साबणाच्या फॅक्टरीत मजुरी करणारा मुलगा भारताचा ग्रेटेस्ट कॉमेडियन जॉनी लिव्हर बनला..

आजवर आपण अनेक सक्सेस स्टोऱ्या ऐकत आलो आणि अजूनही ऐकतोच आहे. कोणी विनातिकीट प्रवास केला, कोणी अर्धा वडापाव खाऊन दिवस काढले कोणी काय केलं तर कोणी काय काय केलं. स्ट्रगल करून मोठी झालेली अनेक लोकं आहेत. पण ज्या ज्या वेळी स्ट्रगल आणि सक्सेस या गोष्टी येतात त्यावेळी जॉनी लिवरचा नंबर सगळ्यात वरचा आहे.

जॉनी लिवर हा माणूस कधी सेलिब्रिटी वाटत नाही , तो कायम आपल्याला आपला कट्ट्यावरचा मित्र, कॉलेजमधला कायम हसवणारा मित्र वाटत राहतो. रस्त्यावर पेन विकण्यापासून ते हिंदुस्थान लिवर कंपनीत काम करून आपल्या टॅलेंटची ओळख सगळ्यांना त्याने करून दिली. पण एकेकाळी जॉनी लिवरच्या वाट्याला आलेला संघर्ष ते आज देशातला सगळ्यात उच्च दर्जाचा विनोदी अभिनेता असा रंजक प्रवास आपण जाणून घेऊ.

१३ वर्षाचा जॉनी लिवर आत्महत्या करायला जातो

सुरवातीच्या काळात जॉनीच्या घरची परिस्थिती बरी नव्हती. सुरवातीला एका चाळीत राहणारं जॉनीचं कुटुंब इतकं डबघाईला आलं कि त्यांना धारावी झोपडपट्टीत शिफ्ट व्हावं लागलं. जॉनीने वडील प्रकाश राव हे हिंदुस्थान लिवर कंपनीत कामाला होते. दारूचा भयानक नाद त्यांना होता, दारू पिऊन येऊन ते घरच्या लोकांना बेदम झोडपून काढायचे, चाळीतल्या लोकांशी भांडण करायचे यामुळे जॉनीला त्रास होऊ लागला होता.

या रोजच्या त्रासाला कंटाळून जॉनी आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर अक्षरशः झोपला होता पण जेव्हा ट्रेनचा आवाज ऐकू येऊ लागला तस तसं त्याच्या डोळ्यापुढं घरचे लोकं दिसू लागले. मग परत घाबरून तिथून उठून तो घरी आला आणि आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाकला.

सातव्या वर्गापासून जॉनीने शाळा सोडली, त्याला पैसे कमवायचे होते. डान्स आणि कॉमेडी यामध्ये तो मास्टर होता. मोठमोठ्या हिरोंची तो मिमिक्री करायचा. ज्यावेळी त्या भागात कोणाच्या घरी काही कार्यक्रम असेल तेव्हा ते जॉनीला कार्यक्रम सादर करायला लावायचे आणि मानधन म्हणून १-२ रुपये द्यायचे.

झोपडपट्टीच्या शेजारी एक सिंधी कॅम्प होता , तिथले दोन लोकं प्रताप जानी आणि राम कुमार हे जॉनीला मिमिक्री शिकवायचे. जॉनी या दोघांना त्याचे गुरु मानतो. पण एका माणसाने जॉनीला सांगितले कि त्यांच्या संगतीत राहू नको, नाहीतर दारुडा बनशील. मग त्याने जॉनीला विचारले पेन विकण्याच्या कामाबद्दल सांगितलं.

तीन महिने जॉनी लिवर पेन विकत होता. त्याच्यात असलेला कलाकार त्याला गप्प बसू देत नव्हता , तेव्हा त्याने वेगवेगळ्या आवाजात पेन विकायला सुरवात केली, लोकं त्यावेळी केवळ त्याची मिमिक्री बघता यावी म्हणून पेन विकत घेऊ लागले. यामुळे जॉनीला पैसेही मिळू लागले कलाही जपता येऊ लागली.

