द्वारकेवरचा विजय सेलिब्रेट करणारा पाकिस्तान आजही जगभरात चेष्टेचा विषय बनला आहे.

१९६५ चे भारत पाकिस्तानमधील युद्धाने त्याच्या चरमसीमेवर होतं. पश्चिम सीमेवर भारताची सेना आणि हवाईदल पाकिस्तान्यांना झोडपून काढत होते. भारताचा वाढलेला जोर कमी करण्यासाठी पाकिस्तानला काही तरी पावले उचलावी लागणार होती.

७ सप्टेंबरची रात्र, पाकिस्तानी नौदलाची पीएनएस बाबर, पीएनएस खैबर, पीएनएस शहाजहान, पीएनएस आलमगीर, पीएनएस बदर,पीएनएस जहांगीर आणि पीएनएस टिपू सुलतान ही सात जहाजे काळोखात भारतीय हद्दीत घुसली. 

रात्री जवळपास साडे दहा वाजता ते गुजरात किनाऱ्यावर पोहचले. त्यांचं मुख्य लक्ष्य होतं भारतीयांच्या आस्थेचं तीर्थक्षेत्र “द्वारका” 

हल्ल्याचं ठिकाण द्वारकाच का निवडलं या मागे त्यांची आणखी काही कारणे होती. एक तर हे कराची बंदरापासून फक्त २०० किलोमीटर इतक्या जवळ होतं. तिथे असलेल्या रडारस्टेशनचा वापर करून भारतीय लढाऊ विमाने पाक हद्दीत मोठं नुकसान करत होती. या सर्वांचं लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून पाक नेव्हीने हा हल्ला केला होता.

दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या जुन्या नौका द्वारकेच्या किनाऱ्यावर आल्या. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार त्यांनी द्वारकेवर जोरदार बॉम्ब वर्षाव केला. त्यांनी द्वारकेच्या मंदिराचं नुकसान तर केलंच शिवाय तिथल्या रेल्वेस्टेशन व बिल्डिंगवर ही  बॉंम्ब गोळे पडले. द्वारकेतून येणारा धूर दिसल्यावर हि पाकिस्तानी जहाजे वेगाने परत कराचीच्या दिशेने फिरली.

तिथल्या प्रत्यक्ष दर्शींच्या मते पाकिस्तानची जहाजे फक्त ४ मिनिटांसाठी द्वारकेच्या सीमेवर होती. भारतीय एअरफोर्स आणि तिथून जवळच तैनात असलेल्या तलवार या युद्धनौकेच्या भीतीने त्यांनी कसेबसे ४० बॉम्ब टाकले आणि तिथून पाबोरा केला.

सकाळच्या उजेडात पाहणी केल्यावर दिसलं कि पाकिस्तानच्या जहाजांनी टाकलेल्या बॉम्ब पैकी अनेक बॉम्ब दलदलीत पडलेली दिसली. या पैकी कित्येक बॉम्ब तर फ़ुटलेच नव्हते. या सर्व हल्ल्यात त्यांच्या जहाजाने भारताची फक्त एक गाय मारली होती.

पण तिकडे पाकिस्तानमध्ये मात्र जोरदार जल्लोष सुरु झाला. त्यांच्या मीडियाने तर १९६५ च युद्ध आपण जिंकलेच असल्याप्रमाणे बातम्या दिल्या. भारतीय नौदलाचे नाक कापल्याची वलग्ना करण्यात आली. याला उत्तर देण्यासाठी भारताचे नौदलाचे जवान फुरफुरू लागले.

तेव्हा भारतीय नौदलाचे प्रमुख होते “भास्कर सदाशिव सोमण”

भारतीय नौदलाचे पहिले मराठी सरखेल म्हणून सोमण यांना ओळखलं जायचं. 

मूळचे बेळगावचे पण त्यांचा जन्म ग्वाल्हेर येथे झाला. शिक्षण राष्ट्रीय शाळेत झाले असल्यामुळे राष्ट्रभक्तीचा सुप्त वारसा होताच. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची रॉयल इंडियन मरिनसाठी निवड झाली आणि ग्रेट ब्रिटन येथे प्रशिक्षणासाठी त्यांना पाठवण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते फर्स्ट लेफ्टनंट होते. तांबडा समुद्र व इराणचे आखात यांमध्ये हिज मॅजेस्टिज इंडियन शिप (एच्.एम्.आय्.एस्.) ‘कॉर्नवॉलिस’ या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर म्हणूनही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजाविली.

इटालियन पाणबुडी ‘गॅलिलिओ गॅलिलाय’ला एडनजवळ पकडण्यात सोमण यांचा सिंहाचा वाटा होता.

