उसाच्या पाचटापासून इंधन मिळवण्याचा शोध या मराठी शास्त्रज्ञाने लावलाय…

मराठी माणूस हा कुठल्याही क्षेत्रात मागे नाही याच उदाहरण म्हणजे आजचा किस्सा. आजोबांनी समाजसुधारणेचा भक्कम पाया घालून दिला आणि पुढे नातवाने शिक्षणाच्या जोरावर एक नवीन आगळावेगळा शोध लावला आणि शेतकऱ्यांच्या हिताचं काम केलं. तर जाणून घेऊया मराठी शास्त्रज्ञाच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या महान कार्याबद्दल.
७ ऑगस्ट १९३६ साली आनंद दिनकर कर्वे यांचा पुण्यामध्ये जन्म झाला. आनंद कर्वे यांच्या घरी एकदम शिक्षित वातावरण होतं. त्यांचे वडील प्रा. दिनकर धोंडो कर्वे, भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि आई डॉ. इरावती कर्वे पुरातत्त्वशास्त्राच्या संशोधक, प्राध्यापक आणि प्रसिद्ध साहित्यिक होत्या. महर्षी धोंडो केशव कर्वे हे आनंद कर्व्यांचे आजोबा. १८८० साली त्यांनी विधवांचे पुनर्वसन आणि स्त्री-शिक्षणाची सुरुवात करून दिली.
पुणे विद्यापीठातून वयाच्या विसाव्या वर्षी आनंद कर्वे यांनी बी.एस्सी. पदवी मिळविली. नंतर उच्च शिक्षणासाठी ते जर्मनीच्या ट्यूबिंगन विद्यापीठात गेले आणि १९६० मध्ये त्यांनी वनस्पतिशास्त्रातील पीएच्.डी. पदवी संपादन केली. पंजाब, मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठात १९६१ ते ६६ त्यांनी व्याख्याता ते विभागप्रमुखाची नोकरी करून १९६६ मध्ये मेव्हण्यांच्या निंबकर फार्ममध्ये फलटणला संशोधन संचालक ते कृषिसंशोधन संचालक म्हणून १६ वर्षे काम केले.
पाचटापासून इंधन बनविण्याची प्रक्रिया डॉ. आनंद कर्वे यांनी शोधून काढली. या प्रकल्पात वर्षाला ४५० कोटी रुपये निर्माण करण्याची क्षमता आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि शहरी भागातील गरिबांना स्वस्त आणि प्रदूषण न करणारे इंधन मिळू शकते असा शोध त्यांनी लावला.
पारंपरिक जैवइंधन वापरून घरी स्वयंपाक कसा करता येईल यावर त्यांनी संशोधन केले. त्यांनी विकसित केलेल्या संयंत्रामधून फक्त एक किलो जैवखाद्यापासून ५०० ग्रॅम इंधन वायू मिळविता येत होता. याउलट एवढा इंधन वायू मिळविण्यासाठी पारंपरिक बायोगॅस संयंत्रासाठी ४० किलो शेण लागायचं. इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी कर्वे यांना ब्रिटनच्या राजवाड्यात या संयंत्राची प्रस्थापना करण्यासाठी आमंत्रित केले होते. पुढे महाराष्ट्रात अशा १,००० पेक्षा अधिक संयंत्रांची उभारणी करण्यात आली.
स्टेनलेस स्टील पिंपाच्या बंद भट्टीत बागेतील, शेतातील व घरातील ज्वलनशील काडी-कचऱ्यापासून व पाल्या-पाचोळ्यापासून कांडी कोळसा बनविण्याची पद्धत त्यांनी विकसित केली. शेतकऱ्यांच्या हिताचं आणि ग्रामीण भागातल्या लोकांना चांगल्या सुविधा कशा मिळतील यावर आनंद कर्वे यांनी काम केलं.
डॉ. कर्वे १९६६ सालापासून शेतीच्या क्षेत्रात आहेत. त्यांनी स्वतः उसाची शेती केली आहे. शेतीमधील टाकाऊ माल वाया घालविला जातो. अन्य क्षेत्रांतील टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर केला जातो. शेतीत तसे करता येते का, हा विचार त्यांना नेहमी पडत असे आणि पिडतही असे. त्यातून हा प्रकल्प पुढे आला.
ग्रीन ऑस्कर अशी ख्याती असलेला ब्रिटनचा मानाचा ॲश्डेन पुरस्कार २००२ आणि २००६ अशा दोन्ही वर्षी डॉ.आनंद कर्वेंनी पटकावला.
डॉ. आनंद कर्वे हे ठाणे येेथे २००३ या काळात भरलेल्या अडतिसाव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष होते. आनंद कर्वेंनी लेखन सुद्धा विपुल प्रमाणात केलं. कर्वे यांनी आजवर पन्नासपेक्षा अधिक संशोधन प्रकल्प राबविले. त्यांनी सुमारे १२५ संशोधनपर निबंध व १२५ शास्त्रीय शोधनिबंध प्रसिद्ध केले.
परदेशातसुद्धा आनंद कर्वे यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं. म्यानमार, इराण अशा देशांमध्ये त्यांनी प्रकल्प उभारले होते. अजूनही आनंद कर्वे आपल्या क्षेत्रात कार्यरत आहे. या मराठी शास्रज्ञाने लावलेल्या शोधाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली होती.
हे हि वाच भिडू :
- पुण्यातल्या एका चौकामुळं भारताची जर्मनीशी घट्ट सोयरीक झाली…
- गावातील तलाठ्यामुळे महर्षि कर्वे भारतरत्न पुरस्कार घेण्यासाठी वेळेवर पोहचू शकले नाहीत.
- लातूरच्या गढीचे देशमुख असूनही विलासराव पुण्यात गरवारे कॉलेजच्या लॅबमध्ये नोकरी करायचे.
- भारताच्या दुसऱ्या महिला डॉक्टर कृष्णाबाईंकडे कोल्हापूरचं अख्खं हॉस्पिटल सोपवलं…