१०० वर्षांपेक्षा जुना असलेला सपट ब्रँड महाराष्ट्रातून मोठा झालाय…

भारतभरात अनेक ब्रँड हे सगळी भारत स्वातंत्र्य होण्याचेसुद्धा साक्षीदार आहेत. पैकी आज ज्या ब्रान्डबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्या ब्रॅण्डने अनेक पिढ्यानपिढ्या पाहिलेल्या आहेत. अनेक लोकांची सकाळ या ब्रॅण्डच्या चहाने व्हायची आणि अजूनही होते. दुखल्या खुपल्यापासून ते चहाने तोंड गोड करणाऱ्या या ब्रॅण्डबद्दल आपण जाणून घेऊया.

सूर्रर्रर्रर्र के पियो अशी टॅगलाईन असलेला परिवार चहा असो किंवा १८९७ पासून तुमच्या चहाची चव कायम ठेवणारा सपट चहा असो हे दोन प्रोडक्ट म्हणजे भारतातल्या घराघरात परिचित आहेत. प्रत्येक घरात हे दोन ब्रँड कधी ना कधी तरी वापर जुना हा ब्रँड आहे. अनेक लोकांच्या आठवणी या ब्रॅण्डसोबत जोडलेल्या आहेत. तर हा ब्रँड कोणी सुरु केला आणि हा ब्रँड कसा पूर्ण भारतभर पसरला याबद्दल सपट ब्रॅण्डची यशोगाथा जाणून घेऊया.

१८९७ साली रमाशंकर हरिभाई जोशी यांनी सपट या ब्रॅण्डची सुरवात केली.

ब्रिटिश काळात कुठल्याही एका भारतीय माणसाने कंपनी सुरु करणे मोठी गोष्ट होती. नाशिकमध्ये या ब्रॅण्डने मुख्यालय आणि मुंबईमध्ये हेडक्वार्टर्स तयार केले. सपट ब्रँड बनलेला नव्हता तेव्हा सगळ्यात आधी सुरवात सपटने केली ती सपट मलम पासून. आजही सपट मलम हा भारतातला सगळ्यात जुना हेल्थकेअर ब्रँड मानला जातो.

सपट मलम गजकर्ण, खाज, खरूज, नायटा अशा अनेक गोष्टींवर उपयुक्त होता. १८९७ पासून त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. त्याकाळात हा सपट मलम जितका खपत होता तितकाच आजही खपला जातो. पुढे सपट मलमला मिळालेली लोकप्रियता बघून अजून काहीतरी वेगळं करायच्या बेतात सपटचे मालक आर एच जोशी होते. 

सपटने नवीन काहीतरी करण्याच्या प्रयत्नात सपट चहा बाजारात उतरवला.  १९००च्या सुरवातीच्या काळात सपट लोशन/मलम जोरात विक्री होत होतं पण १९१० च्या सुमारास सपट चहाने वेग पकडला आणि चांद तारा या इराक आणि मध्य पूर्वेत फेमस असलेल्या चहाला सपटने टक्कर दिली. मिडल इस्टमध्ये मोठी लोकप्रियता सपटने कमावली.

१९४० मध्ये सपटने फार्मास्युटिकल इंडस्ट्रीत पाऊल टाकायला सुरवात केली.

नवीन उत्पादने आणि भौगोलिकदृष्ट्या सपटने भारतभर पाय पसरायला सुरवात केली. १९६०-१९८० हा काळ सपट चहाच्या दृष्टीने मोठा सुवर्णकाळ होता. कारण या काळात सपटने स्वतःच्या ब्रॅण्डच्या व्हॅन सुरु केल्या ज्यातून सपट चहा विकला जात होता. प्रमोशन करण्याचा त्यांचा हा अंदाज सातारा, सांगली, कोल्हापूर अशा पश्चिम महाराष्ट्रात चांगलाच गाजला होता.

१९९० च्या काळात सपट चहाने व्हॅरिएशन म्हणून परिवार हा नवीन चहा मार्केटमध्ये उतरवला. ग्रामीण भागात हा ब्रँड व्हीआयपी म्हणून बघितला गेला. परिवार ब्रँड मोठा होण्यामागे कारण होतं ग्रामीण भागात सपट चहाने केलेली पब्लिसिटी. ते व्हॅन मधून प्रमोशन आजसुद्धा खेडोपाड्यात टिकून आहे आणि सपट आजसुद्धा लोकप्रिय आहे.

९० च्या दशकात परिवार चहात सुद्धा अनेक व्हरायटी येत गेल्या. कालानुसार आणि लोकांच्या मागणीनुसार हा ब्रँड वेळोवेळी बदलत गेला. टीव्हीवर सूर्रर्रर्र के पियोची जाहिरात आजही लोकांच्या डोक्यात ताजी आहे. रियल इस्टेट आणि रिटेलिंगमध्ये सपट उतरलं. हळूहळू फ्रॅन्चायजीमधून सपट चहा विक्री होऊ लागला.

सपटच्या तुलनेत परिवार चहा जास्त विक्री झाला आणि आजही लोकांना वाटत कि सपट आणि परिवार दोन वेगवेगळे ब्रँड आहेत. पण सपट आणि परिवार हे एकाच ब्रँडचे चहा आहेत. २०००च्या काळात सपट चहा नॅशनल मार्केटात विस्तारू लागला आणि सह्याद्री प्रीमियम डस्ट त्यांनी बाजारात आणली. 

नवीन प्रयोग म्हणून सपटने चाय ट्रेडीशन सुरु केलेलं. शेफ संजीव कपूरसोबत चाय टाइमचा ट्रेंड सपटने सुरु केलेला. आजसुद्धा सपट हा चहाचा सगळ्यात जुना ब्रँन्ड मानला जातो. जवळपास ११ दशकांहून अधिक काळ सपट लोकांपर्यंत आपली सेवा देत आहे. काळानुसार सपट ब्रँड बदलत गेला आणि कस्टमर डिलाईट यानुसार ते काम करत राहिले.

सध्या सपट भारतातून पुढे जाऊन उत्तर अमेरिकेतसुद्धा पोहचला आहे. आजसुद्धा कोटींमध्ये या ब्रॅण्डची उलाढाल आहे. लोकांमध्ये हा ब्रँड अजूनही लोकप्रिय आहे हीच या ब्रॅण्डची लोकप्रिय असण्याची पावती आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.