इतर क्रांतिकारक नेहमी म्हणायचे, “राजगुरू नेमबाजीसाठी ‘अर्जुन’ आणि झोपेसाठी ‘कुंभकर्ण’ आहेत..”

शिवराम हरी राजगुरू म्हणजे क्रांतिशिरोमणी. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अवघ्या तेविसाव्या वर्षी आपले सर्वस्व अर्पण करणारा अवलिया तरुण.. राजगुरूंच्या आयुष्यात घडून गेलेले अनेक प्रसंग अतिशय रोचक आहेत. त्यांच्या झोपेचे किस्से तर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या सवयीमुळे क्रांतिकारकांच्या जोखीमभऱ्या आयुष्यातही काही क्षण हास्याची हिरवळ उगवत असे. त्यातील काही किस्से आज आपण पाहूया.

एकदा भगतसिंह आणि राजगुरू काही कामानिमित्त मथुरेस गेले. काम आटोपून त्यांना आग्र्याला परत जायला रात्री उशिर झाला. रेल्वे स्थानकावर पोचल्यास समजले की आग्र्याला जाणारी गाडी ही रात्री दोन वाजता येणार होती. ते जेव्हा स्थानकावर पोचले तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. त्यातच दोन दिवस भगतसिंहांची दगदग झालेली, जागरण झालेलं.. त्यांना आराम करायचा होता पण राजगुरूंच्या झोपेची पूर्ण कल्पना असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची हिम्मत नव्हती. पण आता मात्र दुसरा पर्याय नव्हता. भगतसिंह म्हणाले,

“रघुनाथ, हे बघ. मला आराम करायचा आहे, जागरण करणे शक्य होणार नाही. जर तू पहाऱ्याची जबाबदारी घेतलीस तर मी थोडा वेळ झोप घेईल.” (रघुनाथ हे राजगुरूंचे संघटनेतील टोपणनाव होते.)

“हो हो, तू बिनधास्त झोप. मी काय बेजबाबदार आहे? तू झोप, मी तुला वेळेवर उठवेन.” राजगुरू.

त्यांचे हे उत्तर ऐकल्यावर भगतसिंहांनी राजगुरूंच्या अंगावर आपला ओव्हरकोट घातला आणि त्यांच्या कानात कुजबुजले,

“सावध रहा, ती वस्तू (रिव्हॉल्व्हर) खिशातच आहे. आणि मला दोन वाजता उठव.” असे म्हणत भगतसिंह गाढ निद्रेच्या अधीन झाले.

गोंधळाच्या आवाजाने काही तासांनी भगतसिंहांना जाग आली. तेव्हा घडाळ्याने एक टोल दिला. त्यांना वाटले एकच वाजले आहेत. बर झालं, लवकर जाग आली. पण तेव्हढ्यात घड्याळाने दुसरा टोल दिला, मग तिसरा आणि मग चौथा टोल देऊन घड्याळ शांत झाले. भगतसिंह गडबडीतच उठले. पाहतात तर काय, राजगुरू बाजूच्या बाकावर बिनधास्तपणे झोपलेले.. भगतसिंहांनी रागारागात बाकड्याला लाथ मारली. राजगुरू डोळे चोळत उठले आणि म्हणाले,

“काय झालं? तुझी शपथ मला काहीच माहीत नाही. तुला चिडायला काय झालं?”

आपल्या झोपेमुळे दोन वाजताची आग्र्याची गाडी हुकली याची त्यांना साधी जाणीवसुद्धा नव्हती. इकडे भगतसिंह रागाने धुसमूसत होते.

अजून एक किस्सा.. क्रांतिकारकांचे अनेक गुप्त अड्डे असत. त्याठिकाणी ते सुरक्षित राहत आणि सुरक्षेसाठी अनेक नियमसुद्धा त्यांनी घालून दिलेले होते. जसे की, आपल्या राहत्या ठिकाणाचा पत्ता साथीदारांशीवाय इतर कुणालाही सांगायचा नाही. किंवा बाहेर जायचे असल्यास कुणालातरी कल्पना दिल्याशिवाय तिथून जायचे नाही. आग्रा, लाहोर, दिल्ली अशा अनेक ठिकाणी या क्रांतिकारकांनी गुप्तरीतीने राहण्यासाठी घरे घेतली होती.

एकदा आग्र्याच्या घरामध्ये अचानक गोंधळ सुरू झाला. कारण राजगुरू कुठेच दिसत नव्हते. ना ते बाहेर गेल्याचे कुणी पाहिले, ना त्यांनी कुणाला तशी कल्पना दिली होती. आग्र्याच्या दोन्ही घरात राजगुरूंचा शोध घेतला पण त्यांचा थांगपत्ता लागेना. राजगुरू नेमके गेले कुठे, या चिंतेने सर्वच हैराण झाले.

