३० हजार कोटींचा मालक असणारा मोदीभक्त बिझनेसमॅन १०० रुपयांच्या घरात आला. 

साधारण ५०-६० वर्षांपूर्वीचा काळ. त्या काळात कर्नाटकातल्या उडपी शहराच्या नगरपालिकेच्या इलेक्शन होत्या. या इलेक्शनमध्ये एक व्यक्ती उभा राहिलेला. जनसंघाकडून तो उमेदवार होता. नगरपालिकेच्या या छोट्याश्या इलेक्शनच्या प्रचारासाठी तेव्हा खुद्द अटलबिहारी वाजपेयी देखील आले आहे.

वाजपेयी यांच्यासोबत संघाच काम करणारा २० एक वर्षांचा तरुण देखील होता. या तरुणांच नाव नरेंद्र मोदी. नगरपालिकेच्या प्रचारासाठी आलेले हे दोन व्यक्ती पुढे जावून भारताचे पंतप्रधान झाले.. 

आणि ज्याच्यासाठी ते आले होते त्याचं काय झालं…. 

तर ते समजून घेण्यासाठी कट टू २०१५ मध्ये यावं लागतं.

ऑगस्ट २०१५. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून पहिला संयुक्त अरब अमिरातीचा पहिला दौरा होता. या दौऱ्यात UAE चा सर्वात मात्तब्बर भारतीय उपस्थित होता. मोदींसमोर भाषण करत असताना तो व्यक्ती म्हणाला, 

मी मोदीभक्त आहे, मोदींना मला वाघिणीचं दुध मागितलं तर त्यांच्यासाठी मी ते देखील आणून देईल… 

या माणसाचं नाव बी.आर. शेट्टी… अर्थात बावागुथू रघुनाथ शेट्टी… 

खूप खूप वर्षांपूर्वी उडपीत ज्याच्या प्रचारासाठी वाजपेयी आणि मोदी गेले होते तो आज UAE मधला सर्वात श्रीमंत भारतीय झाला होता. त्याला UAE ने त्यांच्या देशाचा सर्वांच्च पुरस्कार देवून गौरवलं होतं. अगदी त्यांच्या श्रीमंतीचा एक किस्सा सांगायचा झाला तर गायक येशूदास यांचा सांगता येईल.

एकदा येशूदास स्टेजवर गाणं म्हणतं होते.

बी.आर.शेट्टी यांना गाणं इतकं आवडलं की ते उठून स्टेजवर गेले आणि आपली रोल्स रॉईल्स त्यांना गिफ्ट दिली.. अगदी सहज… 

अगदी बिलियन डॉलरमध्ये खेळणारा हा माणूस सध्या उडपीतल्या त्याच्या घरी असतो. वर्षा दिड वर्षांपूर्वी त्यांच्या कंपनीची किंमत बिलीयन डॉलरच्या घरात होती. कर्नाटक आणि केरळ मधून UAE ला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा माणूस देवदूतासमान होता.. 

ही गोष्ट आहे बी.आर. शेट्टीं हा ब्रॅण्ड उभारला जाण्याची आणि कोसळण्याची… 

५० वर्षांपूर्वी BR शेट्टी उडपीतून नगरपालिकेवर निवडून आले. एकदा नाही तर दोनदा. ते देखील जनसंघाकडून. मात्र त्या काळात त्यांची परिस्थिती बेताचीच होती. अशा वेळी बहिणीच्या लग्नाचं निमित्त झालं. डोक्यावर कर्ज झालं आणि कर्ज फेडण्याचा पर्याय म्हणून या माणसाने UAE गाठलं.. 

केरळ, कर्नाटकातून अनेक माणसं अरब राष्ट्राचा पर्याय स्वीकारतात. तिथे मिळेल ते काम करतात आणि पाच-दहा वर्षात परततात. बी.आर. शेट्टी यांनी देखील तसच नियोजन केलेलं. UAE ला जाताना बी.आर. शेट्टी यांच्या हातात मेडिकलची डिग्री होती. एखाद्या औषध विक्रीच्या कंपनीसाठी ते तिथं जावून MR चं काम करु शकणार होते. 

ठरवल्याप्रमाणे शेट्टी UAE मध्ये उतरले.