स्वातंत्र्यानंतर रिअर ॲडमिरल या पदी त्यांची निवड झाली. गोवा मुक्ती संग्रामातील ‘ऑपरेशन विजय’ मोहिमेत नौदलाची सर्व जबाबदारी सोमणांकडेच होती.  या कामगिरीच्या बळावरच ते १९६२ साली रामदास कटारी यांच्या निवृत्तीनंतर स्वतंत्र भारताचे दुसरे आणि पहिले मराठी नौदलप्रमुख बनले.

१९६५ च्या युद्धात ते तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या समितीचेही प्रमुख होते. यामुळे युद्धाच्या प्लॅनिंगची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती.

द्वारकेवर झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यामुळे आपलं नुकसान झालं नसलं तरी हा हल्ला म्हणजे आपला अपमान होता. प्रचंड चिडलेल्या ऍडमिरल भास्करराव सोमण यांनी अख्ख  पाकिस्तानी नौदल अरबी समुद्रात बुडवण्याचा इरादा केला. कराची बंदरावर हल्ला करण्याची तयारी देखील सुरु करण्यात आली.

तेव्हा भारताचे पंतप्रधान होते लालबहादूर शास्त्री आणि संरक्षणमंत्री होते यशवंतराव चव्हाण.

मराठी भाषिक असल्यामुळे यशवंतरावांशी सोमण यांचा चांगला संवाद होता. भास्करराव सोमण यांची देशाप्रतीची  निष्ठा आणि त्यांचे समर्पण याबद्दल यशवंतरराव चव्हाण यांना खात्री होती. त्यांनी व शास्त्रीजींनी भास्करराव सोमण यांना बोलावून घेतले. 

सध्या पाकिस्तानने केलेला द्वारकेवरचा हल्ला हा त्यांचा एक मोठा डाव होता. त्यांना प्रत्युत्तर देण्याच्या नादात मुंबई मध्ये उभ्या केलेल्या नौका हलवणे म्हणजे पाकिस्तानच्या गाझी या पाणबुडीसाठी रस्ता मोकळा करून दिल्याप्रमाणे होणार होते. हवाई दल आणि आर्मीच्या जोरावर आपण युद्ध जिंकणार याची खात्री होतीच. त्यामुळे फक्त भावनेच्या भरात वाहून जाऊन नौदलाला युद्धात उतरवणे गरजेचे नव्हते.

ऍडमिरल सोमण यांना अखेर हे पटले. उच्चस्तरीय आदेशामुळे भारतीय नौदलाने कराचीवर हल्ला करण्याचा निर्णय मागे घेतला. अखेर संयमाचा विजय झाला. २३ सप्टेंबरला युद्ध थांबलं तेव्हा भारताचा मोठा विजय झाला. आपल्या हद्दीत घुसलेल्या पाक सैन्याला पळवून लावण्यात आलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची छी थू करण्यात आली.

गिरे तो भी टांग उपर या उक्तीप्रमाणे पाकिस्तान मात्र शेवट पर्यंत ऑपरेशन द्वारका आम्ही जिंकलो याच्याच कथा सांगत राहिला. पण फक्त एक गाय मान्य एवढं आपलं कर्तृत्व होत होत ते त्यांनी सोयीस्कर रित्या लपवलं.

आजही पाकिस्तानमध्ये ८ सप्टेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातून मात्र त्या दिवशी पाकिस्तानची मोठी खिल्ली उडवली जाते. 

कितीही चेष्टा झाली तरी द्वारकावर झालेल्या हल्ल्यामुळे मात्र भारतीय नौदलाने काही दुरोगामी निर्णय घेतले. नौदलाचे बजेट ३५ कोटींवरून थेट ११५ कोटी करण्यात आले. या पैशातून सोव्हिएत रशिया कडून मिसाईलवाहू बोटी खरेदी करण्यात आल्या. याच बोटींनी १९७१च्या युद्धात ऑपरेशन ट्रायडंट मध्ये पाकिस्तानी बोटींना समुद्रार्पण केले.

तब्बल सात दिवस कराची बंदर जळत होते, त्यावेळी द्वारकेवरच्या हल्ल्याचा बदल पूर्ण झाला होता.

व्हाईस ऍडमिरल भास्करराव सोमण जून १९६६ मध्ये नौदलातील प्रदीर्घ सेवेतून ते निवृत्त झाले.

त्यांना भारत सरकारने निवृत्तीनंतर भारतातील एका छोट्या राज्याचे राज्यपालपद व परदेशात भारताचे राजदूतपद या दोन उच्चपदाचे प्रस्ताव पाठविले; परंतु ती दोन्हीही पदे त्यांनी नाकारली आणि आपले उर्वरित आयुष्य सामाजिक कार्यात व्यतीत केले.

डिसेंबर १९९४ मध्ये सोमण यांना सौम्य पक्षाघाताचा झटका आला. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकाधिक बिघडू लागली. त्यातच त्यांचे पुणे येथे राहत्या घरी निधन झाले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.