रॅगिंगमुळे वैतागला होता, जयाने त्याच दुसरं बारसं केलं “डॅनी”

एकमेकांना नावं ठेवणारी माणसं आपल्या आसपास पाहायला मिळतात. सिनेसृष्टीत तर अशी अनेक माणसं असतात. जी समोरून कौतुक करतील पण मागून नावं ठेवतील. पण भिडूंनो, एकमेकांना नावं ठेवण्यापेक्षा एकमेकांची नावं बदलणारी सुद्धा माणसं सिनेसृष्टीत असतात.उदाहरणार्थ, व्ही. शांताराम यांनी रवी कपूरचं नाव जितेंद्र ठेवलं. आणि पुढे जितेंद्र स्टार झाला.

नाव बदलण्याचा असाच एक किस्सा बॉलिवुडमध्ये घडला आहे, जो फार कमी जणांना माहीत असेल. हा किस्सा आहे, डॅनी डेंगझोंपाच्या बाबतीत घडलेला.

डॅनी डेंगझोंपाचं नाव बदलायला कारणीभूत असलेली व्यक्ती म्हणजे जया बच्चन.

डॅनी डेंगझोंपा आपल्या सर्वांना माहीत असतीलच. छोट्या डोळ्यांचा, अंगापिंडाने काहीसा बारीक, पण तंदुरुस्त अशा डॅनीने स्वतःच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली.

डॅनी विषयी सांगायचं झालं तर, सिक्कीम येथील एका बुद्धिस्ट कुटुंबात डॅनीचा जन्म झाला. डोंगरदऱ्या, निसर्गाच्या कुशीत वसलेल्या युक्सोम भागात डॅनीचं बालपण गेलं. या सर्व वातावरणाचा डॅनीच्या आयुष्यावर फार चांगला परिणाम झाला.

नैनिताल येथील बिर्ला विद्या मंदिर या शाळेत डॅनीचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं तर पुढे दार्जिलिंग येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये डॅनीने प्रवेश घेतला. डॅनीचं कुटुंब घोड्यांचं प्रजनन करायचं. त्यामुळे अगदी तरुण वयात डॅनीला सुद्धा घोडेस्वारीची आवड निर्माण झाली. डॅनीला व्यायामाची आणि फिटनेसची प्रचंड आवड होती.

इतकेच नव्हे तर त्याला भारतीय सैन्यात जाण्याची खूप इच्छा होती. परंतु याच काळात डॅनी पुण्यातल्या FTII मध्ये दाखल झाला.

FTII मध्ये डॅनीचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी प्रत्येक नवीन विद्यार्थ्याला स्वतःची ओळख सिनिअर विद्यार्थ्यांसमोर द्यायची असते. डॅनीने स्वतःचं नाव सांगितलं.

मी शेरींग फिंग्सो डेंगझोंपा.’

डॅनीचं नाव पहिल्यांदा कोणालाच कळालं नाही. डॅनीने पुन्हा स्वतःचं नाव सांगितलं. आता मात्र डॅनीचं नाव ऐकून सर्व सीनियर विद्यार्थी हसत सुटले. त्यांनी डॅनीच्या नावाची काहीशी मस्करी केली. डॅनीने सर्वांकडे दुर्लक्ष केलं.

डॅनी दररोज FTII मध्ये जाऊ लागला. हळूहळू सर्वांशी त्याची मैत्री होती.

यात डॅनीची ओळख झाली जया बच्चन यांच्याशी. जया बच्चन म्हणजे लग्नाआधीच्या जया भादुरी. जया आणि डॅनी एकमेकांचे चांगले मित्र बनले. डॅनीचे वर्गात इतर मित्र मैत्रिणी सुद्धा होते. परंतु डॅनीच्या कठीण नावामुळे त्याला कोणीही नावाने हाक मारायचे नाहीत.

डॅनीला बोलवायचं असेल तर, त्याला बाकीचे सर्व इशारा करायचे किंवा आपण अनोळखी व्यक्तीला कसं ‘शुक शुक’ करून हाक मारतो, तशी हाक मारायचे.

या गोष्टीचं डॅनीला फार वाईट वाटायचं. बऱ्याचदा त्याची नावावरून रॅगिंग व्हायची.

एक दिवस जया आणि डॅनी गप्पा मारत बसले होते. तेव्हा खूप दिवसांपासून असलेली खंत जयाने डॅनीला बोलून दाखवली. जया म्हणाली,

“हे बघ, तुलाही कळतं की तुझं नाव किती अवघड आहे. आम्हाला कोणालाच ते घेता येत नाही. त्यामुळे माझं ऐक, तू तुझं नाव बदल. मी तुला असं सांगत नाही की तुझं संपूर्ण नाव बदल. पण लोकांना बोलता येईल इतकं सोप्पं नाव आपण नक्कीच ठेवू शकतो.”

डॅनीला जयाचं म्हणणं पटलं. पुढे जयाने शेरिंग फिंग्सोच्या ऐवजी ‘डॅनी’ हे नाव त्याला सुचवले. डॅनीला सुद्धा जयाने दिलेलं हे नवं नाव प्रचंड आवडलं.

आणि त्या दिवसापासून शेरींग फिंग्सो डेंगझोंपाने स्वतःचं नाव डॅनी डेंगझोंपा असं केलं. हेच नाव डॅनीने पुढच्या आयुष्यात सुद्धा तसचं ठेवलं. पुढे जया बच्चन यांनी एक यशस्वी अभिनेत्री म्हणून बॉलीवूड मध्ये नाव कमावलं. तर डॅनीने सुद्धा काहीशा खलनायकी भूमिका करून बॉलिवुड गाजवलं. असं म्हणतात, कॉलेजमधले मित्र पुढच्या आयुष्यात सुद्धा तसेच राहतात. त्यामुळे आजही डॅनी आणि जया यांची मैत्री तशीच आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.