विरारच्या मिल कामगाराने बनवलेलं पोहा चिकन भुजिंग 5 स्टार शेफनां सुद्धा भुरळ घालतंय

चिकन म्हणजे अनेकांचा विक पॉईंट असतो. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलं तर चिकन सीझर सॅलड, मोगलाई चिकन पासून ते चिकन तंदुरी कबाब पर्यंत अनेक डिश आपण पाहतो. कॉन्टिनेंटल पासून पंजाबी मोगलाई पर्यंत या एक्झॉटिक डिशच नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटत.

अशाच 5 स्टार मेनू कार्डवर एका मराठी गिरणीकामगाराने बनवलेल्या चिकन डिशने एन्ट्री मारली आहे.

त्याच नाव चिकन भुजिंग.

नावापासून चवी पर्यंत आपला आगळेपणा जपलेल्या या पदार्थाचा इतिहास देखील तितकाच आगळावेगळा आहे.

गोष्ट आहे ऐंशी वर्षांपूर्वीची. १९४० च्या दशकात वसई विरार जवळच्या आगशीचे बाबू हरी गावड हे मुंबईमध्ये मिल कामगार होते. आठवडाभर मिलमध्ये राबल्यावर सुट्टीच्या दिवशी त्यांचे मित्र शेतात ताडी प्यायला यायचे.

गावड यांच्या ताडी सोबत खायला काही तरी चखणा पाहिजे म्हणून मित्र मागणी करत. बाबू तात्यांनी शेतातच चिकन भाजून द्यायला सुरुवात केली. बाबू तात्यांनी चखणा चविष्ट लागावा म्हणून काही प्रयोग केले.

कोळशाच्या भट्टीवर रोस्टेड भाजलेलं चिकन, त्यात थोडासा तळलेला कांदा, बटाट्याचे भाजलेले गोल काप आणि वरून भुरभुरलेले कच्चे पोहे. वर्णन ऐकलं तरी कोणत्याही खवय्याच्या तोंडाला पाणी सुटावं.

भुजिंग म्हणजे भाजणे, यावरून गावड यांनी आपल्या रेसिपीला नाव दिले चिकन भुजिंग.

खास घरगुती मसाला वापरून बाबू तात्यांनी बनवलेली रेसिपी त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये फेमस झाली. ताडी पेक्षाही तात्यांचं भुजिंग खाण्यासाठी लोक आगशीला येऊ लागले.

हळूहळू ताडी मागे पडली आणि उरले आगाशीचे सुप्रसिद्ध चिकन भुजिंग.

तात्यांनी एक छोटा स्टॉल टाकून भुजिंग विकण्यास सुरवात केली. तात्यांची मुले आणि आता त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. त्यांच्या मदतीला येणाऱ्या मित्रांनी देखील त्यांच्या संमतीने भुजिंग सेंटर सुरू केले.

हळूहळू वसई तालुक्यात शेकडोने भुजींग सेंटर सुरु झाले. त्यांनी आगाशी भुजींग अशी नावेही दिली. विरार वरून मुंबईला येणाऱ्या नोकरदार मंडळींना त्यांचे फ्रेंड्स भुजिंग पार्सल मागवू लागले. रोज शेकडो किलोनी त्याची विक्री होऊ लागली.

माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर भुजिंग वर्ल्ड फेमस झालं.

भुजिंग सेंटर च्या बाहेर दरवळणारा खास सुगंध, त्याची जिभेवर रेंगाळणारी खास चव खवय्यांना बेभान करू सोडते.

एकेकाळी ताडी पिणाऱ्या कामगारांची ही आवडती डिश साता समुद्रापार जाऊन पोहचली. दुबई अमेरिकेला नोकरीला असणारे विरारकर भारतातून तिकडे परत जाताना खास पार्सल मध्ये बांधून घेऊन जातात.

शरद पवारांपासून ते सचिन तेंडुलकर पर्यंत कित्येक फेमस व्यक्ती भुजिंगचे भक्त आहेत. याची चर्चा ऐकून अनेक सेलिब्रिटी शेफ भुजिंगची अस्सल रेसिपी शोधत आगाशीला येऊन पोहचले.

खुद्द भारताचा किचन सम्राट फाईव्ह स्टार शेफ संजीव कपूरला देखील भुजिंगने भुरळ घातली आहे.

त्याने याच्या रेसिपीला व्हिडीओ देखील इंटरनेटवर टाकला आहे. मुंबईत कित्येक मोठ्या रेस्टॉरंटमध्ये ही फ्युजन डिशसुद्धा मेन्यू कार्डवर विराजमान झाली आहे.

गेली ऐंशी वर्षे भुजिंगचे निर्माते गावड यांनी आपली चव टिकवली.

त्यांच्या तिसऱ्या पिढीने आपल्या या परंपरागत डिशला वेबसाईटच्या रूपाने  ऑनलाइन आणलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

जस आग्र्याला पेठ्याने, बेळगावला कुंदयाने ओळख दिली तसं विरारला या अजब आगाशी पोहा चिकन भुजिंगने ओळख मिळवून दिली आहे हे नक्की.

पंजाबी बटर चिकन असो किंवा कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, चिकनचे अस्सल फॅन असाल तर ही रांगडी डिश ट्राय करून पाहाच. स्थळ- वसई विरार आगाशी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.