टोमॅटोच तर नाव झालंय महागाईचा खरा भडका तर मसाल्यांनी केला आहे
गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटो खूप भाव खात आहे. नंतर हळूहळू पाऊस वाढत गेला आणि सगळ्याच भाज्यांचे भाव वाढले होते. म्हणजे जवळ जवळ संपूर्ण किचन महागल्याने सगळ्याच गृहिणी वैतागल्या आहेत. पण संपूर्ण जेवणात मुख्य भूमिका असते ती मसाल्यांची. टोमॅटोच्या पाठोपाठ भाज्या आणि मसाल्यांचे सुद्धा भाव गगनाला भिडले आहेत. म्हणजे वरणाला जिऱ्याची फोडणी आणि भाजीला गरम मसाल्याचा तडका देणंसुद्धा महागलं आहे.
बरं, टोमॅटोसारखेच मसाल्यांचे सुद्धा भाव १०-२० रुपयांनी नाही तर तब्बल २००-३०० रुपयांनी वाढले आहेत आणि येत्या काळात हे भाव अजून वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली आहे.
सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मसाल्यांच्या किमती वाढण्याचं कारण. अवेळी पडलेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे हवामानात होणारे बदल.
अर्थात आधी प्रचंड उन्हाच्या तडाख्यामुळे सगळीच पिकं करपली. त्यात तांदूळ, भाजीपाला आणि मसाला मिरची हे सुद्धा आलंच मसाल्यांच्या दरवाढीमागे पेरणी कमी आणि त्यामुळे उत्पादन कमी झाल्याचं कारण सांगितलं जातंय. उत्पादनच घटल्याने जिऱ्याचे भाव तीनच महिन्यांत तीन पटीने वाढले. गेल्या वर्षी ५० किलो जिरं २० ते २५ हजार रुपयांना मिळत होतं. यंदा हा भाव ५० ते ६० हजार रुपयांवर पोचला आहे. गेल्या वर्षी ८० ते ९० लाख पोती उत्पादन झालं होतं आणि यंदा हे उत्पादन ५० लाख पोत्यांवर आलं आहे. जगात राजस्थान आणि गुजरातचं जिरं भाव खाऊन जाते. पण यावर्षी राजस्थान आणि गुजरात मध्ये बिपरजॉय वादळाचा फटका जीऱ्याच्या उत्पन्नावर बसला आणि उत्पादन कमी झालं. जास्त करून चीन आणि बांगलादेश मधून जिरं खरेदी करतात. त्यामुळे जिऱ्याची निर्यात झाल्यानंतर भारतात जिऱ्याचं प्रमाण खूप कमी उरतं आणि त्याचासुद्धा परिणाम जिऱ्याच्या किमतीवर होतो.
महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात हळदीचं उत्पादन होतं. पण यंदा या भागात जून महिन्यात कमी पाऊस पडला. लागवडीयोग्य पाऊस नसल्याने हळदीची लागवड करायला उशीर झाला त्यामुळे लागवडीला वेळ कमी मिळाला आणि लागवड सुद्धा कमी झाली. याच कारणामुळे यंदा महाराष्ट्रातील हळद लागवड १० ते २० टक्क्यांनी कमी झाल्याचा अंदाज आहे. तर तमिळनाडूत १० ते १५ टक्के आणि आंध्र प्रदेश तसेच तेलंगणातील हळद लागवड क्षेत्र १८ ते २२ टक्क्यांनी घटल्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून हळदीला सुद्धा मागणी आहे.
भारतातून हळदीची निर्यात मागील काही महिन्यांपासून वाढली आहे. मसाले बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार देशातून एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये हळदीची निर्यात २७ टक्क्यांनी वाढली. निर्यात वाढली पण दुसरीकडे बाजारातला पुरवठा कमीच राहीला. वाढलेल्या दरातही निर्यातीला मागणी येत असल्याने भारतातल्या हळदीची किंमत वाढली आहे. काळी मिरीच्या उत्पन्नाचं नुकसान सुद्धा असंच झालंय. भारतातलं ९७% मिरीची लागवड केरळ मध्ये होते. केरळमध्ये मिरीची लागवड झाली पण पावसामुळे केरळ मधल्या मिरीच्या वेली कुजल्या आणि काळी मिरीची किंमत सुद्धा वाढली.
