हत्तीचे पाय गाळात अडकले आणि भारतातली पहिली पेट्रोलची खाण सापडली

साधारण १८२४ साल असेल. नुकताच मराठ्यांचा पराभव करून ईस्ट इंडिया कंपनी सरकारने भारतावर आपली  मजबूत केली होती. भारतातली सर्व प्रमुख साम्राज्ये पराभूत झाली होती अथवा त्यांनी आधीच इंग्लंडच्या राणीचं मांडलिकत्व स्विकारलं होतं. भारतासारखा खंडप्राय देश त्यांच्या ताब्यात आला होता.

पण इंग्रजांची भूक शांत झाली नव्हती.  

त्यांनी छोट्या छोट्या राज्यांना सुद्धा गिळंकृत करण्याचा सपाटा सुरु केला. यातच होते बर्माचे अहोम राजे. इंग्रजांनी १८२४ साली त्यांच्यावर हल्ला केला. अँग्लो बर्मा युद्ध सुरु झाले. या युद्धाच्या निमित्ताने ब्रिटिश सैन्य आसामच्या गर्द जंगलात खोलवर घुसलं.  जिथे आजवर कोणी पोहचलं नव्हतं तिथे या सैन्याचा वावर झाला.

त्यांच्या सैन्यात एक सैन्याधिकारी होता नाव लेफ्टनंट विलकॉक्स. १८२५ साली त्याने सुपखोंग येथे एक एक रिपोर्ट लिहिला आहे. त्यात तो म्हणतो,

“great bubbles of gas and petroleum’ rising to the surface and that ‘the jungles are full of an odour of petroleum. 

जंगलातून खनिज तेलाचा वास येत आहे. “

भारतातल्या पेट्रोलचा हा पहिला उल्लेख.  

लक्षात घ्या अजून पेट्रोलचा शोध लागला नव्हता. अजून गाड्यांचा शोध लागला नव्हता. मात्र भारतात खनिज तेल आहे ज्याचा पुढे मागे आपल्याला उपयोग होईल हे इंग्रज अधिकारी आपल्या वरिष्ठांना सांगत होता. पण पुढे ही गोष्ट विस्मरणात गेली.

१८५४ साली रॉकेलाच्या दिव्याचा शोध लागला व रॉकेलाचे युग सुरू झाले.

आधुनिक खनिज तेल उद्योग खऱ्या अर्थाने  २७ ऑगस्ट १८५९ रोजी सुरू झाला. त्या दिवशी एडविन एल्. ड्रेक यांनी सु. २३ मी. खोल खणलेल्या विहिरीत तेल सापडले. ती विहीर त्यांनी वॉटसन फ्लॅटवर ऑइल–क्रीकजवळ टिस्टुव्हिल समीप सीनेका ऑइल कंपनीसाठी खोदली होती. तेलासाठी खणलेली ही पहिलीच विहीर होय.

अमेरिकेत सापडलेल्या या तेलाच्या विहिरींमुळे जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजांचे डोळे लकाकले. या तेलाच्या खाणी पुढच्या काळात सोन्याच्या खाणी होणार होत्या.

जगातली पहिली विहीर खणल्याच्या बरोबर सातच वर्षात इंग्रजांनी विलकॉक्सने पाहिलेल्या जंगलात तेलाची विहीर शोधली. २६ मार्च १८६७ रोजी स्टुअर्ट मॅकिलोप कंपनीचा मसूत्र गुडइनफ नावाच्या व्यक्तीने आशिया खंडातील पहिली तेलाची विहीर आसाम मधील माकूम या ठिकाणी सुरु केली.

पण दुर्दैव म्हणजे या विहिरीतून म्हणावे तितके तेलाचे उत्पादन निघत नव्हते. भारतात तेलाच्या खाणी नाहीत असं म्हणत गुड इनफने हि विहीर बंद करून टाकली.

