१९ वर्षे कचरा गोळा केला आणि त्यातून उभं केलं देशातील सगळ्यात मोठं रॉक गार्डन.

जगामध्ये असेही लोक असतात ज्यांना दुनियेत काय चाललंय त्याचं त्यांना काहीही देणंघेणं नसतं, त्यांना एकदा त्यांच्या कामाचा नाद लागला कि ते पूर्ण झाल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही भले तिकडं दुनिया इकडची तिकडं होवो. चंदिगढला रॉक गार्डन हि ओळख मिळवून देणाऱ्या नेकचंद सैनी या गृहस्थाने असाच अचाट पराक्रम केला होता.

एकट्याच्या जीवावर त्यांनी कचऱ्याच्या खड्ड्यांना जगातील प्रेक्षणीय स्थळांमध्ये रूपांतर करणाऱ्या नेकचंद सैनी यांनी हे सगळं कसं साध्य केलं ते आपण जाणून घेणार आहोत. 

१५ डिसेंबर १९२४ साली शंकरगढ या कसब्यामध्ये त्यांचा जन्म झाला. आता हा विभाग पाकिस्तानमध्ये येतो. शेतीव्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. देशाची फाळणी झाल्यानंतर ते पंजाबमधल्या एका छोट्या शहरामध्ये राहू लागले. १९५१ साली त्यांना सरकारी रोड इन्स्पेक्टरची नोकरी लागली पण लवकरच त्यांची बदली चंदिगढ मध्ये झाली.

ज्यावेळी चंदिगढ शहर निर्माण होत होतं तेव्हा १९५१ साली  ते रोड इनस्पेक्टर म्हणून काम बघत होते. आपली ड्युटी संपल्यानंतर नेकचंद हे सायकल घेऊन जंगलांमध्ये हिंडायचे, जिथं जिथं बांधकाम चालू आहे तिथं तिथं जाऊन तिथला कचरा गोळा करून आणायचे. दुकानांमधील निकामी झालेल्या वस्तू आणायचे. या प्रकारातून त्यांनी चंदिगढ शहरातील त्याकाळची बरीच जंगलं साफ केली होती.

या कचऱ्यातील गोळा करून आणलेल्या वस्तुंना ते रंगरंगोटी करून नवीन आकार देण्याचा प्रयत्न करत असे. हे काम ते इतक्या सतर्कतेने करत होते कि त्याचा कुणालाही पत्ता लागू देत नव्हते, कारण त्यांना त्यांची नोकरी जाण्याची भीती होती.  पण तब्बल १९ वर्षानंतर सरकारला त्यांच्या या कामाबद्दल कळलं तेव्हा त्यांनी ४ एकरात आपली कलाकृती साकारली होती. 

जेव्हा सरकारला हे कळलं तेव्हा त्यांनी चार एकर जागेत तयार केलेल्या कलाकृती पाडायच्या ठरवलं. पण तोवर हे लोकांमध्ये इतकं प्रसिद्ध होतं कि लोकांनी सरकारचा कडाडून विरोध केला. बराच काळ हा वाद चालू राहिला शेवटी लँडस्केप ऍडवायझरी कमिटीने त्याच रूपांतर गार्डनमध्ये करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळचे चीफ ऍडमिनिस्टेटर डॉ. एम.एस.रंधावा यांनी याला रॉक गार्डन नाव दिलं.

पुढे हे गार्डन विस्तारून ४० एकरात बांधण्यात आलं आणि १९७६ साली त्याचं उदघाटन करण्यात आली. हे गार्डन तीन पद्धतीने बांधण्यात आलं, पहिल्यांदा लोकांपासून लपून या गार्डनचं काम करण्यात आलं, दुसऱ्या वेळी १९८३ साली काम पूर्ण झालं. या वेळी या गार्डेनमध्ये झरे, मिनी थिएटर, बाग अशा अनेक गोष्टी त्यात भरती झाल्या. काँक्रीट बांधकाम करून ५ हजार छोट्या मोठ्या मुर्त्या त्यात निर्माण करण्यात आल्या.

तिसऱ्या वेळी यात बरेच मोठे बदल झाले. यात एका बाजूला झोके, मत्स्यालय, ओपन थिएटर अशा अनेक गोष्टी यात आल्या. दररोज ५००० पर्यटक या गार्डनला भेट देतात. याच काळात नेकचंद सैनी यांनी चंदिगढमध्ये रस्ते सुद्धा बांधले. १९९३-९५च्या काळात त्यांनी केरळमधल्या पलक्कड मध्ये छोटं रॉक गार्डनसुद्धा तयार केलं.

कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय नेकचंद सैनी यांनी कला क्षेत्रातील एका वेगळ्याच प्रकारच्या फॉर्मची निर्मिती केली. आउटसाइडर्स आर्टला त्यांनी मुख्य प्रवाहात आणलं.

तुटलेल्या, फुटलेल्या वस्तू, कैक दिवसांचा कचरा यातून त्यांनी लोकांना आश्चर्यचकित करून सोडणारी कलाकृती निर्माण केली यासाठी त्यांना भारत सरकारकडून १९८४ साली पदमश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

वयाच्या ९० व्या वर्षी ११ जून २०१५ साली त्यांचं निधन झालं. आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून ते सांगून गेले कि टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी कशा तयार केल्या जाऊ शकतात. त्यांच्या कलाकृती या अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहेत.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.