शाहरुखला सुपरस्टार बनवण्यात अरमान कोहलीचा मोठा वाटा आहे…

बॉलिवूडमध्ये ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा वर आलं आहे. यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अरमान कोहलीला अटक केली आहे. ज्यावेळी अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकण्यात आला तेव्हा त्याच्याकडे ड्रग्ज असल्याचं आढळून आलं. पोलीस चौकशीत पोलिसांना समाधानकारक उत्तरं न दिल्याने अरमान कोहलीला अटक करण्यात आली.

पण अरमान कोहली हा काय साधासुधा माणूस नाही तर त्याने शाहरुख खानला सुपरस्टार बनवलं होतं. जाणून घेऊया काय किस्सा होता.

अरमान कोहलीने आपल्या करियरची सुरवात १९९२ साली विद्रोही या सिनेमातून केली होती. नंतर तो दिसला थेट जानी दुष्मन ; एक अनोखी कहाणी सिनेमात. पुढे प्रेम रतन धन पायो, कोहरा, वीर, एलओसी कारगिल सिनेमांमध्ये दिसला आणि शेवटी तो बिग बॉसमध्ये सुद्धा सहभागी होता. करिअरमध्ये जास्त काहीच विशेष न करू शकलेला अरमान कोहली वादाच्या भोवऱ्यात मात्र कायम अडकलेला दिसतो. 

तारक मेहता का उलटा चष्मा मधील बबिता उर्फ मुनमुन दत्ता सोबत अरमान कोहली रिलेशनशिप मध्ये होता पण मारहाण प्रकरणी सुद्धा अरमान कोहलीला दोषी ठरवलं होतं. अशा बऱ्याच प्रकरणांमध्ये तो अडकलेला असतो.

पण विषय आहे दिवाना सिनेमाचा ज्यामुळे शाहरुख खान सारखा हिरो बॉलीवूडला मिळाला. अरमान कोहली या सिनेमाचा पहिला हिरो होता.

या सिनेमाची घोषणा झाली आणि दिव्या भारती सोबत अरमान कोहलीचं पोस्टरही रिलीज करण्यात आलं. पण ऐनवेळी शेड्युल गंडल्याने अरमान कोहलीने या सिनेमातून काढता पाय घेतला.

पुढे हा सिनेमा मिळाला शाहरुख खानला. त्यावेळी शाहरुख खान हा मुंबईत सिनेमे मिळवण्यासाठी धडपड करत होता. ज्यावेळी शाहरुख खानला हा सिनेमा मिळाला तेव्हा तो प्रचंड खुश होता.

दिवाना सिनेमा प्रचंड गाजला. शाहरुख खान एका रात्रीत फेमस झाला. या सिनेमातली गाणी चांगली वाजली आणि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. दिवाना सिनेमापासून ते आजवर शाहरुख खानचं स्टारडम आपण बघतच असतो. पण हा सिनेमा सोडल्याने अरमान कोहलीची गाडी रुळावरून भलत्याच ट्रॅकवर गेली आणि तो बॉलिवूडमधून बाजूला होत गेला.

ज्यावेळी अरमान कोहलीला या चुकीबद्दल विचारलं गेलं तेव्हा तो म्हणाला कि, आता जे घडून गेलं त्यावर विचार करण्यात मजा नाही. मला उलट आनंदच झाला कि मी तो सिनेमा न केल्याने बॉलीवूडला एक चार्मिंग हिरो शाहरुख खान मिळाला. त्यावेळी परिस्थिती अशी होती कि मला सिनेमा सोडावा लागला. पण त्याचा मला अजिबात पश्चाताप नाही. शाहरुख खान आजही माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्या यशात मी खुश आहे. 

सुदैवाने दिवाना सिनेमा मिळालेला शाहरुख खान याबाबतीत म्हणतो कि मी दिवाणा सिनेमा करताना प्रचंड अस्वस्थ होतो. मला काहीच माहिती नव्हतं कि लोक के रिऍक्ट होतील. लोकांना माझा अभिनय आवडेल कि नाही अशी भीती माझ्या मनात होती. पण हा सिनेमा चांगला चालला आणि मला या सिनेमामुळे बॉलिवूडमध्ये स्थिरावता आलं.

आपल्या स्टारडम विषयी शाहरुख म्हणतो कि, यात जराही शंका नाही कि मला सुपरस्टार बनवण्यात सगळ्यात मोठा वाटा अरमान कोहलीचा आहे.

अरमान कोहलीने जर तो सिनेमा सोडला नसता तर आज चित्र वेगळं असतं. आजचा अरमान कोहली हा ड्रगच्या नादात दिवाना झालेला दिसतोय. पोलिसांनी त्याला अटक केल्याने त्याच्या उरल्यासुरल्या स्टारडमवरही गदा आली आहे. शाहरुखला सुपरस्टार जरी अरमान कोहलीने बनवलं असलं तरी इंडस्ट्रीत टिकून राहणं अरमान कोहलीला जमलं नाही हेही तितकंच खरं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.