बॉलिवूडचा सगळ्यात महागडा व्हिलन म्हणून प्राण यांचा दबदबा होता…..

बॉलिवूडमध्ये एकवेळ हिरोला लोकं विसरून जातील पण व्हिलन मात्र पक्का लक्षात ठेवतील. तस बघितलं तर बॉलिवूडचे व्हिलन हिरो लोकांनासुद्धा भारी पडायचे. एकसे बढकर एक डायलॉग आणि त्यांचा भारदस्त आवाज, चालण्याची अदब अशा सगळ्या शैलींनी व्हिलन रुबाबदार वाटायचे.

अशाच दमदार व्हिलनच्या भूमिका निभावणाऱ्या लोकांपैकी एक होते अभिनेते प्राण.

अनेक सिनेमांमध्ये व्हिलॉन म्हणून जरी प्राण यांनी काम केलं असलं तरी त्यांना हिरोपेक्षा जास्त प्रेम मिळालं. फिल्म इंडस्ट्रीमधले सगळ्यात जास्त लोकप्रिय व्हिलन म्हणून प्राण ओळखले जायचे. १२ फेब्रुवारी १९२० मध्ये प्राण यांचा जन्म एका एका सधन कुटुंबात झाला. अभ्यासाची अजिबातच गोडी नव्हती. प्राण यांची इच्छा फोटोग्राफर बनण्याची होती. 

फोटोग्राफर बनण्यासाठी त्यांनी एक स्टुडिओसुद्धा उभा केला होता आणि याच क्षेत्रात काहीतरी ग्रेट करायचं म्हणून ते शिमला आणि नंतर लाहोरला गेले. याच काळात मोहम्मद वली या दिग्दर्शकाची नजर प्राण यांच्यावर गेली. त्यावेळी विना ऑडिशन देताच प्राण यांची निवड यमला जट या सिनेमात झाली. जसं प्राण यांचं करियर बहरू लागलं कि तोच भर पाकिस्तान फाळणी झाली आणि ते मुंबईत आले.

मुंबईत त्यांचा नव्याने स्ट्रगल सुरु झाला. बराच काळ काम नसल्याने त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आली कि हॉटेलात काम करून सुद्धा त्यांची पुरेशी कमाई होईना म्हणून त्यांनी पत्नीचे दागिनेसुद्धा विकले होते. इथं परत एकदा प्राण यांचं नशीब चमकलं आणि बॉंबे टॉकीजचा सिनेमा जिद्दीमध्ये त्यांना काम मिळालं. याच सिनेमात देवानंद सुद्धा होते. सिनेमा हिट झाला आणि प्राण यांचं करियर मार्गी लागलं. 

यानंतर मात्र प्राण यांनी मागे वळून पाहिलंच नाही. वारदात, आजाद, देवदास, राम और श्याम, जंजीर, जॉनी मेरा नाम, आदमी, देस परदेस या सिनेमांमध्ये आपली जादू त्यांनी दाखवून दिली. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्राण ७० च्या दशकात हिरोच्या स्टारडमपेक्षा जास्त फॉर्मात होते.

राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या सारख्या हिट हिरोच्या तुलनेत सगळ्यात जास्त मानधन प्राण त्यावेळी घेत असे.

डॉन या सिनेमाच्या वेळी अमिताभ बच्चन यांना २.५ लाख रुपये मानधन मिळालं होत तर अभिनेते प्राण यांना ५ लाख रुपये देण्यात आले होते.

सिनेमा जितका बच्चनला प्रसिद्ध करून गेला त्याहून अधिक प्राण यांना प्रसिद्ध करून गेला. तब्बल ७ दशकं प्राण यांनी सिनेसृष्टीवर राज्य केलं.

स्वातंत्र्याआधी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या दशकांना एकत्र जर केलं तर प्राण यांनी ७ दशके सिनेमांमध्ये काम केलं. यात ३५० पेक्षाही जास्त सिनेमे त्यांनी केले. इतकं काम करूनसुद्धा एकदाही आणि कुठल्याही कॉंट्रीव्हर्सी मध्ये ते अडकले नाही हीच त्यांची शेवट्पर्यंत खासियत होती. 

प्राण यांच्या कामावर निर्माते आणि दिग्दर्शक इतके खुश असायचे आणि आदर म्हणून ते प्रत्येक सिनेमाच्या स्टारकास्टच्या वेळी आणि प्राण [ AND PRAN ] असं लिहायचे. पाकिस्तान आणि भारत अशा दोन्ही देशात त्यांचे भरपूर लोकं चाहते होते. अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्या तोडीस तोड व्हिलन म्हणून प्राण यांची ओळख होती.

१२ जुलै २०१३ मध्ये मुंबईत त्यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं होतं, त्यावेळी हिरोला टक्कर देणारा एकमेव व्हिलन अशी त्यांची लोकं आठवण काढत होते.

त्याकाळात हिरोपेक्षा जास्त फी आकारून त्यांनी व्हिलन पात्राला मेन स्ट्रीमचा दर्जा देऊ केला होता. आजसुद्धा एक गाजलेला व्हिलन म्हणून अभिनेते प्राण हे ओळखले जातात.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.