बाबरी पाडणाऱ्या कारसेवकांनी लेखी जबाबाच्या वेळी मात्र घुमजाव केलेलं..!!!

श्रेय घ्यायचं कारण नाही, सगळ्या राम सेवकांनी केलेलं ते काम आहे, म्हणूनच कोणत्याही भाजपच्या नेत्याला विचारलं बाबरीचा ढाचा कोणी पाडला तर तो सांगतो, 

ते कारसेवक होते..

कल्याणसिंग यांना त्यावेळी विचारण्यात आलं होतं, बाबरी कोणी पाडली. तेव्हा ते म्हणाले होते, साडेतीन लाख कारसेवक समोर होते, मी कशा गोळ्या झाडण्याची ऑर्डर देणार. ते तर रामसेवक होते. 

कल्याणसिंग यांनी रामासाठी आपलं सरकार सोडलं आणि तूम्ही…. 

ज्यांनी राम खरच जन्माला आले होते का हा प्रश्न विचारला त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसला.

काल दिनांक १ मे रोजी राज्यात दोन सभा झाल्या त्यातील एका सभेतला हा डॉयलॉग.

हा डॉयलॉग मारला गेला तो भाजपच्या सभेत आणि डॉयलॉग मारणारे नेते होते देवेंद्र फडणवीस.. 

शिवसेना बाबरी ढाचा पाडण्यात कुठेच नव्हती, मी स्वत: तिथे होतो आणि कारसेवकांनी बाबरी पाडली अस देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात सांगितलं..

बाबरी पाडण्यात आली ती तारिख होती ६ डिसेंबर १९९२.. 

काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सभा झाली ती तारिख होती १ मे २०२२.. 

सुमारे ३० वर्षांपूर्वीची घटना. पण ही घटनाच अशी होती की यामुळे देशाच्या राजकारणात मंडलचा प्रश्न मागे पडून कमंडलचं राजकारण सुरू झाल्याचं सांगितलं जातं. आजही बाबरी कोणी पाडली हा विषय चर्चेत येतो आणि अशी चर्चा सुरू झाल्यावर “कारसेवकांनी” बाबरी पाडल्याचं उत्तर देण्यात येतं. 

कारसेवक म्हणजे नक्की कोण होते..? 

मुळात हा शब्द कारसेवक नसून करसेवक असा होता. या शब्दाचा इतिहासातील एका कथेत आहे. यानुसार मुघल बादशहा जहांगिर अमृतसरला आला होता. या जहांगिरने अकाल तख्त च्या बांधकामासाठी मदत करण्याचा प्रस्ताव हरगोविंद सिंग यांच्यासमोर ठेवला होता. तेव्हा या मदतीला नम्रपणे नकार देत हरगोविंग सिंग म्हणाले होते, 

“अकाल तख्त का निर्माण उसके अनुयायी के कारसेवा से ही होना चाहिये.”

निस्वार्थ भावनेने मंदिर उभारण्यासाठी आपल्या हातानी केलीली सेवा म्हणजे करसेवा, याचाच अर्थ कारसेवा म्हणून घेतला गेला.

मंदीर बांधण्यासाठी आलेले लोकं मग ते भाजपचे असतील, संघाचे असतील, शिवसेनेचे असतील किंवा कोणत्याही पक्षाचे असतील अशा सर्वांना कारसेवक म्हणण्यात आलं.  यामध्ये जास्तकरून भाजप व संघाचे स्वयंसेवक असल्याने कारसेवक हा शब्द त्यांच्यासोबत जोडला गेला.

कारसेवकांनी बाबरी पाडल्याचा दावा केला पण मोक्याच्या क्षणी घुमजाव केले. 

लाखोंच्या जमावात कारसेवकांनी बाबरी पाडली. त्यानंतर प्रत्येक कारसेवक आपण बाबरी कशी पाडली हे सांगत होता. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने मशीद तोडल्याप्रकरणी चौकशी चालू केली होती. मशिद तोडत असताना २५ कारसेवक जखमी झाले होते व त्यांच्यावर फैजाबाद येथील रुग्णालयात उपचार चालू होते.

तेथे उपचार झाल्यानंतर या २५ जणांना अटक करण्यात आलं होतं. स्थानिक पोलीसांनी सांगितलं होतं की, हे २५ जण मशिद तोडण्याच्या कामात पुढे होते व काहीजण बांधकाम कोसळत असताना त्यात अडकले गेले व जखमी झाले. 

