भाजप अध्यक्ष कम्युनिस्ट नेत्याच्या कार्यालयात जाऊन आशिर्वाद घेतो…

विचारधारा ही खूप मोठ्ठी गोष्ट आहे. म्हणजे काही नेते असे असतात जे खूर्ची पणाला लावतात पण आपली विचारधारा सोडत नाहीत. मग ती विचारधारा कोणतीही असो.

जस की भाई उद्धवराव. भाई उद्धवरावांना यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. त्यासाठी भाईंनी शेकाप सोडून कॉंग्रेसमध्ये यावं अशी अट होती. पण भाई उद्धवराव म्हणाले, मी मेल्यानंतर देखील लाल झेंड्यातूनच माझा देह जावा.

सत्तेसाठी आज एका पक्षात तर उद्या दूसऱ्या पक्षात जाणारे नेते आहेत तसेच मरेपर्यन्त एकाच पक्षात राहून विचारधारेसोबत प्रमाणिक राहणारे नेते देखील आहेतच.

आत्ता दूसरा मुद्दा येतो तो म्हणजे कोणती विचारधारा चांगली आणि कोणती वाईट. तर भिडूंनो खरं सांगू का, अस काही नसतं. किती झालं तरी विचारधारा म्हणलं की बुद्धीने विचार करण्याची गोष्ट आली. फक्त अभ्यासपूर्वक एखाद्या विचारांसोबत प्रामाणिक राहिलात की तुमची विचारधारा चांगलीच असते.

राजकिय विरोध आणि व्यक्तिगत विरोध या दोन भिन्न गोष्टी असतात. राजकारण करत असताना विचारांचा विरोध असू शकतो पण माणसांचा नाही. हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीने जपलेली गोष्ट आहे.

हेच सांगणारा हा एक अफलातून किस्सा.

झालेलं अस की तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नितीन गडकरी यांची निवड करण्यात आली होती. एका मराठी माणसाची निवड झाल्याने महाराष्ट्रात तस उत्साहाचं वातावरण होतं. आपली निवड झाल्यानंतर नितीन गडकरी पहिल्यांदा नागपूरात येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नागपूर शहर नटलं होतं.

अशा वेळी नितीन गडकरी यांनी आशिर्वाद घेण्यासाठी फोन केला तो ए.बी.बर्धन यांना.

ए.बी. बर्धन म्हणजे भाई बर्धन. कम्युनिस्ट चळवळीचा मोठ्ठा माणूस. अगदी एखाद्या मोडक्या स्टुलावर रात्ररात्र झोपून आपल्या विचारांवर प्रामाणिक राहिलेला हा नेता. महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या डाव्या चळवळीच्या प्रमुख चेहऱ्यापैकी ते एक होते. आपले सुखासुखीचे आयुष्य सोडून कष्टकरी कामगार लोकांच्या हक्कांसाठी ते लढले. आयटकचे ते महासचिव देखील राहिले होते.

अशा या कम्युनिस्ट चळवळीतच्या प्रमुख नेत्याला नितीन गडकरी यांनी फोन केला आणि आशिर्वाद घेण्यासाठी तूम्हाला भेटायचं आहे म्हणून वेळ मागितली. भेटायचं ठरलं पण कुठे हा प्रश्न होता. वर्धन हे कार्यालयात रहात. नितीन गडकरी यांच्या घरी यावं तर ते अप्रस्तृत ठरणार होतं.

यावर पर्याय म्हणून गडकरींनी विचारलं,

मी तूमच्या पक्ष कार्यालयात आलं तर चालेल का?

हा अत्यंत धाडसाचा निर्णय होता. कारण केरळ सारख्या राज्यांमध्ये कम्युनिस्ट विरुद्ध राष्ट्रिय स्वयंसेवक संघ असा उभा दावा होता. गेल्या दशकांमध्ये कित्येक स्वयंसेवकांच्या हत्या घडवून आणल्याचा आरोप संघ करत आहे. अशा वेळी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आशिर्वाद घेण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात जातो ही गोष्टच सहन न होणारी होती.

तरिही मोकळेपणाने नितीन गडकरी यांनी कम्युनिस्ट कार्यालयात येण्याची त्यांना विनंती केली व मोकळेपणाने भाई वर्धन यांनी ती मान्य केली.

ठरल्याप्रमाणे नितीन गडकरी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात गेले. कम्युनिस्ट नेते त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. नितीन गडकरी भाई बर्धन यांच्या जवळ गेले, त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले,

चांगले काम करण्यासाठी मला तुमचे आशिर्वाद पाहिजेत. मी तूम्हाला आयकॉन मानतो.

नितीन गडकरी हा किस्सा सांगताना म्हणतात,

मला त्यांचे एक वाक्य नेहमी आठवते, नदीचा प्रवाह जेव्हा वाहतो तेव्हा कचरा त्याच्यासोबत वाहतो. अगदी मेलेला मासा देखील प्रवाहासोबत वाहतो पण जिवंत मासा प्रवाहाच्या विरोधी दिशेने पोहत असतो. प्रवाह कसाही असो पण दिशा ठाम असली पाहीजे. मतभिन्नता चालू शकेल पण विचारशून्यता नसावी.

नितीन गडकरींच्या या कृतीतून फक्त एकच गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे कितीही टोकाचे मतभेद असू शकतात पण समोरच्या व्यक्तींच्या विचारधारेबाबत नेहमीच आदर असायला हवा.

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.