पराठ्याचा शोध मुघलांच्या शाही रसोईमध्ये नाही तर दुष्काळात गरिबाच्या घरी लागलाय

आपल्या कडे एक फॅड  आहे. कोणताही खाद्य पदार्थ जर भारी असेल तर त्याचा इतिहास शाही आहे असं सांगायचं. म्हणजे काय आज आपण खातोय ते अगदी राजघराण्याच्या रॉयल किचन मध्ये बनवलं जायचं अशी थाप ठोकली की  खाणाऱ्याला सुद्धा भारी वाटतं.

विशेषतः मुघलाई. कुठल्या पण पदार्थाच्या आधी मुघलाई हा शब्द जोडायची तर हॉटेल वाल्याना सवय झाली आहे. चिकन मुघलाई, मटण मुघलाई पासून ते अगदी चायनीज मुघलाईपर्यंत असे हास्यास्पद डिश आपण पाहत असतो.

मुघल  बरेच श्रीमंत होते, रसिक होते, कायम आपल्या राजवाड्यात पडीक असायचे, उंची दारू, सुंदर नर्तिका, उत्तम जेवण यात बिझी असायचे मान्य . त्यांच्या काळात इराणी खाद्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती च फ्युजन करून नव्या नव्या पदार्थांचा शोध लागला हे सुद्धा मान्य.

पराठ्याच्या बाबतीत ही अशीच एक कथा सांगितली जाते .

असं म्हणतात की एकदा मुघल बादशाह जहांगीरला रोजच मटण  गोश्त , रोटी खाऊन कंटाळा आला होता. त्याच्या किचन मध्ये आदिल हाफिज उस्मान नावाचा एक आचारी होता. त्याला बादशहाने १० दिवसाच्या आत नवीन डिश बनवायला सांगितली तर तेव्हा त्याने बनवला अंड्याच स्टफिंग भरून पराठा  बनवला. यालाच मुघलाई  पराठा  म्हटलं जातं .

तो उस्मान आचारी मूळचा बंगाल चा होता. जहांगीर ने त्याला खुश होऊन १००० सोन्याच्या मोहरा दिल्या, बंगाल मध्ये त्याच्या गावी जहागीर दिली.अशा कथा सांगितल्या जातात. यात थोडेफार तथ्य असेलही मात्र पराठ्याचा शोध तेव्हा नाही लागला.

 भारतात पराठा  या पूर्वी शेकडो वर्षे खाल्ला जातो.

अनंत काळापासून  भारतात रोटी किंवा चपाती भाजी हेच जेवण आहे . गंगा यमुना सिंधू नद्यांच्या  खोऱ्यातील  जमीन पूर्वापार झाले सुपीक संपन्न आहे. शेतीचा आपल्याला वारसा आहे यामुळे भारतात अनेक भाज्या पिकतात व त्याचा आहारात समावेश होतो.

पण याच सोबत भारत दुष्काळासाठी देखील प्रसिद्ध आहे.पूर्वीच्या काळी तर दर दोन -चार  वर्षांनी दुष्काळ पडायचा. काही काही वेळा तर दुष्काळ १२-१२ वर्षे टाकायचा. याला दुर्गा देवी दुष्काळ म्हटलं जायचं.

दुष्काळात पाण्या साठी, अन्नासाठी काय उपाय योजना करता येतील याचे वर्णन देखील अनेक ग्रंथात आढळते.

या मोठं मोठ्या उपाय योजना झाल्या. यातूनच जन्म झाला पराठ्याचा.

असं म्हणतात की अन्नाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा कोणत्या  तरी एका शहाण्या अन्नपूर्णेला कल्पना सुचली कि भाजी व चपाती वेगवेगळी खाण्या पेक्षा ती एकत्र करूनच बनवली तर?

पिठात जी असेल ती भाजी कालवून बनवली जाऊ लागली. ती चवी ला देखील उत्तम होती. अतिशय कमी अन्न , भाजीपाला वापरून हे पौष्टिक  व रुचकर पराठा बनू लागला. अनेक  जण दावा करतात की  बंगाल च्या स्त्रियांनी याचा शोध लावला असावा. आजही फाळणी मध्ये वेगळ्या झालेल्या बांगला देशातदेखील अशाच पद्धतीने पराठा बनतो.

पराठ्याच नाव देखील परा+स्थःकिंवा  स्थितः यावरून पडलं आहे.

दहाव्या शतकात निज्जर नावाच्या एका लेखकाने लिहिलेल्या वर्णनात पराठ्या चा उल्लेख आढळतो. आधी दुष्काळी पदार्थ असलेला प्रथा नंतर रोजच्या जेवणाचा भाग झाला. उत्तरेतल्या विशेषतः पंजाबी लोकांनी हा पराठा  देशभरात पोहचवला. त्यांच्या तर दैनंदिन नाश्ता आणि जेवणात पराठे असतात.

आजहि एकविसाव्या शतकात आपण पराठ्याचे वेगवेगळे प्रकार खातो.

अगदी खाऊ गल्लीच्या गाड्यावर मिळणारा २० रुपयांचा  आलू पराठा  पासून ते फाईव्ह स्टार  हॉटेल मध्ये मिळणारा चीझ,बटर,वगैरे घातलेला शेकडो  रुपयांचा शाही मुघलई पराठा . आता तर दिपीका पदुकोण, बाहुबली अशा नावाने पराठा थाळी मिळते.

कधीही हि न चुकणारा अतिशय सहज सोपा, गृहिणींना कधीही मदतीला धावून येणारा, दही,सॉस, चटणी किंवा नुसताच  खाल्ला तरी चविष्ट लागणारा सर्व समावेशक पराठा हा काही कुठल्या राजाची नाही तर भारतातल्या दुष्काळी घराची देण आहे.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.