चिकनच नाही तर कैद्यांना पूर्वी पासूनच कारागृहात तंबाखू, बिडी, सिगारेट मिळते

आता महाराष्ट्रातील कारागृहातील कैद्यांना चिकन, पुरणपोळी मिळणार ही बातमी दोन दिवसापूर्वी आली आणि त्यावर अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. सामान्य माणसापेक्षा कारागृहातील कैद्यांना चांगले जेवण मिळणार असे जोक सोशल मीडियावर फिरू लागले आहेत.

मात्र हे अर्ध्यसत्य आहे. फार पूर्वीपासून कारागृहात कैद्यांना कॅन्टीनच्या माध्यमातून सुविधा देण्यात येते. कारागृहात कैद्यांना नेमक्या काय सुविधा मिळतात. त्यासाठी काय करावं लागत याचा बोल भिडूने घेतलेला हा आढावा.

नवीन नियमावली नुसार कैद्यांना कुठल्या वस्तू उपलब्ध होणार

कारागृहातील कैद्यांसाठीच्या कँटिनमध्ये मिळणाऱ्या मूलभूत गरजेच्या वस्तूंसोबतच आता एकूण ३० गोष्टी कँटीनमध्ये मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक (तुरुंग) सुनील रामानंद यांनी सांगितली.

त्यात फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ, चिकन, मासे, शिरा, लाडू, चिवडा, श्रीखंड, शेव, सामोसा, जिलेबी, पेढे, चहा, कॉफी फेस वॉश, टर्मरिक क्रीम या गोष्टी मिळणार असल्याची सांगितले होते.

तर दुसरीकडे सोशल मीडियावर आता कारागृहात होणार कैद्याची चंगळ. अशा प्रकारे बोलण्यात येत आहे. मात्र पूर्वीपासूनच कैद्यांना कॅन्टीन मधून इतर वस्तू मिळतात. आता फक्त त्यात काही नवीन पदार्थांची वाढ करण्यात आली आहे.

पूर्वी कारागृहाच्या कॅन्टीन मध्ये मिळणाऱ्या वस्तू

आवश्यक वस्तू बरोबर कारागृहातील कॅन्टीन मध्ये बिडी, सिगारेट, तंबाखू, साबण, पेस्ट, बिस्कीट, बुंदीचा लाडू,  फरसाण या सारख्या वस्तू कारागृहातील कॅन्टीन मध्ये उपलब्ध असतात. शिक्षा न भोगणाऱ्या कच्या कैद्यांना घरून मिळणाऱ्या पैशातून या वस्तू खरेदी करता येतात.

दर महिन्यात केवळ साडेचार हरजारांच्या वस्तूच कैद्यांना विकत घेता येतात.

कैद्यांकडे कुठून पैसे येतात

तुरुंगात कैद्यांना शिक्षा भोगताना वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात. ही कामं तुरुंग प्रशासन त्यांच्याकडून करून घेतं. त्यांची अकुशल, अर्धकुशल आणि कुशल अशी विभागणी करण्यात येते. त्यानुसार कैद्यांना कामाचे ५०, ५६ आणि ६५ रुपये दिवसाला देण्यात येते. दर तीन वर्षांनी या रकमेत १० टक्क्यांनी वाढ होत असते. तसेच कामाचे पैसे हे कैद्यांच्या हातात दिले जात नाहीत. कारागृहात त्यांच्या नावाने एक खात तयार करण्यात येते आणि त्यातच ते जमा होते. त्यातूनच कारागृहात असणाऱ्या कॅन्टीनमधून समान खरेदीची मुभा देण्यात येते.

नाव न छापण्याच्या अटीवर येरवडा कारागृहातील एका जेलरने बोल भिडूला दिलेल्या माहिती नुसार, कारागृहातील कैद्यांना वर्षातून ५ ते ६ वेळा चिकन देण्यात येते. आता फक्त एवढाच बदल झाला की, ऑर्डर प्रमाणे कैद्यांना चिकन उपलब्ध होणार आहे.

दिवाळी बरोबरच वर्षभरातील इतर सणाला सुद्धा कैद्यांना श्रीखंड, मिठाई, पनीर भाजी जेवणात देण्यात येते. आता फक्त पदार्थ वाढविण्यात आले आहेत. मात्र असे असले तरीही खर्चाची मर्यादा ही साडेचार हजारच असणार आहे.

गेली अनेक वर्ष कैदी अशा प्रकारची मागणी करत असल्याने त्यांना ही

 सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कैद्यांसाठी आरोग्य, सामाजिक, मानसिक, धार्मिक, अध्यात्मिक आणि मनोरंजन असे वैविध्यपूर्ण उपक्रमही कारागृहात घेतले जातात.

याबाबत बोलतांना ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी सांगितले की, कारागृहात कैद्यांना अनेकवेळा बिर्याणी खायला देण्यात येते. हा मोठा विषय नाही. बिस्कीट, पेस्ट, साबण, ब्रेड कारागृहातील कॅन्टीन मध्ये विकत मिळते. मात्र कैद्यांना भरमसाठ पैसे खर्च करता येत नाही.

समाज विघातक काम केले आहे म्हणूनच त्यांना कारागृहात पाठविण्यात येते. त्यामुळे कारागृहात त्यांना सगळ्या सोई सुविधा मिळणार नाहीत. समाजात वावरतांना मिळणाऱ्या सर्व गोष्टी या कारागृहाच्या चार भिंतीत उपलब्ध नसतात. तेथे वेगळे जीवन जगाव लागत.

कारागृहात प्रमाणशीर जेवनाच तत्व आहे. चिकन, मटन मुळे हे तत्व टिकणार नाही. या पेक्षा कारागृहात कैद्यांना चांगल्या सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.  कारागृहात संडास, बाथरूमची सुविधा अत्यंत वाईट आहे. यावर काम करण्याची गरज आहे.

चिकन सारख्या गोष्टी देणे ही अनावश्यक बाब आहे. यापेक्षा सरकारने कैद्यांना चांगल्या सुविधा  उपलब्ध करून द्याव्यात. डॉक्टरांची संख्या तुटपुंजी आहे. त्यावर काम करण्याची गरज असल्याचे असीम सरोदे यांनी सांगितले.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.