जेव्हा गुप्तचर अधिकाऱ्यांनी या कारसेवकांची मुलाखत घेतली तेव्हा आपल्या अंगात दैवी शक्ती संचारली व आपल्या हातून हे काम झाल्याचं त्यांनी मान्य केलं. देशाच्या वेगवेगळ्या भागातून हे कारसेवक आले होते. 

गुप्तचर अधिकाऱ्यांनी खोलात जावून माहिती घेतली तेव्हा तीन महिन्यापासून बाबरी पाडण्यासंबधात प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली होती.

सोबतच तीनशे छप्पन कारसेवकांची यादी गुप्तचर खात्याकडे होती तर पांचजन्य मध्ये ७० कारसेवकांची नावे छापण्यात आली होती. दूसरीकडे दुखापत होवून फैजाबादच्या रुग्णालयातून उपचार होवून गेलेल्या २६१ जणांची यादी देखील गुप्तचर विभागाने घेतली होती.. 

मात्र यातल्या अनेक कारसेवकांनी लेखी जबाबाच्या वेळी मात्र घुमजाव केलं होतं. अशी बातमी ३ जानेवारी १९९३ रोजी महाराष्ट्र टाईम्समध्ये छापून आली होती. 

या बातमीनुसार,

बाबरी मशीद तोडताना जखमी झालेल्या २५ मुख्य कारसेवकांपैकी एकहीजण आपण हे कृत्य केले असा लेखी जबाब देण्यास तयार नाही. मात्र या सर्व जणांनी त्याआधी गुप्तचर अधिकाऱ्यांना तोंडी सांगितलं होतं की, ६ डिसेंबरला महाशक्ती संचारल्याने आपण मशिदीच्या घुमटावर चढलो होतो, पण लेखी निवेदन देताना मात्र त्यांनी घुमजाव केलं. 

ही बातमी केली होती जेष्ठ पत्रकार जयप्रकाश प्रधान यांनी.. 

त्यांनी बातमीमागची बातमी अस पुस्तक लिहलं आहे, या पुस्तकातून आपल्या अनेक गाजलेल्या बातम्यांच्या मागच्या बातम्या कशा मिळवल्या ते सांगण्यात आलं आहे. याच पुस्तकात मशीद पाडणाऱ्या कारसेवकांचे लेखी जबाबाच्या वेळी मात्र घुमजाव या बातमीमागचा किस्सा त्यांनी सांगितला आहे, 

यात ते सांगतात. ६ डिसेंबरला बाबरी पडल्यानंतर प्रत्येक कारसेवक बाबरी मशिद आम्ही पाडली अस अभिमानाने सांगत होता. पुढे CBI कडे हा तपास सोपवण्यात आला. CBI ने त्यासाठी खास विभाग सुरू केला. संबधित घटनेचा पुरावा गोळा करणं, लेखी जबाब घेणं या कामाला सुरवात झाली. माझे एक मित्र IPS अधिकारी एच.एन. सांभार्य या विशेष पथकाच्या प्रमुख पदावर होते. 

जयप्रकाश प्रधान लिहतात, 

एक दिवस आम्ही त्यांच्या मुंबईतील टन्ना हाऊसमध्ये कार्यालयात गप्पा मारत बसलो होतो. इतक्यात एक अधीक्षक दर्जाचा अधिकारी आत आला आणि साहेबांना म्हणाला की, मशीद पाडणाऱ्या या गटातील कार्यकर्ते लेखी जबाब द्यायला तयार नाहीत. 

सांभार्य जरासे अचंबित झाले व त्यांनी विचारलं अस कसं? दोन दिवसांपूर्वी तर आपल्यासमोर आपण बाबरी मशीद कशी तोडली आपल्यात महाशक्ती कशी संचारली असं ते अगदी अभिमानाने सांगत होते. 

हो, ना !!! पण काल आम्ही जेव्हा सांगितल की, तुमचे लेखी जबाब घेतो , त्यात तुम्ही हे सर्व व्यवस्थितपणे सांगा अस म्हणताच सर्वजण गप्प झालेयय 

ते अधिकारी हसत म्हणाले, 

“असा प्रकार चौथ्यांदा घडतोय”

सांभार्य यांनी यापुढे जावून सांगितलं की, आम्ही ज्यांनी ज्यांनी पेपरमध्ये बाबरी पाडल्याचा दावा केला त्या सर्वांना संपर्क साधून जबाब नोंदवण्यास सुरवात की पण एकही जण कबुली देण्यास तयार नव्हतं.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.