प्रजेला रेल्वेत बसवून स्वतः राजेसाहेब इंजिन चालवत आहेत हे चित्र ग्वाल्हेरमध्ये दिसायचं

मराठा साम्राज्याला दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचवणारे शिंदे घराणं. जनकोजी, जयाप्पा,  दत्ताजी , महादजी शिंदे असे अनेक पराक्रमी वीर या घराण्यात होऊन गेले. ग्वाल्हेरला त्यांनी आपली राजधानी स्थापन केली. संपूर्ण माळवा, व तंत्र भारत पादाक्रांत केला.

महादजींच्या काळापासून शिंदेंना अलिजा बहादूर ही पदवी सन्मानाने बहाल करण्यात आली. त्यांनी लाल किल्ल्यात बसून संपूर्ण देशाची सत्ता चालवली होती. त्यांच्या फ्रेंच पलटणीचा धाक इंग्रजांना देखील होता.

जोवर महादजी शिंदे हयात होते तोपर्यंत इंग्रजांना भारतात पाय रोवणे जमले नाही.

फक्त पराक्रमानेच नाही तर आपल्या कुशल कारभाराने शिंदेनी आपल्या प्रजेची मने जिंकून घेतली. याच घराण्यातील बायजाबाई शिंदे यांनी राज्यकारभार कसा करावा याचा आदर्श घालून दिला. पुढे मराठा साम्राज्य कोसळले, पेशवाई बुडाली. इंग्रजांच्या आगमनानंतर देखील शिंदे राजघराण्याचे वजन कायम राहिले.

याच घराण्यातील जयाजीराव शिंदे महाराज यांनी १८७४ साली ग्वाल्हेर मध्ये युरोपियन स्टाईलचा एक भव्य राजवाडा बांधला. त्याला नाव दिलं जयविलास पॅलेस. या राजमहालात तब्बल ४०० खोल्या होत्या. याच्या मुख्य दरबार हॉलमध्ये त्यांनी खास बेल्जीयममधून साडे तीन हजार किलो वजनाचा दिमाखदार झुंबर मागवला होता. तो बसवण्यासाठी खास तीन हत्ती मागवण्यात आले होते.

इतके ऐश्वर्य असूनही जयाजीराव महाराजांच्या मुलाचे म्हणजेच युवराज माधोरावांचे एकच स्वप्न होते,

आपल्या संस्थानात रेल्वे सुरु करायची.

हे माधोराव शिंदे म्हणजे आजच्या ज्योतिरादित्य शिंदे यांचे आजोबा. साधारण अठराशे सत्तरचा हा काळ. भारतात रेल्वेचं आगमन झालं होतं. मुंबई पाठोपाठ देशभरात इतरत्र रेल्वेचं जाळं पसरण्यास सुरवात झाली होती. बडोद्याच्या गायकवाड महाराजांनी बैलाच्या साहाय्याने ओढली जाणारी रेल्वे आपल्या राज्यात सुरु केली होती.

माधोराव महाराज परदेशात राहून आले होते. रेल्वे मुळे युरोपमध्ये झालेले बदल, आर्थिक व सामाजिक जीवनात होणारा विकास त्यांनी अनुभवला होता. पण ग्वाल्हेरमध्ये रेल्वे सुरु करण्यास अनेक अडचणी होत्या. एक तर हा निबिड जंगलाचा भाग होता. इथे लूटमार मोठ्या प्रमाणात चालायची.

या सगळ्यातून रेल्वे साकारणे खूप अवघड गोष्ट होती. मात्र माधोराव शिंदे देखील प्रचंड जिद्दी होते.

ते १८८६ साली वडिलांच्या मृत्यूनंतर शिंदे शाहीच्या गादीवर आले. महाराजा बनल्यावर त्यांनी ग्वाल्हेर संस्थानच्या रेल्वेला गती दिली. १८९५ साली ग्वाल्हेर ते भिंड या दरम्यान नॅरोगेज  रेल्वे मार्गाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

नाव देण्यात आलं ग्वालियर लाईट रेल्वे 

पुढच्या दोन वर्षात माधोरावांच्या पुढाकारामुळे असंख्य अडथळे पार करून हा रेल्वेमार्ग साकार झाला. १८९७ सालच्या दुष्काळात या रेल्वेने ग्वाल्हेर संस्थानमध्ये धान्यपुरवठा केला.

