एकदा बच्चनने बापाला विचारलं, “हमें पैदा क्यों किया ?”
स्वतःची दुःख गाणं गुणगुणत स्वीकार करणार कवी म्हणजे हरिवंशराय बच्चन. आज हरिवंशराय बच्चन यांचा जन्मदिन. हरिवंशराय राय यांचे सुपुत्र आज भारतीय सिनेसृष्टीचे शेहेनशाह आहेत. अनेक मुलाखतींमध्ये किंवा सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्याकडून वडील हरिवंशराय यांचा आदरयुक्त उल्लेख होतो. खूपदा वडिलांविषयी असलेल्या आठवणी जागवल्या जातात. पण अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा अमिताभ कामासाठी स्ट्रगल करत होते तेव्हा वैतागून “तुम्ही मला जन्माला का घातलं?” असा प्रश्न त्यांनी वडिलांना विचारला.
मुलाच्या या प्रश्नाला हरिवंशराय यांनी कोणतं उत्तर दिलं असेल? बाप – मुलाच्या नात्याचा हा किस्सा उलगडण्याआधी हरिवंशराय बच्चन यांचा प्रवास जाणून घेऊ.
२७ नोव्हेंबर १९०७ रोजी अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. अलाहाबाद येथील विश्वविद्यालयात इंग्रजी मध्ये त्यांनी एम. ए. केलं. त्यावेळी विवाह लवकर व्हायचे. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी श्यामा बच्चन यांच्याशी विवाह केला. परंतु १९३६ साली टीबी मुळे त्यांचं निधन झालं. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर पाच वर्षांनी १९४१ साली त्यांनी पंजाबी कुडी असलेल्या तेजी सुरी यांच्याशी लग्न केलं.
तेजी यांचे भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. हरिवंशराय आणि तेजी यांना अमिताभ आणि अजिताभ ही दोन मुलं झाली.
हळूहळू काव्यजगतात हरिवंशराय बच्चन यांची मशहूर कवी म्हणून ओळख झाली होती. १९२९ साली त्यांनी ‘तेरा हार’ हा काव्यसंग्रह लिहिला. तर १९३५ साली त्यांनी लिहिलेला ‘मधुशाला’ या काव्यसंग्रहाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. आधुनिक कवी म्हणून हरिवंशराय बच्चन ओळखले जाऊ लागले.
एका बाजूला हरिवंशराय कवितांच्या दुनियेत मुशाफिरी करत होते. तर दुसऱ्या बाजूला त्यांचा मुलगा अमिताभ हा नोकरीसाठी इथे तिथे धक्के सहन करत होता.
अमिताभला नोकरी मिळत नव्हती. इथे तिथे नोकरी साठी अर्ज करत होता. परंतु नोकरी मिळत नव्हती, मिळत होता फक्त नकार. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमिताभ नोकरीच्या शोधासाठी दिल्लीला गेला. आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून त्याने अर्ज केला होता. परंतु तिथेही आवाज बरोबर नाही असं सांगून अमिताभला माघारी पाठवण्यात आले. वय वाढत असतं आणि हातात काम नसतं तेव्हा माणसाची चिडचिड होते.
असंच काहीसं अमिताभचं झालं होतं. बेरोजगारी आणि प्रत्येक ठिकाणी अनुभवत असलेला नकार सहन केल्यामुळे वैतागलेला अमिताभ एकदिवस थेट वडीलांसमोर जाऊन उभा राहिला.
कोणतीही दस्तक न देता तो थेट हरिवंशराय यांच्या खोलीत शिरला. रागाच्या भरात मोठ्या आवाजात अमिताभ वडिलांना म्हणाला,
“तुम्ही मला जन्म का दिला ?”
मुलाकडून आलेला हा प्रश्न ऐकून हरिवंशराय यांच्या मनाची अवस्था काय झाली असेल याची आपण कल्पना करू शकत नाही.
ते काही न बोलता व्यथित नजरेने अमिताभ कडे बघत राहिले. खूप वेळ त्या खोलीत शांतता होती. वडिलांकडून उत्तर न मिळाल्याने अमिताभला त्यांच्यासमोर उभं राहताना अवघडल्यासारखे झालं. तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. रागाच्या भरात वडिलांना दुखावल्यामुळे अमिताभ त्या रात्री पूर्ण बेचैन होता.
पोटचा मुलगा जेव्हा असा प्रश्न विचारतो तेव्हा हरिवंशराय सारखा हळव्या मनाचा कवी आतून नक्कीच दुःखी झाला असावा. पुढच्या दिवशी सकाळी हरिवंशराय यांनी अमिताभला उठवलं. त्याच्या हातात एक कागद देऊन ते निघून गेले. अमिताभने वडिलांनी दिलेला कागद वाचायला घेतला. त्यामध्ये होती हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेली कविता. शीर्षक ‘नया लिक’.
ज़िन्दगी और ज़माने की कश्मकश से घबराकर,मेरे लड़के मुझसे पूछते हैं,
हमें पैदा क्यों किया था?
और मेरे पास इसके सिवा
कोई जवाब नहीं है कि,
मेरे बाप ने भी मुझसे बिना पूछे
मुझे पैदा किया था
और मेरे बाप से बिना पूछे उनके बाप ने उन्हें
और मेरे बाबा से बिना पूछे ,उनके बाप ने उन्हें…
जिंदगी और जमाने की कश्मकश
पहले भी थी,
अब भी है, शायद ज्यादा,
आगे भी होगी, शायद और ज्यादा।
तुम ही नई लीक धरना,
अपने बेटों से पूछकर उन्हें पैदा करना !
या कवितेचा थोडक्यात अर्थ सांगायचं झाला तर.. आज माझ्या मुलाने मला विचारलं मला जन्म का दिला? परंतु जीवनाची ही साखळी फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. पण माझ्या मुला, तू असं करू नकोस. तू एखादी नवी वाट धर आणि मुलांना जन्म दे.
या कवितेच्या प्रत्येक ओळीतून अमिताभच्या एका प्रश्नाने हरिवंशराय यांना किती यातना झाल्या होत्या, हे अनुभवायला मिळतं. परंतु स्वतःला झालेलं दुःख बाजूला सारून अमिताभला कवितेच्या माध्यमातून दिलेली समज, हरिवंशराय यांचं मोठेपण दर्शवते.
पुढे अमिताभ बच्चन भारतीय सिनेसृष्टीत सुपरस्टार पदावर पोहोचले. परंतु पावलोपावली वडिलांकडून मिळालेली शिकवण ते विसरले नाहीत. महान कवी आणि मुलाविषयी प्रेम असलेला एक हळव्या मनाचा बाप अशी हरिवंशराय बच्चन यांची दोन रूपं आपल्याला दिसतात. या ग्रेट माणसाला सलाम !
हे ही वाच भिडू.
- अमिताभ बच्चनचा रोल कापून शशी कपूरने त्याच्यावर उपकारच केले
- राजीव गांधींची कॉपी करायला गेलेला अमिताभ वडिलांचा मार खाता खाता वाचला.
- अमिताभला मृत्यूने मारलेला पहिला ठोसा !!
- रेखाकडे सेटिंग लागावी म्हणून बच्चनने तिच्या पप्पांना खासदार करायचा प्लॅन केला होता.