खिश्यात आठ डॉलर होते. त्या काळात हे पैसे महिनाभर काढण्यासाठी पुरेसे होते. इतक्यामध्ये त्यांनी एका औषध निर्मीती करणाऱ्या कंपनीत MR ची नोकरी पकडली. प्रत्येक मेडिकल आणि डॉक्टरांकडे जावून औषध विकण्याची गळ घालण्याचं ते काम होतं. दिवस अन् रात्र हा माणूस काम करत राहिला. याच क्षेत्राची पदवी असणाऱ्या आपल्या बायकोला तो UAE ला घेवून आला. वर्षाभरात कर्ज फेडलं आणि आत्ता शांत डोक्याने पुढे काय करता येईल याचा विचार सुरू झाला. 

बी.आर.शेट्टीची स्वप्न लय मोठ्ठी होती.  एकामागून एक पैसै साठवून त्यांने भारतातल्या गावात बंगला बांधायचा सोडून न्यू मेडिकल सेंटरची स्थापना केली. आपल्या डॉक्टर बायकोकडून तिथे प्रॅक्टिस सुरू केली आणि तो स्वत: वेळ पडेल तसे साफसफाईच्या कामापासून ते ॲम्ब्युलन्स चा ड्रायव्हर म्हणून काम करु लागला. 

कट टू आपण भविष्यात येवुया 

मध्यंतरी मुंबईत सेवन हिल्स हॉस्पीटल विकत घेण्यासंबधित बोली लागलेली होती. यात प्रमुख दावेदार होते मुकेश अंबानी. पण बोली लावण्याच्या अखेरच्या क्षणी अंबानींनी माघार घेतली आणि हॉस्पीटल शेट्टी यांच्या मालकीचं झालं.. 

हेच बी.आर.शेट्टी NMC कंपनीचे मालक होते. अपोलो हॉस्पीटलचा ब्रॅण्ड आपल्याला माहिती असेलच. या ब्रॅण्डला १०,००० बेडची सेवा निर्माण करण्यास ३० वर्षांचा काळ लागला. मात्र शेट्टी यांच स्वप्न २० हजार बेडच होतं. एका बेडची सुविधा निर्माण करण्यास एक कोटी अशा गणिताने ते पुढे चाललेले.

UAE मध्ये मेडिकल सर्व्हिसमध्ये मोठ्ठी साखळी निर्माण करुन २०१३ पासून ते भारताकडे लक्ष ठेवून होते. तिरुवनंतपुरम् येथे SUT हॉस्पीटल्स, ओरिसा मधलं सर्वात मोठ्ठ आणि सर्वात आधुनिक अस सुपरस्पॅशलिटी कोर्पोरेट हेल्थ सेंटर आणि मुंबईच्या सेवन हिल्स हॉस्पीटलचा पाया रचण्यात आला होता.. 

हॉस्पीटलच्या या घौडदौड प्रमाणेच एक्सेंजमध्ये देखील या माणसाने स्वत:ला सिद्ध केलेलं… 

१९८० च्या दशकात त्याला लक्षात आलं की बॅंकेतून भारतात पैसे पाठवण्यासाठी वेळ तर लागतोच पण कमिशन देखील खूप जातं. कर्नाटक व केरळ मधील मजुरांच्या सोयीसाठी त्याने मनी रेमिटेंस फर्म अर्थात UAE एक्सचेंन्ज ची स्थापना केली होती. १९९९ साली एक्सप्रेस मनी या दूसऱ्या कंपनीची देखील स्थापना करण्यात आली. 

याचा वर्तमान सांगायचा झाला तर काही वर्षात या कंपनीच्या ३१ देशात ८५० शाखा होत्या. युनिमनी नावाने ते ओळखले जात होते. २०१४ साली ब्रिटनमधली सर्वात मोठ्ठी एक्सेंज कंपनी टॅव्हल एक्स  ला त्यांनी विकत घेतलं होतं. ती पण एक मिलियन पाऊंडला. 

त्यानंतर सर्व वित्तीय कंपन्यांच एकत्रीकरण करत फिनाब्लेअर नावाने हा व्यवसाय करण्यास सुरवात केली. दूसरीकडे आपल्या मेडिकल क्षेत्रातील वेगवेगळ्या संस्था एकत्रित करत २००३ साली नियोफार्मा कंपनीची स्थापना करण्यात आली. 