साबणाच्या फॅक्ट्रीत काम करणारा जॉनी

जॉनी त्यावेळी लहान वयातंच स्टेज शो करू लागला होता. पण जेव्हा तो १८ वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला हिंदुस्थान लिवर कंपनीत काम चिटकवून दिलं. साबण बनवायच्या कॅटेलिस्टडिपार्टमेंट मध्ये झाडू मारणे, वस्तू उचलून त्या त्या जागी ठेवणे अशा प्रकारची कामं तो करू लागला.

पण स्टेज शो मिळू लागल्याने तो मधेच कामावर दांडी मारून जायचा. कारण असंही नोकरी करण्यात त्याला रस नव्हता आणि जास्त पगारही नव्हता. त्याच्या या कारनाम्यामुळे सुपरवायझर लोकं त्याच्यावर ओरडू लागले, पण दुसरीकडे त्याला त्याच्या कलाकारीच्या जोरावर टाळ्याही मिळत होत्या.

एक दिवस जॉनीच्या वडिलांना हि कुणकुण लागली कि हा बहाद्दर नोकरी सोडून शो करण्यासाठी गेलेला आहे. हातात रबरी पाईप घेऊन ते षण्मुखानंद ऑडिटोरियम मध्ये पोहचले तेव्हा हजारो लोकांना हसवणारा जॉनी त्यांनी बघितला. पण त्याच वेळी बापाच्या हातात रबरी पाईप जॉनीने बघितला आणि त्याने स्टेजवरून धूम ठोकली.

हिंदुस्थान लिवर कंपनीत एक कार्यक्रम असताना जॉनीला काहीतरी करून दाखव म्हणून सांगण्यात आलं. त्यात जॉनीने सिनियर ऑफिसर असलेल्या लोकांची मिमिक्री केली आणि सगळ्यांना खुश केलं. त्यावेळी युनियन लीडर सुरेश भोसले यांनी जॉनीला सांगितलं कि,

आज तुने पुरे लिवर कि कर डाली. आज से तेरा नाम जॉनी लिवर.

या घटनेवरून जॉनी रावचा जॉनी लिवर झाला.

पुढे जॉनी कंपनीपासून वेगळा झाला आणि पूर्णवेळ स्टॅन्ड अप कॉमेडीकडे वळला. त्याच्या बॉलिवूडमध्ये बऱ्याच ओळखी झाल्या त्या त्याने मोठमोठ्या हिरोच्या केलेल्या मिमिक्रीमुळे. संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्यासोबत तो शो करू लागला त्यावेळी त्याला एका शोचे ३० रुपय मिळायचे. खुद्द शत्रूघ्न सिन्हा जॉनीने केलेली त्यांची मिमिक्री पाहण्यासाठी यायचा.

कुठलाही अश्लील जोक नाही कि देवा धर्मावर आधारित जोक नाही , कायम वेगवेगळ्या विषयांवर जॉनी लिवर यांचे स्टॅन्ड अप असतं, आणि लोकं पोट धरून हसत. भारतातले सगळ्यात प्रसिद्ध स्टॅन्ड अप कॉमेडियन म्हणून जॉनी लिवर प्रसिद्ध आहे.

१९८२ साली दर्द का रिश्ता या चित्रपटात सुनील दत्त यांनी जॉनीला संधी दिली. जस जसे चित्रपट मिळत गेले तेव्हा दिग्दर्शक लेखक जॉनीच्या वाटेचे सीन्स लिहीत नसे , जॉनी लिवर स्वतः त्याचे सिन लिहीत असे आणि डिझाईन करत असे. १९९३ साली आलेल्या बाजीगर चित्रपटाने जॉनी लीवरच्या करियरला मोठ्या उंचीवर नेलं.

इतक्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं कि सांगता येणार नाही, केवळ जॉनी लिवर चित्रपटात आहे म्हणून सिनेमे हिट व्हायचे. खिलाडी, चमत्कार, बादशाह, करण अर्जुन, गोलमाल अशा अनेक चित्रपटात जॉनी लिवर आपल्या भूमिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवतात.

प्रचंड संघर्ष करून मिळवलेल्या यशाचं उदाहरण म्हणजे जॉनी लिवर.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.