जुही चावलाने नाकारलेली द्रौपदी रुपा गांगुलीने अजरामर केली….

1988 साली एक सिरीयल आली होती जी भारतभर गाजली. शिवाय या सिरियलमधली पात्रं लोकांना आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहेत की काय असं वाटू लागलं होतं. ती सिरीयल होती बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘महाभारत.’

महाभारत ही 90 च्या दशकातील सगळ्यात पॉप्युलर कार्यक्रमांपैकी एक मालिका होती. यातले सगळेच अभिनेते लोकांच्या लक्षात राहिले, पण यातली द्रौपदी लोकांच्या डोक्यातून गेली नाही. अजूनही बरेच मंडळी त्या द्रौपदीचे फॅन आहेत. हा किस्सा आहे त्याच अभिनेत्रीचा जिनं द्रौपदी हे पात्र अजरामर केलं होतं. द्रौपदीची भूमिका साकारली होती रूपा गांगुलीने.

25 नोव्हेंबर 1966 रोजी कोलकातामध्ये रुपा गांगुलीचा जन्म झाला. लहानपणापासूनच सिनेमाची आवड असल्याने साहजिकच आपण करिअर म्हणून सिनेमात काम करायला हरकत नाही, अशी रूपा गांगुलीची इच्छा होती. रूपा गांगुलीने तिचं सुरुवातीचं शिक्षण कोलकाता येथील बेलतला गर्ल्स हायस्कूलमधून केलं, त्यानंतर तिने कोलकाताच्या बेलतला गर्ल्स हायस्कूलमधून विज्ञान शाखेचं शिक्षण घेतलं, त्यानंतर ती टीव्ही आणि चित्रपटांच्या जगात आली.

रूपा गांगुलीने 1988 मध्ये बंगाली चित्रपट स्त्रीर पत्रामधून तिच्या करिअरची सुरुवात केली, त्याच वर्षी तिने टीव्ही मालिका महाभारतमध्येही अभिनय करण्यास सुरुवात केली. महाभारत सिरियलमध्ये द्रौपदीची भूमिका अगोदर जुही चावला साकारणार होती पण सिनेमाच्या शूटिंगच्या तारखांमध्ये मेळ बसत नसल्याने जुही चावलाने काढता पाय घेतला. महाभारत मालिकेचे दिग्दर्शक बी.आर.चोप्रा नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. एका बंगाली सिरियलमध्ये रूपा गांगुलीला बी आर चोप्रा यांनी पाहिलं आणि त्याच क्षणी त्यांनी ठरवून टाकलं की जुही चावलाची वाट बघत बसण्यापेक्षा रुपालाच द्रौपदी म्हणून कास्ट करायचं, शेवटी महाभारत मध्ये रूपा गांगुलीची एन्ट्री झाली.

महाभारत सिरीयल प्रचंड म्हणजे प्रचंड गाजली. महाभारत मालिकेतील तिच्या द्रौपदीच्या भूमिकेमुळे रूपा गांगुली इतकी प्रसिद्ध झाली होती की. त्यामुळे रूपा गांगुलीला अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम मिळालं, सगळीकडे नाव झालं. अनेक भाषिक सिनेमांमध्ये तिने उत्तम काम केलं आणि आपली अभिनय क्षमता दाखवून दिली.

रूपा गांगुलीने बंगाली चित्रपट स्त्रीर पत्र (1988), टीव्ही मालिका महाभारत (1988), हिंदी चित्रपट एक दिन अचानक (1989), तेलुगू चित्रपट ना इले ना स्वर्गम (1991), कन्नड चित्रपट पोलीस मथु दादा (1991), आसामी चित्रपट रणंगिनी (1991). 1992), ओडिया चित्रपट रणभूमी (1995), इंग्रजी चित्रपट Bow Barracks Forever (2004), पुन्हा बंगाली चित्रपट मुक्तबंध (1986) आणि पुन्हा हिंदी चित्रपट गणदेवता (1988) अशा अनेक सिनेमा आणि सिरियल्समध्ये काम केलं.

द्रौपदीच्या भूमिकेने लोकप्रिय झाल्यानंतर रूपाने गौतम घोषच्या पोद्मा नोदिर माझी (1993), अपर्णा सेनच्या युगांत (1995) आणि रितुपर्णो घोषच्या अंतरमहल (2006) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय छोट्या पडद्यावर ती ‘करम अपना अपना’, ‘लव्ह स्टोरी’, ‘वक्त तेलगा कौन अपना कौन पराया’, ‘कस्तुरी’, ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ आणि ‘कुछ तो’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसली.

रूपा गांगुलीला तिच्या आयुष्यात अनेक पुरस्कार आणि प्रशंसा मिळाली आहे. “महाभारत” या टीव्ही मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा तिच्या सर्व पुरस्कारांमध्ये अव्वल होता, रूपा गांगुलीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा कलाकार पुरस्कार देखील मिळाला आहे. यासोबतच तिला इतर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्येही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सध्या रूपा गांगुली राजकारणात आपलं नशीब आजमावत असून बंगालच्या राजकारणात सक्रिय होण्यासाठी कार्यरत आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.