थोडक्यात काय तर या स्थिती बी.आर.शेट्टी रग्गड होते. २०१३ साली त्यांनी आसाम मध्ये १००० कोटी मोजून चहा पिकवणारी कंपनी विकत घेतलेली तर दूसरीकडे कॉफीचे मळे देखील विकत घेतले होते. बी.आर. शेट्टींच सगळं चांगल चाललेल. मोहनलाल यांना घेवून ते महाभारतावर आधारित १ हजार कोटी बजेट असणारा सिनेमा देखील काढणार होते. 

या दरम्यान त्यांना मंगद बंधुंच्या हातात कंपनी सोपवली… 

प्रशांत मंगद आणि प्रमोद मंगद हे कंपनीत छोट्या पदावरून विश्वासू झालेले. या दोन बंधुमधला प्रशांत मंगद NMC हेल्थचा कारभार पाहू लागले तर प्रमोद मंगद UAE एक्सचेंज चा कारभार पाहू लागले. आत्ता या दोघांचा इतिहास म्हणजे त्यांनी CA म्हणून करियरची सुरवात केलेली. प्रशांत मंगद हा तामिळनाडू केरळच्या कोटक मंहिद्रा कारभार संभाळू लागला आणि प्रमोद मंगद एलस्टॉम लिमिटेडचा सहाय्यक होता. या पदावरून ते बी.आर.शेट्टींना जॉईन झालेले. 

प्रशांत मंगद यांचा सक्सेस म्हणजे त्यांच्यामुळे कंपनी लंडन स्टॉक एक्सेंजला लिस्टेड झाल्याचं सांगितलं जातं. लिस्टेड झाल्यानंतर एका वर्षातरच कंपनीची ग्रोथ वाढून शेअर्सप्राईज २० टक्यांनी वाढली. एकूण कॅपिटलायझेशन १० बिलियन डॉलर झाल्याच सांगण्यात येत. 

दूसरीकडे प्रमोद यांच्या पुढाकारातून वित्तीय संस्था फायनॅन्शियल टाईम्स स्टॉक एक्सेंजमध्ये लिस्टेट झाली कंपनीचं मुल्य १.८ बिलीयन डॉलर झालं. 

सगळं चांगल चाललं होतं. पण अचानक बॉम्ब फुटला… 

७ ऑगस्ट २०१९ रोजी एक ट्विट पडलं आणि इतक्या मोठ्या सम्राज्याला घो@ लागण्यास सुरवात झाली. झालं अस की लंडनमध्ये मडी वॉटर्स नावाची रिसर्च कंपनी आहे. या रिसर्च कंपनीने यापूर्वी चीन मधल्या कंपन्यांचा घोटाळा उघडकीस आणलेला. याच कंपनीकडून एक ट्विट टाकण्यात आलं. त्यात अस लिहलं की लंडन स्टॉक एक्सेजमध्ये सुचिबद्ध असणाऱ्या एका कंपनीचा घोटाळा आम्ही लवकरच उघडकीस आणणार आहोत. 

ही NMC म्हणून लोकांनी अंदाज बांधला आणि शेअर्स ढासळण्यास सुरवात झाली. पुढे UAE एक्सेंज देखील कोसळू लागलं. 

डिसेंबर २०१९ साली या रिसर्च कंपनीने अहवाल मांडला आणि सांगितलं की NMC ने आपलं कर्ज २.२ बिलीयन डॉलर सांगितलं आहे पण प्रत्यक्षात ते ६.६ बिलीयन इतक आहे. झालं स्टॉक गडगडला आणि शेट्टी जमिनीवर आले. 

इतकं मोठ्ठ साम्राज्य दणक्यात पडलं. लॉकडाऊनच्या काळात भावाच्या तब्येतीमुळे ते उडपीतल्या घरात आले आणि लॉकडाऊनमध्ये अडकले. आपल्या १६ मालमत्तांच्या विरोधात बॅंक ऑफ बडोदाकडून त्यांनी हजार कोटींचा कर्ज घेतलेलं त्यांच्याही कारवाया सुरू झाल्या व मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई करण्यास प्रक्रिया सुरू झाली.. 

आत्ता सध्या इस्त्रायल आणि UAE यांच्यामध्ये व्यापारी संबंध प्रस्थापित होत असून त्यांच कर्ज फेडून कंपनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कर्ज फेडल्यानंतर बी.आर.शेट्टी यांच्याकडे कंपनीतून अधिकचे १ डॉलर मिळतील अस सांगण्यात येत आहे.. 

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.