जन आशीर्वादच नाही तर भाजपच्या या यात्रा देखील वादग्रस्त ठरल्या होत्या…

भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या जन आशीर्वाद यात्रेमुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत. नुसते वादच नाही तर एका केंद्रीय मंत्र्याला अटक सुद्धा झाली आहे. यामुळे देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

भाजपच्या राजकीय यात्रेचा इतिहास पाहिला तर ही काही पहिली वादग्रस्त यात्रा नाही. यापूर्वी झालेल्या यात्रेमुळे मोठे वाद निर्माण झाले आहेत. यामुळे भाजपलाच अधिक फायदा झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो. मात्र जण आशीर्वाद यात्रे निम्मित प्रदेश भाजपला फायदा होईल की तोटा हा येणारा काळच ठरवेल.  

कुठल्या यात्रेमुळे देशभरात वाद निर्माण याचा बोल भिडूने घेतलेला आढावा. 

लालकृष्ण अडवाणी यांची रामरथ यात्रा

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अयोध्या येथील विवादित बाबरी मशिदीची कुलपे उघडल्यापासून रामजन्मभूमीचा प्रश्न तापला होता. भाजपच्या पालनपूर शिबिरात प्रमोद महाजन यांनी संपूर्ण देशभरात रामरथ यात्रा काढण्याची योजना आखली होती. अटल बिहारी वाजपेयींचा याला विरोध होता पण लालकृष्ण अडवाणी हे रामरथ यात्रेसाठी तयार झाले होते.

आधी कन्याकुमारीपासून अयोध्यापर्यंत ही रथयात्रा जाणार होती. पण नंतर प्लॅन बदलून गुजरातच्या सोमनाथ मंदिरापासून ते अयोध्येपर्यंत राम रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं. मुख्य सारथी होते प्रमोद महाजन. त्यांनीच एका गाडीला आलिशान रथात रूपांतर करून रामलल्लाची सुटका करण्यासाठी अडवाणींना त्यात आरूढ केलं होतं.

१९९० मध्ये रामरथ यात्रा काढण्यात आली होती.  सोमनाथ वरून  वरून आयोध्या राम रथ निघालेल्या यात्रेला मध्येच थांबविण्यात आले होते. बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी अडवाणी याना अटक केली होती. यामुळे भाजपला जबरदस्त फायदा झाला. यानंतर अवघ्या काही वर्षात भाजप खासदारांची संख्या २ वरून सत्ता स्थापन करण्या पर्यत गेली होती. देशभरातून या यात्रेला जनाधार मिळाला होता.

भारताच्या राजकारणातील सर्वात वादग्रस्त यात्रा म्हणून या यात्रेचा उल्लेख अजूनही करण्यात येतो.

संघर्ष यात्रा

१९९२ सालच्या  मुंबईतील दंगली नंतर तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी सुधाकरराव नाईक यांच्या जागी शरद पवारांना मुख्यमंत्री म्हणून पाठवलं होत. त्यावेळी शरद पवार यांच्या विरोधात ३ लोकांनी मोर्चा काढला होता. एक अण्णा हजारे, दोन गोविंद खैरनार आणि तीन गोपीनाथ मुंडे.

अण्णा हजारे आणि खैरनार यांनी सरकार किती आणि कसा भ्रष्टाचार करत आहे हे सांगायला सुरुवात केली. तर तिकडे मुंडेंनी भारतीय राजकारणाला एक नवीन शब्द दिला राजकारणाच गुन्हेगारीकरण. जे.जे. हत्याकांडातले आरोपी पवारांबरोबर विमानात होते, हे सिद्ध झालं असल्याचं सांगण्यात आलं. पप्पू कलानीने जमवलेल्या पैशाचा मुद्दा ऐरणीवर आला. गुन्हेगार आणि राजकारण्यांच्या भेटीमुळे अभद्र युती म्हणतं मुंडेंनी तोफ चालवली.

राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा मुद्दा लोकांसमोर आणायचा असेल तर लोकांच्यात मिसळायला हवं. त्यामुळे कॉंग्रेस सरकार विरोधात १९९४ मध्ये संघर्ष यात्रा काढायची असा निर्णय गोपीनाथ मुंडेंनी घेतला.

त्यासाठी शिवनेरी ते शीवतीर्थ असा मार्ग ठरला.

४५ दिवस चाललेल्या या संघर्ष यात्रे दरम्यान मुंडेनी जवळपास १५० च्यावर सभा घेऊन राज्यातील वातावरण ढवळून टाकलं. दाऊद इब्राहिमच्या मुसक्या बांधून आणू, एन्रॉन समुद्रात बुडवू, अशा एकाहून एक सनसनाटी घोषणा ही संघर्ष यात्रा राज्यभर प्रचंड गाजली होती.

या यात्रेनंतर प्रचंड उलथापालथ झाली आणि राज्यात पहिल्यांदा युतीच सरकार आले होते.

एकता यात्रा

तत्कालीन पंत्रप्रधान व्ही. पी. सिंह यांनी लागू केलेल्या मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या होत्या. त्याला राजकीय उत्तर देण्यासाठी भाजपकडून एकता यात्रा आयोजित करण्यात होती असे सागितले जाते.

१९९१-१९९२ मध्ये भाजपचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी एकता यात्रा आयोजित केली होती. या यात्रे दरम्यान जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथील लाल चौकात तिरंगा फडकाविल्या नंतर चर्चेत आली होती.

या यात्रेच्या माध्यमातून भाजपने आपले मुद्दे देशभर पोहचविले होते. मात्र यानंतर अनेक राज्यात भाजपच्या जनाधारात वाढ झाल्याचे सांगण्यात येते.

महाजनादेश यात्रा 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी  तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे आयोजन केले होते. यात्रेचा पहिला टप्पा सुरु होता.

याच वेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर आला होता. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना महाजाना देश यात्रा अर्ध्यातून सोडावी लागली होती. या जिल्ह्यात महापूर असतांना मुख्यमंत्री यात्रा काढण्यात व्यस्त असल्याचा आरोप करण्यात आला होता.

आरोपा नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली यात्रा स्थगित करून पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता.

वेत्री वेल यात्रा

तामिळनाडू राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या वतीने नोहेंबर २०२० मध्ये वेत्रीवेल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेच्या माध्यमातून भाजप तामिनाडू मधील आपला जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न करणार होती.

सत्ताधारी अन्नाद्रमुक पक्षाने या यात्रेला परवानगी नाकारली होती. कोरोना असल्याने राज्य सरकारने परवानगी नाकारली होती. तरीही तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांनी भाजपच्या इतर यात्रे असते तशी ती बस होती. सत्ताधारी पक्षाबरोबर इतर पक्षांनी सुद्धा या यात्रेला विरोध केला होता. आणि या यात्रेमुळे राज्यात दंगे होतील अशील भीती व्यक्त केली होती.

वेत्री वेल यात्रेपूर्वी भाजपचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवी यांना ताब्यात घेतले होते. तरीही ही यात्रा भाजपच्या वतीने काढण्यात आली होती.

 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.