सध्या डोकं वर काढलेल्या डेल्टा प्लसची माहिती भारतीय संशोधकांना २०२० मध्येच मिळाली होती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढताना नाकी नऊ आले, त्यात आता नवीनच डेल्टा प्लस वेरीयंट नावाच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे, कारण महाराष्ट्रात याचे आत्तापर्यंत २१ रुग्ण सापडलेही आहेत.
राज्यात एकूण सात जिल्ह्यात याचे २१ रुग्ण आहेत तर त्यात महाराष्ट्रातला पहिला मृत्यू रत्नागीरीत झालाय. जरी या डेल्टा प्लसची वाढ गंभीर नसली तरीही, साडे सात हजार रुग्णांच्या नमुन्यांपैकी २१ नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. म्हणजेच याचे प्रमाण ०.००५ आहे. आकडा दिसायला क्षुल्लक असला तरीही हे संकट गंभीर आहे हे मात्र नक्की. संपूर्ण देशातली संख्या पहायची तर आतापर्यंत ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चे ४० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
यातील सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रातून समोर आली आहेत, त्यातल्या त्यात याचा प्रादुर्भाव कोकण परिसरात जास्त दिसत आहे हिच गंभीर बाब आहे.
हा विषाणू भारतातच सर्वात अगोदर आढळून आलेला ‘डेल्टा व्हेरियंट बदलून आता तो ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ तयार झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
सरकारने २२ जून रोजी डेल्टा ची आकडेवारी सादर करत याची माहिती दिली कि,
डेल्टा प्लस व्हेरिएंटला ‘व्हेरिएंट्स ऑफ इंटरेस्ट’ मधून काढले आणि ‘व्हेरिएंट्स ऑफ कन्सर्न’ प्रकारात ठेवले. म्हणजे आतापर्यंत सरकार कोरोनाच्या स्वरूपावर लक्ष ठेवून होती, पण आता ती धोकादायक बनताना दिसत आहे. कारण डेल्टा प्लस व्हेरियंट रुग्णांच्या रोग प्रतिकारशक्तीला कमी करू शकतो.
तज्ञांनी सांगितले “भारतात कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यासाठी डेल्टा प्लस व्हेरियंट जबाबदार असेल” आणि मग सरकारने याला गांभीर्याने घेतले. पुढचा धोका लक्षात घेता, सरकार अधिक जागरुक होत असल्याचे दिसतेय.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट अधिक झपाट्याने पसरली त्याला ‘डेल्टा व्हेरियंट’ कारणीभूत होता. तर मग २०२० च्या ऑक्टोबर मध्येच या विषाणूची माहिती भारतीय शास्त्रज्ञांकडे असतांनाही त्याबाबतीत सरकारने आधीच ठोस पाऊले का उचलली नाहीत, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
विषाणू कोणताही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना, म्हणजेच त्याचे रूप बदलत राहतो. कधीकधी सारखा बदलणारा विषाणू घातकच आहे असंही नाही कारण बदलता विषाणू कमजोर पडू शकतो त्यामुळे तो नष्ट हि होऊ शकतो.
उदाहरण द्यायचं झालं तर अलीकडेच आलेला सार्स कोरोना व्हायरस हा हि अशाच प्रकारे गेला होता.
भारतासोबतच युके आणि दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच कोव्हिडचे वेगवेगळे व्हेरियंट आढळले. त्याला नावंही दिली गेली आणि याच नावांनी यापुढे जागतिक आरोग्य संघटना त्या-त्या व्हेरियंटला संबोधले आहे, तसं भारतातील व्हेरियंटला ‘डेल्टा’ म्हणलं गेलं.
जागतिक आरोग्य संघटनेनं इतर देशात आढळलेल्या व्हेरियंटची यादी जाहीर केली आहे त्या नुसार कोणता व्हेरियंट कधी आढळला याचाही तपशील दिला आहे. यानुसार डेल्टा – B.1.617.2 हा विषाणू भारतात २०२० च्या ऑक्टोबरमध्ये आढळला होता तसेच त्याबरोबर ही कपा – B.1.617.1 नावाचा व्हेरियंट आढळला होता.
तर युकेमध्ये अल्फा – B.1.1.7 हा व्हेरियंट२०२० च्या सप्टेंबर मध्ये आढळला होता तर अमेरिकेत २०२० च्या नोव्हेंबरमध्ये आयोटा B.1.526 आढळला होता.
कोविडची लाट आल्यापासून प्रत्येक धोका किंवा सूचना, संशोधन हे सहसा बाहेरच्या देशात होतं मग त्यांच्याद्वारे भारताला कळते. परंतु आपल्या देशात या प्रकारचे संशोधन का केले जात नाही हा, आपल्याकडील आरोग्य यंत्रणा संशोधन यंत्रणा तितकी मजबूत नसल्याचं यातून दिसून येतं.
मात्र आता भारत देशातील शास्त्रज्ञही या डेल्टावरच्या संशोधनाला लागली आहे.
डेल्टा प्लसवर भारतीय लस किती प्रभावी आहे? हा व्हेरिएंटवर ती परिणाम करू शकते कि नाही ? यावर देशातील वैज्ञानिक लक्ष ठेवून असणार आहेत. तसं तर आपण आतापर्यंत देण्यात आलेली लस वेरियंटवर प्रभावी आहे.
डेल्टा प्रकाराबद्दलही मात्र अमेरिकेने चिंता व्यक्त केलीय तर डब्ल्यूएचओने देखील डेल्टा प्रकाराला जगासाठी चिंताजनक म्हणून वर्णन केले आहे.
एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार, डेल्टा प्लस प्रकार ‘खूप संक्रमक’ आहे. तर केंद्राच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, भारतात या प्रकाराचा प्रसार मर्यादित आहे, परंतु आपण सावध राहण्याची गरज आहे.
त्या दृष्टीने पुढील ६ ते ८ आठवडे फार महत्वाचे आहेत.
मात्र एक बरय कि, आपल्याकडील लसी डेल्टावर प्रभावी आहेत, तरीही कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या कटाक्षाने पाळाव्यात इतकं तर आपण करूच शकतो.
हे ही वाच भिडू :
- HIV, पोलिओ अन् कोरोना, गेली १२१ वर्षे भारतात पहिलं निदान या हॉस्पिटलमध्येचं होतं.
- त्यावेळी एका दिवसात १७ कोटी बालकांना लस देण्यात आली होती. याला म्हणतात विक्रम.
- योजना मोदी सरकारने आणली पण कोरोना काळात सर्वाधिक फायदा दक्षिणेच्या राज्यांनी उठवलाय.