पुढच्या काळात संस्थानातील अठ्ठावीस स्थानके ‘ग्वालियर लाईट’ रेल्वेमार्गे जोडली गेली. २ डिसेंबर १८९९ रोजी भारताचा व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झनच्या हस्ते ग्वाल्हेर-शिवपुरी या मार्गाचे उदघाटन करण्यात आले.  

त्याकाळात इतर राजे शानो शौकीत गुंतले होते तेव्हा हा राजा आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी रेल्वेच स्वप्न साकारत होता. त्यांना या स्वप्नाने इतकं झपाटलं होतं की त्यांनी रेल्वेचे इंजिन चालविण्याचे कौशल्य अवगत करून घेतलं होतं. कधी कधी लहर आली की ते स्वतः इंजिन चालवत देखील असत.

प्रजा रेल्वेत दाटीवाटीने बसली आहे राजे साहेब स्वतः इंजिन चालवीत आहेत हे चित्र ग्वाल्हेर मध्ये सहज दिसायचं..

माधोराव शिंदे टेक्नोफ्रिक होते. विशेषतः रेल्वे त्यांना इतकी प्रिय होती की, एक इंजिन निकामी झाल्यानंतर त्यांनी त्याच्या स्मरणार्थ, महालाच्या बागेमध्ये चक्क एक समाधी तयार करवून घेतली.

याच बरोबर त्यांनी आपल्या राजवाड्यात एक खास चांदीची रेल्वे बनवून घेतली होती.

१९०६ साली लंडनच्या ‘बॅसेट लाओक’ या खेळण्यातील ट्रेन्स तयार करणाऱ्या ब्रिटीश कंपनी कडून माधो राजे यांनी ही खास चांदीची ट्रेन तयार करवून घेतली. ही ट्रेन जयविलास पॅलेसमधील भव्य भोजन कक्षातील टेबलवर ठेवण्यात आली. या ट्रेनला टेबलवर धावण्यासाठी मिनी ट्रॅक्स बसविण्यात आले आहेत. तिच्या खास चांदीच्या सात कोचमधून  टेबलवर  सिगार्स, आणि मद्य, महाराजांच्या पाहुण्यांना सर्व्ह केले जात असे.

आज ही हे ट्रेन ग्वाल्हेरच्या जयविलास पॅलेसमध्ये पाहता येते. शिंदे घराण्याचे सध्याचे वंशज  ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या जेवणाच्या टेबलवर या खास ट्रेनने जेवण सर्व्ह केले जाते. देशविदेशावरून पर्यटक जयविलास पॅलेस मध्ये हि रेल्वे पाहायला येतात.

हे झालं खेळण्यातल्या रेल्वेचं पण माधोराव शिंदे यांचं पहिलं प्रेम असणाऱ्या ग्वाल्हेर लाईट रेल्वेचं काय झालं ?

स्वातंत्र्यानंतर ग्वाल्हेर लाईट रेल्वेला भारत सरकारच्या अख्त्यारितीखाली घेण्यात आलं. ती आता “सिंधिया स्टेट रेल्वे” बनली होती. सुरवातीला वाफेच्या इंजिनवर धावणाऱ्या या ट्रेनला अंतर डिझेल इंजिन बसवण्यात आले. अगदी काल परवा पर्यंत ही भारतातील दुर्मिळ नॅरो गेज ट्रेन धावत होती.

स्थापनेच्या १३० वर्षानंतर आता सरकारने या मार्गाला ब्रॉडगेज बनवण्यास सुरवात केली आहे. येत्या काही दिवसात ही राजेशाही ट्रेन कायमची काळाच्या पडद्याआड जाईल आणि ग्वाल्हेरच्या जनतेच्या जनतेच्या मनात फक्त आठवणींच्या रूपात उरेल हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.