असा साजरा झाला होता महाराष्ट्र स्थापनेचा सोहळा..

संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ही प्रत्येक मराठी मनामनात घर करून राहिलेली ऐतिहासिक घटना. १०५ हुतात्म्यांनी सांडलेलं रक्त, कित्येक आंदोलकांवर झालेला अत्याचार, हाल अपेष्टा यातून हे स्वप्न साकार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची महुर्तमेढ रोवली होती तो संकल्प १ मे १९६० रोजी खऱ्या अर्थानं पूर्ण झाला.

आजवर आपण वाचत आलो आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंनी संयुक्त महाराष्ट्राचा कळस पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना सोपवला होता. त्या मंगलमय दिवशी पहिला महाराष्ट्र दिन कसा साजरा झाला याची उत्सुकता सर्वांना असते.

चला तर मग पाहू कसा साजरा झाला होता महाराष्ट्र स्थापनेचा सोहळा ?

३० एप्रिल १९६० रोजी रात्री ११.३० वाजता मुंबईच्या ‘राजभवना’च्या विस्तीर्ण आवारात रामलाल यांच्या शहनाईच्या मंगल सुरांनी कार्यक्रमाला सुरवात झाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी खास व्यासपीठ उभारलेलं होतं. तिथे महाराष्ट्राची उत्सव मुद्रा ‘लामण दिवा’ झळकत होता. राजभवनाच्या इमारतीवर काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा इंदिरा गांधी यांचं महाराष्ट्राच्या पारंपरिक वेशभूषेतील एक मोठं चित्र झळकत होतं.

३० एप्रिलच्या रात्री बरोबर १२ च्या ठोक्याला कार्यक्रमाचे उदघाटक पंतप्रधान पंडित जवाहरलाल यांनी एका विजेच्या बटणाची कळ दाबली आणि ती दाबताच व्यासपीठाजवळ लावलेला भगव्या रंगातील महाराष्ट्राचा विशाल नकाशा प्रकाशमान झाला. 

आजपासून नवं महाराष्ट्र राज्य स्थापन झालं असल्याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली.

त्याचक्षणी मुंबई शहरभरातील ६५ कापड गिरण्यांच्या भोंग्यांनी आसमंत दुमदुमून गेलं. शहरातील शेकडो मंदिरे चर्च आदी प्रार्थना स्थळामध्ये घंटानाद घाणाणू लागले. मुंबईतील रेलगाड्यांच्या शिट्ट्यांचा एकच आवाज सुरु झाला. समुद्रकिनाऱ्यावरील जहाजांचे भोंगे साद देऊ लागले. उद्योगनगरी मुंबईतील विविध घटकांच्या अस्तित्वाचा व सहभागाचं सूचना अशा ‘ध्वनी योजनेतून ‘ केलं गेलं.

या प्रसंगी संगीतकार वसंत देसाई यांच्या वाद्यवृंदाच्या साथीने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी घनश्याम सुंदरा हि भूपाळी गेली व नंतर पसायदान म्हटलं. केंद्रीय मंत्री कृष्ण मेनन, राज्यपाल श्रीप्रकाश, मध्यप्रदेशचे राज्यपाल हरिभाऊ पाटसकर, पंजाबचे राज्यपाल काकासाहेब गाडगीळ आदी सामान्यजन उपस्थित होते.

राज्यपालांचं भाषण झाल्यावर पंडित नेहरू यांनी आपलं उद्घाटनपर भाषण केलं,

“आज मी आशीर्वाद देण्यासाठी नाही, कार्य करण्यासाठी आलो आहे. जनतेने संयुक्त महाराष्ट्राची मागणी केली होती, ती आज पूर्ण झाली आहे. महाराष्ट्राची उन्नती ही देशाची उन्नती आहे, अशी मनोभूमिका ठेवली पाहिजे. आज आपण आनंदात असताना विदर्भ मात्र दुःखात आहे व त्यांचं दुःख पाहून मला यातना होतात. आपण सर्व मिळून त्यांचं दुःख व मनातील संशय दूर करूया.”

आपल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणात यशवंतराव चव्हाण यांनी “हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्रीच्या काळ्या फत्तरातील हा मराठमोळा सदैव तयार राहील” अशी हमी दिली.

याच कार्यक्रमात यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणून त्याचे पूजन केले.

१ मे १९६० रोजी दुपारी १२.३० वाजता मुंबईच्या नव्या सचिवालया समोर विशाल शामियान्याची सोय केली होती. तिथेच यशवंतराव चव्हाण व इतर मंत्रीगणाला राज्यपाल श्रीप्रकाश यांनी शपथ दिली. मंत्रिमंडळातील मराठी मंत्र्यांसह होमी तल्यार खान यांनी मराठी मध्ये शपथ घेतली. फक्त विधिमंत्री शांतीलाल शहा यांनी हिंदीतून शपथ घेतली.

दुपारी तीन वाजता मुंबईच्या राणी बागेपासून मिरवणूक निघाली.

सुमारे २०० ट्रक, बैलगाड्या, लेझीम पथक यांच्यासह वाजत गाजत मिरवणूक दादरच्या शिवाजी पार्कला पोहचली. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी भाषणाला सुरवात केली. थोड्या वेळाने त्यांनी व्यासपीठाच्या बाजूला उपस्थितीत असलेल्या एस.एम.जोशी याना आग्रहपूर्वक बोलावून घेतलं. आणि म्हटलं,

आता तुम्ही आणि मी एकत्र येऊया आणि हातात हात घालून मिरवणुकीत सहभागी होऊया.

मुंबई चौपाटीच्या समुद्रकिनारी सर्वत्र सुशोभित केलेल्या होड्या विहार करत होत्या. संध्याकाळच्या कार्यक्रमात बहु असोत सुंदर संपन्न कि महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या गीताला वसंत देसाई यांनी साज दिला व लता मंगेशकर यांनी ते सादर करून कार्यक्रमाला सुरवात केली. या प्रसंगी यशवंतराव चव्हाण म्हणाले,

“गेली शंभर सव्वाशे वर्ष गुजरात व महाराष्ट्र एकत्र होते. ते आता दोन होत आहेत. मध्यंतरी काही कारणांमुळे झालेले झगडे विसरावेत व शेजाऱ्यांप्रमाणे बंधुभावाने राहावं.”

गेल्यावर्षी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन महाराष्ट्र दिनानिमित्त एक खास व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये अगदी १ मेच्या मध्यरात्री महाराष्ट्र राज्यच्या निर्मितीची तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी केलेली घोषणा, महाराष्ट्राचा नवा नकाशाची पहिली झलक अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.

महाराष्ट्रामध्ये पाच दिवस कशापद्धतीने नवीन राज्याच्या निर्मितीचा उत्साह साजरा करण्यात आला हे ही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते बालशिवाजी आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे अनावरण, मुंबईमधील इमारतींना पाच दिवस करण्यात आलेली रोषणाई अशा अनेक घटना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

त्याचप्रमाणे देशातील प्रमुख धर्माच्या धर्मगुरुंनी मुंबईतील क्रॉस मैदानात केलेल्या सामुहिक प्रार्थनांपासून ते कामगारांनी काढलेल्या जल्लोष यात्रा आणि सिंहगडवरील लढाईच्या नाटकापासून ते यशवंतराव चव्हाण यांच्या शपथविधीपर्यंत अनेक घटनांचे चित्रण पहायला मिळते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.