आता पाहू, मसाल्यांच्या किंमतीत कितीने वाढ झाली आहे?
मसाल्यांच्या घाऊक दरात जवळपास ४०%नी वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये जिऱ्याचे भाव ३०० रुपये प्रतिकिलो होते ते जुलैमध्ये ७०० रुपये प्रतिकिलो झाले. लवंगाच्या किमतीत तर जवळ जवळ १००% नी वाढ झाली आहे. म्हणजे एप्रिलमध्ये ६५० रुपयांना मिळणारी एक किलो लवंग जुलै महिन्यात १२०० रुपयांना मिळत होती. लहान वेलची एप्रिलमध्ये ८०० रुपये प्रतिकिलो होती ती जुलैमध्ये १४०० रुपये प्रतिकिलो झाली. लहान वेलची सोबत मोठ्या वेलचीचे भाव सुद्धा वाढले आहेत.
६०० रुपयेप्रतिकिलो ने एप्रिल मध्ये मिळणारी मोठी वेलची जुलैमध्ये ९०० रुपये प्रतिकिलोने मिळायला लागली. मगज बी जे एप्रिल महिन्यात ३०० रीपये प्रतिकिलो होतं ते आता ८०० रुपये प्रतिकिलो झालं आहे. बडीशेप ही आपण मुखशुद्धी म्हणून खात असलो तरी ती सुद्धा मसाल्यामध्येच मोडते. एप्रिलमध्ये बडीशेप ३०० रुपये प्रतिकिलो मिळत होती आणि आता ती ७५० रुपये प्रतिकिलो मिळतेय. सुंठ तर दुपटीने वाढली आहे. सध्या सुंठीचा भाव ४०० रुपये प्रतिकिलो झाला आहे. काळ्या मिरीच्या दरातही किलोमागे २०० रुपयांची वाढ झाली आहे. ७०० रुपये किलो दराने विकली जाणारी काळी मिरी आता ९०० रुपये किलो दराने बाजारात मिळतेय. मसाला म्हटलं की, मिरचीला विसरून कसं चालेल. लाल मिरची सुद्धा आधी एप्रीलमध्ये १५० रुपये प्रतिकिलोने मिळत होती ती आता २८० रुपये प्रतिकिलोने मिळतेय.
मसाले बाजारात धण्याचे सुद्धा भाव वाढले आहेत. धण्याला मागील काही महिन्यांपासून चांगली मागणी आहे. सध्या पिकाला पोषक वातावरण नाही आणि पुरवठा सुद्धा कमी आहे त्यामुळे धण्याचे भाव वाढलेले दिसतात आणि धणे निर्यातही जोमात सुरु आहे. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात धण्याची निर्यात तीन पटीने वाढली आहे. यामुळे धण्याच्या भावाने ८ हजारांचा टप्पा पार केला. तर बाजार समित्यांमध्ये ७ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
यासगळ्यात हळद सुद्धा मागे नाहीये. असं म्हणतात की, गेली दोन वर्ष हळदीच्या बाजारात मंदी होती आणि एका महिनाभरात हळदीने गेल्या १३ वर्षांच्या किमतीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
१३ जून रोजी हळदीचे वायदे ७ हजार ६२० रुपये प्रतिक्विंटलवर होते आणि ऑगस्टपर्यंत हळदीने वायदे बाजारात १६ हजारांचा टप्पा पार केला आहे. म्हणजे सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर साधारण ७५ रुपये प्रतिकिलोने मिळणारी हळद आता जवळ जवळ १६० रुपये किलोने मिळतेय. हळदीच्या दारात अशीच वाढ होत राहणार असा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय. थोडक्यात मसाल्याच्या दरवाढीमुळे हळूहळू जेवणाच्या ताटाची चवंच जाईल असं म्हणायला हरकत नाही.
हे ही वाच भिडू :
- सिव्हिल वॉर झालं तिकडे अमेरिकेत पण त्यामुळंच मुंबईत पावभाजी जन्माला आली..
- अक्ख्या जगात जी भिवापुरी मिरची तिखट ठसके देते, ती आपल्या महाराष्ट्राची आहे भावांनो
- स्वयंपाकात हिंगाचं महत्व लक्षात घेऊन या बहिणींनी वयाच्या २० व्या वर्षी मोठा व्यवसाय उभारलाय
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.