पुन्हा काही वर्षे गेली. इंग्रजानी आसाम मध्ये चहाचे मळे सुरु करायचा निर्णय घेतला होता. त्यांनी इथली जंगले तोडून तिथे चहाचे मळे बनवले. या चहाच्या वाहतुकीसाठी तिथे आसाममध्ये रेल्वे नेली. या रेल्वेच्या  लाईन टाकण्याची जबाबदारी डब्ल्यू. एल. लेक या कॅनेडियन अधिकाऱ्याकडे दिली होती. तो शेकडो मजुरांना घेऊन तिथे रात्रंदिवस काम करत होता.

या डोंगरदऱ्यांच्या बिकट वाटांमध्ये रेल्वेचे रूळ टाकण्यासाठी मोठमोठ्या हत्तीची मदत घेतली जायची. भारतातील रेल्वेच्या निर्मितीमध्ये या हत्तीचे मोठे योगदान मानले जाते.

असच एक दिवस संध्याकाळी जेव्हा सगळे हत्ती कामावरून परतले तेव्हा लेकच्या लक्षात आलं कि हत्तीच्या पायाला काही तरी काळं लागलेलं आहे. त्याने जवळ जाऊन पाहिलं आणि आनंदाने नाचायला लागला. काळं सोनं गवसलं होतं. आपल्या रेल्वेच्या कामगारांना त्या ठिकाणी घेऊन गेला आणि उकरायला सांगितलं. ते उकरत होते आणि गडी खुश होऊन चित्कारत होता,

“डिग बॉय ..डिग”

असं म्हणतात कि लेकच्या त्या “डिग बॉय ..डिग” वरून या भागाचं नाव पडलं “दिग्बोई “

हे साल होतं १८८९. डब्ल्यू. एल. लेक यांच्या आग्रहाने इंग्रज सरकारने तिथे तेलाची विहीर सुरु केली. ५४ मीटरवर तेल सापडलं. पुढच्या दहा वर्षात लक्षात आलं की आधी अंदाज होता त्या पेक्षाही मोठ्या प्रमाणात दिग्बोई मध्ये तेल आहे.

१८९९ मध्ये आसाम ऑइल कंपनी स्थापन झाली व या सालापर्यंत चौदा विहिरी खोदण्यात आल्या. पुढच्या दोनच वर्षात तिथे भारतातली पहिली ऑइल रिफायनरी सुरु करण्यात आली.

या कंपनीने नंतर ८० विहिरी खणल्या, त्यांपैकी काही सु. ६६० मी. खोल होत्या. १९१७ मध्ये या विहिरींतून दररोज १८,००० गॅलन तेल मिळत असे. १९२१ साली आसाम ऑइल कंपनीची मालकी बर्मा ऑइल कंपनीकडे गेली. या कंपनीने १९३१ पर्यंत दररोज १८,००० गॅलन एवढे उत्पादन केले. याच काळात बर्मा ऑइल कंपनीने बदरपूर तेलक्षेत्रातून १८,६४,००० पिपे तेल काढले होते.

कित्येक वर्षे दिग्बोई तेलक्षेत्रातून दरवर्षी फक्त २,७०,००० टन तेलाचे उत्पादन होत असे. परंतु गेल्या काही वर्षांपासून हे उत्पादन दर वर्षी चार लाख टनांपर्यंत वाढले आहे.

१९७४ पर्यंत आसाम तेल कंपनीच्या १,००१ तेल विहिरी होत्या. त्यांपैकी ३६९ विहीरींतून वर्षाला ८३ हजार मे. टन अशुद्ध तेलाचे उत्पादन होते, तर येथील तेलशुद्धीकारखान्यात ५·३ लक्ष टन अशुद्ध तेलावर प्रक्रिया होते. आज बर्मा ऑइलची भारत पेट्रोलमध्ये रूपांतर झालंय.

जगातील सर्वात जुन्या तेलविहिरींपैकी एक असलेल्या दिग्बोईमध्ये आजही पेट्रोल, ग्रीस, घासलेट, डीझेल, वंगण, मेण, ऍसिड यांचे येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.  भारताला पुरेल एवढं पेट्रोल जरी इथून उत्पादित होत नसलं तरी आपल्या पेट्रोलची मोठी भूक दिग्बोई आजही भागवत आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.