आणि त्या एका घोषणेनंतर डॉ. हर्षवर्धन यांचा टप्याटप्प्यानं कार्यक्रम होत गेला…

काल नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात जवळपास ३७ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर त्याचवेळी डझनभर मंत्र्यांना नारळ देण्यात आला. यात प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, रमेश पोखरीयल ‘निशंक’, संतोष गंगवार, संजय धोत्रे अशा जेष्ठ मंत्र्यांची नाव आपल्याला दिसून येतात.

मात्र यातील सगळ्यात जास्त अपेक्षित नाव होत ते म्हणजे, आरोग्यमंत्री असलेल्या डॉ. हर्षवर्धन यांचं.

या राजीनाम्याचं मुख्य कारण म्हणजे कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. पण हर्षवर्धन यांची ही खुर्ची अचानक गेली आहे का? तर नाही. त्यांचा टप्प्याटप्प्यानं कार्यक्रम झाला आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

डॉ. हर्षवर्धन यांच्या खुर्चीला पहिला धक्का बसला तो पहिल्या लाटेमध्ये. खरंतर देशात जेव्हा केरळमधून रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणावं तेव्हढं सावध झालं नव्हतं.

कारण राहुल गांधी यांनी देशात ५०० रुग्ण असताना सरकारला दिला होता कि, सर्वप्रथम इंटरनॅशनल एअरपोर्टवर कडक निर्बंध आणून, विदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी केली जावी. मात्र त्यावेळी हर्षवर्धन यांनी राहुल गांधी यांना फाट्यावर मारत त्यांचीच मस्करी उडवली होती.

पण त्यानंतर देशात कोरोनाचा आलेख वाढत गेला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. यामुळे देशात कडक लॉकडाऊन लावून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सगळी सूत्र हातात घ्यावी लागली. अमित शहा यांनी दिल्लीच्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन आढावा घेण्यास सुरुवात केली. सोबतचं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते. देशातील इतर परिस्थितीचा ते जातीने लक्ष घालून आढावा घेत राहिले.

त्यामुळे तेव्हाच असं म्हंटलं जावू लागलं की, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना आपल्या जबाबदारींची जाणीव नाही. ते आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकत नाहीत. पण ती वेळ राजकीय उलथापालथं करण्याची नव्हती. त्यामुळे त्यांची खुर्ची थोडक्यात वाचली होती. पण खांदेपालट होईल हे नक्की झालं होतं.

पुढे कोरोनाची पहिली लाट ओसरली, आकडेवारी कमी झाली, परिणामी आरोग्य मंत्रालय पुन्हा सुस्त पडल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर तर ७ मार्च रोजी डॉ. हर्षवर्धन यांनी घोषणाच केली कि,

कोरोना आता संपत आला आहे. काही शेवटचे दिवस बाकी आहेत. पण डॉ. हर्षवर्धन यांची हीच घोषणा त्यांचं मंत्रिपद घेऊन जाणारी ठरली आहे.

पण मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोकं वर काढलं. एप्रिल उजाडताना आणि मध्यापर्यंत तर केरळ वगळता देशाच्या जवळपास सर्वच भागात ऑक्सिजनची कमतरता जाणवायला लागली. रोज कमीत कमी ४ हजार जणांचा जीव लावू लागला. याच परिस्थितीमुळे जगभरातील माध्यमांनी भारताची प्रतिमा मलिन केली आणि डॉ. हर्षवर्धन यांच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

असं सांगितलं जातं कि, यानंतर पंतप्रधान कार्यालय आणि नीती आयोगाकडून कोरोनाच्या हाताळणीसाठी एम्पावर्ड ग्रुप्सच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी सूत्र हातात घेतली. परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी योजना बनवण्यास सुरुवात केली. यामुळे डॉ. हर्षवर्धन यांची भूमिका कमी होतं गेली. याची उदाहरण आपल्याला पंतप्रधानांच्या बैठकांमधून मिळून येतील.

१७ मार्च रोजी अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत होती, तेव्हा पंतप्रधान आणि या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. यात पंतप्रधानांनी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोरोना हाताळणीसाठी मुख्यमंत्र्यांना लक्ष देण्याची गरज आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं. सोबतच वाढत्या आलेखावर प्रेजेंटेशन देण्याचं काम आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांना सोपवलं गेलं.

यानंतर ८ एप्रिलला देखील पंतप्रधानांनी कोरोनाच्या परिस्थितीवर विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यात देखील प्रेजेंटेशन देण्याचं काम आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांना सोपवलं गेलं होतं.

पुढे २३ एप्रिल रोजी पुन्हा पंतप्रधानांनी कोरोनाचा ज्यादा प्रभाव असलेल्या ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीत देशाच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी प्रेजेंटेशन दिले होते.

एप्रिलमध्ये दुसऱ्या लाटेदरम्यान मोदींनी अनेक केंद्रीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. मात्र यातील जवळपास सगळ्या बैठकांमधून डॉ. हर्षवर्धन गायब असल्याचं दिसून आलं होतं. ४ एप्रिल आणि २७ एप्रिल रोजी पंतप्रधानांनी देशाच्या महामारी स्थितीवर आढावा बैठक घेतली होती. यात पंतप्रधानांच्या प्रमुख सचिवांपासून ते कॅबिनेट सचिवांपर्यंत सगळ्यांची उपस्थिती होती.

३० एप्रिल रोजी पंतप्रधानांनी एम्पावर्ड ग्रुप्सच्या कामाच्या पद्धतीला पारखण्यासाठी एक बैठक बोलावली होती. याच पद्धतीने त्यांनी १६ एप्रिल, २२ एप्रिल आणि २३ एप्रिल रोजी देशाच्या ऑक्सिजन उपलब्धतेवर एक आढावा बैठक घेतली. यात देखील सगळे मोठे अधिकारी आणि ऑक्सिजनचे उत्पादन करते उपस्थित होते.

दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन यांच्यावर सातत्यानं महामारीची परिस्थिती हाताळण्यासाठी अपयशी ठरल्याचे आरोप होऊ लागले होते, पण ते विरोधी पक्षाच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात व्यस्त असल्याचं दिसून आलं होतं. त्यांनी विरोधी पक्षाची सरकार असलेल्या राज्यांना कोरोना थांबवण्यासाठी योग्य पावलं उचलण्याचा सल्ला दिला आणि सोबत पहिल्या लाटेतून काही गोष्टी शिकण्यास सांगितल्या.

मात्र हीच पावलं जर वेळेत स्वतः डॉ. हर्षवर्धन यांनी उचलली असती, त्यांनी काही गोष्टी पहिल्या लाटेतून शिकल्या असत्या तर कदाचित आज त्यांना असा नारळ देण्याची वेळ नसती.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.