कॉलेजमध्ये असताना देखील व्हिलन म्हणून दरारा होता. पास झाल्यावर गावाने मिरवणूक काढली होती…

बॉलिवुडमध्ये संघर्ष करणारे करणारे अनेक जण असतात पण एखादाच भिडू असा असतो जो आपल्या कामाने लोकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करतो. असाच एक नायक म्हणजे आशुतोष राणा. आजही बॉलिवूडमध्ये जेव्हा जेव्हा बेस्ट व्हिलन कोण याचा उल्लेख केला जातो तेव्हा तेव्हा आशुतोष राणा यांचं नाव वरच्या रांगेत असतं. आता ऍक्टिंग मध्ये आशुतोष राणा वाघ आहेतच पण एक किस्सा त्यांच्या कॉलेज काळातला.

10 नोव्हेंबर 1967 रोजी आशुतोष राणा यांचा जन्म मध्यप्रदेशात झाला. आपलं सगळं शिक्षण त्यांनी मध्यप्रदेश मधूनच पूर्ण केलं. पण आशुतोष राणा यांच्या भावाने एक किस्सा सांगितला होता की लहानपणी आशुतोष राणा यांना अभिनयाचं प्रचंड वेड होतं. गावातल्या छोट्या छोट्या नाटकांमध्ये ते भाग घेत असत. या नाटकांमध्ये सुद्धा त्यांच्यासारखा खलनायक कोणी रंगवत नसे आणि त्यातल्या त्यात आशुतोष राणा यांच्या वाट्याला कायम रामलीलामध्ये रावणाची भूमिका यायची. हे अभिनय करण्याचं फॅड त्यांच्या डोक्यात एकदम घट्ट बसलं होतं.

जबरदस्त व्हिलन म्हणून तेव्हाच त्यांची हवा सुरु झालेली पण नाटकात काम करत असल्याने साहजिकच अभ्यासाकडे दुर्लक्ष होणारच होतं आणि झालंही तसंच. 

घरच्यांना काळजी वाटू लागली की पोरगं हातातून जातं का काय ? कारण नाटक बिटक हे त्यांच्या डोक्याच्या बाहेरची गोष्ट होती. कसबस करत आशुतोष राणा यांनी नाटकात राहूनच 10 वी पास केली. 

कॉलेजात ऍडमिशन झालं आणि पुन्हा एकदा नाटक आणि परीक्षा यांचा संगम झाला. सगळ्यांना काळजी वाटू लागली की नाटकाच्या नादात अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं आहे आता आशुतोष राणा काय पास व्हायची चिन्ह दिसत नाही.

11 वीची परीक्षा सुरू झाली, परीक्षा संपली, निकालाचा दिवस उजाडला. पण सगळ्या गावाला माहिती होतं की आशुतोष राणा नापास होणार पण चमत्कार घडला आणि पास असा निकाल आल. आशुतोष राणा यांच्या पास होण्याचा उत्सव सगळ्या गावाने साजरा केला. एका लॉरीत बसवून आशुतोष राणा यांची मिरवणूक काढण्यात आली होती. निकाल आणि आशुतोष राणा हे एकत्र लॉरीत होते आणि पुढं लोकं नाचत होते.

पुढे एलएलबी केल्यावर वकिलीत आपण करिअर करू शकतो म्हणून ते पूर्णवेळ वकिली व्यवसायाकडे वळले. पण त्यांना त्यांच्या गुरूकडून सल्ला मिळाला की सिनेमात हात अजमावून पाहायला हरकत नाही. त्यामुळे आशुतोष राणा यांनी एनएसडी ( नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा) मध्ये ऍडमिशन घेतलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर एनएसडमधेच त्यांना चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर आली पण त्यांनी फिल्मी जगतात जाण्याचं पसंत केलं.

स्वाभिमान या टीव्ही सिरियलमध्ये पहिल्यांदा आशुतोष राणा यांना काम मिळालं. यानंतर फर्ज, साजिश, कभी कभी आणि वारिस असे अनेक टीव्ही शोज त्यांनी केले. हळूहळू ते सिनेमात काम करण्याकडे वळले. त्यानंतर तमन्ना, कृष्णा अर्जुन, दुश्मन आणि गुलाम या सिनेमांमध्ये ते झळकले. पण आशुतोष राणा यांना खरी ओळख मिळाली ती म्हणजे 1999 साली आलेल्या संघर्ष या सिनेमातून. या सिनेमासाठी आशुतोष राणा यांना 2000 साली बेस्ट ऍक्टर निगेटिव्ह रोल आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

संघर्ष सिनेमानंतर आशुतोष राणा बादल, राज, अनर्थ, हासिल, कलयुग, जिला गाजियाबाद, शोरगुल, सोनचिड़िया, वॉर आणि पगलैट या सिनेमात दिसले. पण आजही संघर्ष सिनेमा टीव्हीला लागल्यावर आशुतोष राणाला बघून काळजात धडकी भरते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.