शेवटी आझादांनी दोन्ही घरातील सामान बांधून घर रिकामे करण्याची सूचना दिली. कारण जर त्यांना पोलिसांनी पकडले असेल आणि जर चुकून त्यांनी सर्वांच्या राहण्याचे ठिकाण सांगून टाकले तर सर्वकाही क्षणधार्थ संपेल. हा राजगुरुंवर असलेला अविश्वास नव्हता, तर संघटनेच्या नियमाप्रमाणे करावयाची कृती होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेली उपाययोजना होती.

आझादांच्या आदेशानुसार सर्वांनी आपापले सामान बांधण्यास सुरुवात केली. भिंतीच्या एका कोपऱ्यात दोन खिले ठोकून एक तार बांधलेली. त्यावर सदाशिवराव मलकापूरकरांचे धोतर वाळत घातलेले होते.

त्यांनी घाईने आपले धोतर तारेवरून खेचले आणि पाहतात तर काय, भिंतीला टेकून उभ्या उभ्याच झोपलेले राजगुरु त्यांना दिसले. सदाशिवरावांनी लगेच आझाद आणि सर्व साथीदारांना बोलावून ते अद्भुत दृश्य दाखवले. आझादांनी सर्वांना गप्प केले आणि आपल्यासोबत टाळ्या वाजवण्यास सांगितले.. सर्वजण टाळ्या वाजवत जोरजोरात गाऊ लागले,

“भए प्रकट कृपाला, कुंभकरण अवतरला..”

त्या गोंधळाने राजगुरुची झोपमोड झाली.. सर्वजण मोठमोठ्याने हसू लागले. झोप मोडल्यामुळे काहीसे चिडून राजगुरू म्हणाले,

“मी एकांत पाहून येथे झोपलो होतो. मला त्रास देण्यासाठी तुम्ही येथेसुद्धा आलात?”

“तुम्ही जी काही झोपण्याची नवीन पद्धत शोधून काढली आहे, त्याबद्दल तुम्हाला बक्षीसच दिले पाहिजे..” विजयकुमार सिन्हा.

त्यावर राजगुरू म्हणाले,

“आता माझं सगळ्यात मोठ बक्षीस हेच असेल, की तुम्ही मला शांतपणे झोपू दिले पाहिजे.” त्यांच्या या उत्तरावर सगळे परत हसू लागले.

एकदा जयदेव कपूर, भगतसिंह आणि राजगुरू कानपूरवरून वाराणसीला जात होते. गाडी सुटण्यास पुष्कळ अवधी होता. त्यामुळे कानपूर येथे राहत असलेल्या हलधर वाजपेयी यांना भेटण्यासाठी जाण्याचा भगतसिंह आणि जयदेव कपूर यांचा विचार होता. त्यांनी राजगुरूंना सांगितले आणि रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या पुलावर वाट पाहण्यास सांगितले. हलधर बाजपेयींना भेटून भगतसिंह आणि जयदेव कपूर परत आले पण त्यांना राजगुरूंचा पत्ताच लागेना.

 संपूर्ण रेल्वे स्थानक पाहून झालं, रेल्वेला निघायला अजून वीस मिनिटे उशीर होता कदाचित ते रेल्वेमध्ये बसलेले असावेत म्हणून रेल्वे पाहिली. पण राजगुरूंचा पत्ता लागेना. 

शेवटी हताश होऊन भगतसिंह आणि जयदेव कपूर वाराणसीला निघून आले. कदाचित पोलिसांनी पकडले असावे त्यामुळे आता रेल्वे स्थानकावर थांबणे उचित नाही असा विचार त्यांनी केला. इकडे वाराणसीत पोचल्यावर दुसऱ्या दिवशी अचानक राजगुरू त्यांच्यासमोर प्रकटले. रागारागात त्यांनी भगतसिंहांवर ओरडायला सुरुवात केली,

“तुम्ही स्वार्थी आहात. मला विनातिकीत आणि पैश्याविना सोडून तुम्ही दोघे इकडे निघून आलात.”

भगतसिंह आश्चर्याने म्हणाले,

“तू होतास कुठे? आम्ही तुला तर सगळीकडे शोधले.” तेव्हा राजगुरु म्हणाले

” मी पुलावरच होतो. गाडी सुटायला तासभर अवधी होता म्हणून बाजूला झोपलेल्या भिकाऱ्याजवळचे पांघरून घेऊन झोपलो होतो.” आता मात्र भगतसिंहांनी डोक्याला हात मारून घेतला..

असे होते राजगुरू….

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.