मुंबईचं अंडरवर्ल्ड दुबईला शिफ्ट झालं आणि सावत्याच्या खुनानं दुबईचा शेख हादरला होता…

मुंबई अंडरवर्ल्डमुळे आर्थिक उलाढाली, टोळीयुद्धे यांना ऊत आला होता. मुंबईत वाढीस लागणारा अवैध व्यवसाय आता बाबरी मस्जिद प्रकरणामुळे दुबईत वळला होता. या काळात अनेक छोटे गुन्हेगार आता मोठे भाई झाले होते. असे अनेक भाई मुंबई पोलिसांनी कायमचे संपवले होते.

पण दुबईत या अंडरवर्ल्डची ठिणगी पडली ती सुनील सावंत उर्फ सावत्या या गुंडामुळे.

गिरणगावात चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये राहणारा हा सावत्या पुढे दुबईत गेला. त्याचा हा दुबईचा प्रवास थरारक होता. सुरवातीला एक साधा भुरटा गुंड आणि नंतर दाऊदच्या टोळीत त्याचा प्रवेश झाला. तिथे छोट्या शकीलच्या बरोबरीने त्याला वागणूक मिळू लागली. जेजे हॉस्पिटलमधल्या गोळीबारात सावत्या आघाडीवर होता. अनेक भानगडी करत तो इथवर पोहचला होता.

दाऊदच्या इशाऱ्यावर सावत्या सगळी कामं करू लागला होता. दाऊदच्या टोळीतून खून पाडण्याचं यंत्र म्हणजे सावत्या अशी ओळख त्याची झाली होती.

हळूहळू तो काठमांडूपासून सरकत सरकत दुबईत आला. आजवर त्यानं दुबई फक्त सिनेमांमध्ये पाहिलेली होती. दुबईतला पैसा आणि गगनचुंबी इमारती यातच तो हरखून गेला.

दाऊदचा विशेष माणूस असल्याने सावत्याला दुबईत विशेष वागणूक मिळत होती. दारू ,पैसा आणि बायका यामुळे त्याच्या वागण्याला उधाण आलं होत. दुबई दिमाखदार तर होतीच पण इथं तो मुक्तपणे फिरू शकत होता. मुंबईत जसे पोलीस कायम मागावर असायचे तसं इथे नव्हतं म्हणून तो डॉन बनून वावरू लागला.

पोरीच्या प्रेमाखातर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला आणि स्वतःच सुनील सावंत हे नाव सुलेमान म्हणून बदली केलं. आपण आधीच दुबईला यायला हवं होतं असं त्याला कायम वाटू लागलं.  दाऊदच्या टोळीतले त्याचे मित्र शरद शेट्टी आणि अनिल परब यांनी दुबईत हॉटेलं सुरु केली होती.

सावत्याला त्यांचा हेवा वाटू लागला आणि त्याने दुबईत मॉल किंवा हॉटेल सुरु करायचा विचार केला. दाऊद आपल्याला दुबईत काहीही मिळवून देऊ शकतो यावर त्याला फुल्ल कॉन्फिडन्स होता. तोवर दुबईत मॉल वैग्रे काहीच नव्हतं. दुबईत पहिला मॉल उभारण्याचं सावत्याचं स्वप्न होतं. 

तिथे त्याने अनेक हॉटेलांना भेट दिली, नेपाळी लोकांना कामाला ठेवण्यासाठी बोलणी केली. दिवसभर भेटीगाठींमुळे सावत्या थकला तेव्हा त्याचा एक लाडका बॉडीगार्ड होता शंकर त्याने त्याला हॉटेल तुफानमध्ये नेलं. आता हॉटेलमध्ये जाऊन निवांत दारू प्यावी आणि जेवावं या विचारात तो होता.

अचानक दुसऱ्या गाडीतून तीन माणसं उतरली आणि त्यांनी गाडीवर गोळीबार सुरु केला. सावत्याने बॉडीगार्ड शंकरला पुढे ढकललं तरी त्याच्या खांद्याला आणि हाताला एक गोळी लागली.

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जिवलग मित्राला धोक्यात घालण्याइतका सावत्या डरपोक असेल यावर मारेकऱ्यांचाहि विश्वास बसेना.

शंकरला मारेकऱ्यांनी ठार केलं.

दुबईच्या रस्त्यावरून सावत्या जीव मुठीत घेऊन पळत होता. आजवर मुंबईत त्याने अनेक निष्पाप जीवांचे बळी घेतले होते मात्र आज त्याचाच गेम होत होता. दुबईचं ऊन, शरीरातून वाहणारं रक्त आणि पळापळ यात सावत्या दमून गेला. आता आपण वाचू शकत नाही हे त्याला जेव्हा कळलं तेव्हा त्याने एका खांबाला घट्ट पकडून ठेवलं.

मारेकऱ्यांनी त्याच्या अंगावर फटाफट गोळ्या झाडल्या. या मारेकऱ्यांपैकी पंड्या नावाचा मारेकरी होता. त्याने शांतपणे जाऊन जखमी सावत्याचा गळा चिरला आणि रक्ताच्या थारोळ्यात त्याला तसाच सोडून ते निघून गेले. कारण सावत्याने इतके विचित्र मर्डर केलेले होते कि त्याचा सगळा राग निघाला होता. मुंबईचा बदला हा दुबईत निघाला. 

या घटनेने दुबईचे पोलीस प्रमुख ले.जन.धाही खलफन अल तमीम प्रचंड संतापले. भारतीय गुंड दुबईत येऊन भर रस्त्यावर निघृण हत्या करतात यावर ते चिडले आणि तपास सुरु केला. यात जी माहिती मिळाली ती धक्कादायक होती. कारण  दाऊदच्या टोळीतले सावत्याचे मित्र शरद शेट्टी आणि अनिल परब यांनीच हा खून मारेकर्यांना पैसे देऊन घडवून आणल्याचं समोर आलं. याचा दाऊदलाही धक्का बसला.

या हिंसाचारामुळे दुबईचा प्रमुख शेख मोहम्मद घाबरून गेला. सगळ्या दुबईत या प्रकरणाची चर्चा होती. मुंबई किंवा कराची सारखी प्रसिद्धी दुबईला मिळवू द्यायची नाही अशी त्याची इच्छा होती. या हिंसाचाराचा फटका व्यवसायाला बसू नये म्हणून त्याने संपूर्ण शहरात शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले.

मुंबईचे लोकल गुंड दुबईत येऊन राडे करताय याचा शेखला प्रचंड राग आला होता. दुबईतल्या पोलिसांना त्याने सक्तीचे आदेश देऊ केले आणि हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला. पण दुबईत घडलेला हा सावत्याचा मर्डर मुंबईत काय प्रकारचं अंडरवर्ल्ड होतं आणि पोलिसांनी काय काथ्याकूट या गुंडांना पकडण्यासाठी केला असेल याचा अंदाज येतो. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.