व इथे आलं तेव्हा त्यांनी या दोन्ही दिवशी बस्तर मध्ये काळा झेंडा फडकवला होता. त्यामुळे तब्बल ७७ वर्षांनी पहिल्यांदाच बस्तरच्या निदान सहा गावात तरी स्वातंत्र्य दिन साजरा झाला.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.