२० वर्षाच्या गब्बरसिंगने महायुद्धात जर्मनीच्या ३५० सैनिकांना कैद केलं होतं….

भारत हा वीर जवानांची भूमी म्हणून ओळखला जातो. ज्या ज्या वेळी या देशावर संकटं आली त्या त्या वेळी भारताच्या वीरपुरुषांनी आपल्या जीवाची बाजी लावली. आजचा किस्सासुद्धा असाच आहे. एका वीस वर्षाच्या भारतीय वीराने पहिल्या महायुद्धात जबरदस्त कामगिरी केली होती त्यामुळे ब्रिटिश आर्मीसुद्धा चकित झाली होती.

उत्तराखंडला देवभूमी म्हणून ओळखलं जातं. पण उत्तराखंड फक्त देवभूमी म्हणूनच ओळखली जात नाही तर हि भूमी शहिद जवानांची भूमी म्हणून देखील ओळखली जाते. देशावर ज्या ज्यावेळी आक्रमणं झाली तेव्हा गढवालच्या वीर सैनिकांनी शर्थीने लढा दिला. अशाच एका वीर सैनिकाची हि गोष्ट. 

शहीद गब्बरसिंग नेगी. या शहीद सैनिकाच्या पराक्रमामुळे उत्तराखंडला आणि गढवाल प्रांताला लँड ऑफ गब्बरसिंग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. रायफलमॅन हि गब्बरसिंग नेगी यांना देण्यात आलेली पदवी होती आणि ते एक उत्कृष्ठ आणि पट्टीचे नेमबाज होते.

रायफलमॅन गब्बरसिंग नेगी हे गढवालमधल्या मंजयूड गावाचे रहिवासी होते. देशासाठी काहीही करण्याची धमक त्यांच्या थोटी. देशप्रेमाखातर ते १९१३ साली गढवाल रायफल्समध्ये सहभागी झाले. या कामात ते असतानाच पहिल्या विश्वयुद्धाचं बिगुल वाजलं. ब्रिटिश आर्मीतर्फे गब्बर सिंग नेगी यांना फ्रान्समध्ये पाठवण्यात आलं.

गब्बर सिंग नेगी यांना फ्रान्सला पाठवण्यात आलं तेव्हा त्यांचं वय फक्त २० वर्षे होतो. या वयात तरुण पिढी कुठेतरी भरकटलेली दिसते त्या वयात गब्बर सिंग नेगी यांनी मोठा पराक्रम गाजवला होता. पहिलं विश्व युद्ध सुरु झालं होतं, बटालियन द्वितीय गढवाल रायफलची धुरा २० वर्षाच्या गब्बर सिंग नेगी यांच्या खांद्यावर देण्यात आली. 

आता गब्बर सिंग नेगी यांना आपली सेना घेऊन जर्मन सैन्यांना पराभूत करायचं होतं. जर्मन सैन्याला युद्धाच्या मैदानात हरवणं मुळीच सोपं नव्हतं.

कारण जर्मन सैन्याकडे अत्याधुनिक शस्त्रांची ताकद होती. पण गब्बर सिंग नेगींनी हुशारीने काम घेत युक्तीने तब्बल ३५० जर्मन सैनिकांना कैद केलं.

हे हि कमी होतं कि काय म्हणून गब्बर सिंग नेगी यांनी जर्मनच्या लोकप्रिय न्यू शैपल लँड वर सुद्धा आपली हुकूमत पैदा केली.

युद्धामध्ये आपला पराक्रम आणि शौर्य दाखवत १९१५ मध्ये २० वर्षाचे गब्बर सिंग नेगी हे धारातीर्थी पडले. ब्रिटिश आर्मीकडून ते गेले असले तरी ते अस्सल देशभक्त होते. इतक्या कमी वयात देशासाठी शहीद होणे हि मुळीच लहान गोष्ट नव्हती आणि त्याकाळात असं धाडस दाखवायलाही शौर्य हवं होतं ते शहीद गब्बर सिंग नेगी यांच्या ठायी होतं.

युद्धाच्या मैदानात त्यांनी दाखवलेली शक्ती आणि युक्ती हे खऱ्या वीराचं भूषण होतं. त्यांचा हा अविश्वसनीय पराक्रम बघून ब्रिटिश आर्मीसुद्धा चकित झाली होती. विश्वयुद्धाच्या मैदानात धारातीर्थी पडलेल्या शहीद गब्बर सिंग नेगी यांना व्हिक्टोरिया क्रॉस सन्मान मिळाला. हा सन्मान ब्रिटिश आर्मीने त्यांना देऊन त्यांचा गौरव केला होता. ब्रिटन सरकारकडून देण्यात येणारा हा सगळ्यात मोठा सन्मान समजला जातो. 

आज घडीलासुद्धा उत्तराखंडच्या गढवालमध्ये घराघरात लहान मुलांना प्रेरित आणि देशभक्तीचे धडे गिरवण्यासाठी शहीद गब्बर सिंग नेगी यांच्या गोष्टी सांगितल्या जातात. १९२५ साली त्यांच्या स्मरणार्थ गढवाल रायफल द्वारे एक मेमोरियल बनवण्यात आलं. रायफलमॅन हे त्यांचच नाव त्याकाळात ब्रिटिश आर्मीसुद्धा सन्मानाने उच्चारत असे.

उत्तराखंडच्या सगळ्यात महान लोकांमध्ये रायफलमॅन शहीद गब्बरसिंग नेगी यांचं नाव घेतलं जातं.

तब्बल ३५० जर्मन सैनिकांना कैद करण्याचं त्यांनी धाडस दाखवलं होतं हि काय साधी गोष्ट नव्हतीच…..

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.