विरोध किंवा समर्थन करण्याआधी रिफायनरी काय आहे? त्याचा फायदा होतो का? हे एकदा वाचा

भारताच्या वार्षिक व्यापारी मालाची निर्यात प्रथमच $४०० बिलियनवर पोहोचली आहे, ही बातमी तुम्ही वाचली तर असेल. पण भारतानं नक्की काय एक्स्पोर्ट केलं आहे हे तुम्ही बघितलंय का? तर विश्वास बसणार नाही पण यात  इंजिनेरींग वस्तुं आणि पेट्रोलियम पदार्थ यांचा वाटा जास्त आहे.

होय भारत जगातल्या टॉपच्या पेट्रोलियम पदार्थांच्या उत्पादकांपैकी एक आहे.

२०२० मध्ये तर भारताने $२५.३ बिलियनचं रिफाइंड पेट्रोलियम निर्यात केलं होतं. 

ज्यामुळे भारत जगातील ५ व्या क्रमांकाचा रिफाइन्ड पेट्रोलियम निर्यातक बनला होता.

 त्याच वर्षी, रिफाइंड पेट्रोलियम हे भारतातील पहिले सर्वाधिक निर्यात झालेले उत्पादन होते.आता भारत तर स्वतःह पेट्रोल आयात करतो मग निर्यातीत टॉप कसा? 

तर याचं उत्तर आहे,भारतात असणाऱ्या रिफायनरीमध्ये. आपल्या महाराष्ट्रातल्या प्रस्तावित नाणार  रिफायनरीला होणाऱ्या विरोधामुळं पण तुम्ही या रिफायनरींबद्दल ऐकून असाल. 

तर ही रिफायनरी नक्की काय भानगड आहे ते पहिलं पाहू.  

तर रिफायनरी म्हणजे साध्य भाषेत शुद्धीकरणाचे कारखाने. म्हणजे समजा पेट्रोलियम रिफायनरी असेल तर त्या फॅक्टरीमध्ये कच्च्या खनिज तेलाचे शुद्धीकरण केले जाते. या कारखान्यांमध्ये तेलाचे प्रोसेसिंग करून  गॅसोलीन/पेट्रोल, डिझेल, एलपीजी, रॉकेल,बिटुमेन आणि पेट्रोलियम कोक, नाफ्ता आणि इतर पेट्रोलियम पदार्थांचा समावेश होतो. आणि हेच पेट्रोलियम प्रोडक्ट भारत एक्स्पोर्ट करतो.

म्हणजे भारतातून डिझेल, पेट्रोल हे एक्स्पोर्ट केले जाते आणि हे डिझेल पेट्रोल आपल्याला मिळते त्यापेक्षाही कमी किंमतीत एक्स्पोर्ट केले जाते.

आणि याच पेट्रोलियम प्रोडक्टच्या निर्यातीत भारत जगातल्या टॉप देशांपैकी आहे.  भारतात जवळपास सरकारच्या आणि खाजगी मालकांच्या मिळून २३ रिफायनरी आहेत.

त्यापैकी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स पेट्रोकेमिकलची गुजरातमधील जामनगर येथील रिफायनरी ही जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी आहे. 

दररोज तब्बल ५,८०,००० बॅरलवर प्रक्रिया करण्याची या प्लांटची क्षमता आहे.आणि या जगातल्या या सगळ्यात मोठ्या रिफायनरी फॅसिलिटी पेक्षा जवळपास ७०% टक्के जास्त क्षमता आपल्या रत्नागिरीच्या नाणार रिफायनरीमध्ये असणार होती असं सांगण्यात येत होतं. टोटल ३ लाख करोड रुपयांचा हा प्रोजेक्ट असेल अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी २०१६ मध्ये दिली होती.

आता रिफायनरी काय आहे, त्याची गरज काय आहे याची आपण माहिती घेतली पण याला विरोधही होत आहे. 

विशेषतः रत्नागिरीचे स्थानिक या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध करत आहे. १५,००० एकर एवढ्या जागेवर नाणार प्रकल्प प्रस्तावित होता. त्यामुळे प्रकल्पाच्या आजूबाजूच्या आंब्याच्या, काजूच्या बाग जमीनदोस्त होतील, समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांच्या  मासेमारी व्यवसायावर याचे दूरगामी परिणाम होतील.

तर मग तिथल्या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार असेल तर या प्रकल्पामुळे तो सोडवला जाईल का ?

याच आठवड्यात पार पडलेल्या लोकसत्ताच्या एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले होते की

 “नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचं योगदान आणि रोजगार देण्याची क्षमता आहे.”. 

आता मंत्री महोदयांनी स्वप्न तर मोठं दाखवलं मात्र आकडा काय दिला नाही.

तर मग आपल्याला यावं लागतं सध्या ज्या रिफायनरीज आहेत त्यामध्ये कशा नोकऱ्या मिळाल्या त्यामधून.

जेव्हा बेखटेल  (bechtel) या कंपनीने जामनगरच्या प्लांटच्या बांधकामाचे काम केले होते तेव्हा त्यांनी बांधकामासाठी ७०,००० कामगारांची गरज लागली होती अशी कंपनीची वेबसाइट सांगते. 

इकॉनॉमिक टाइम्सच्या २००८च्या एक वृत्तानुसार जेव्हा बांधकामात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्किल्ड कारागिरांची गरज होती तेव्हा प्लम्बर, वेल्डर, कार्पेन्टर यांचं शॉर्टेज होता.

मग रिलायन्सने तेव्हा Crafts Training Centre (CTC) च्या माध्यमातून कौशल्य विकासाचा कार्यक्रम हाती घेतला जेणेकरून या  स्किल्ड  मॅनपॉवरचा उपयोग भविष्यात देखील करून घेता येइल. त्याच रिपोर्टनुसार ज्या ज्या कारागिरांनी तेव्हा ट्रेनींग घेतलं त्यांना पुढे रोजगाराच्या चांगल्या संधी उलब्ध झाल्या.

पण मग बांधकाम झाल्यानंतर रिफायनरीमध्ये किती लोकं काम करतात याचा मात्र आकडा मिळत नाही. रिलायन्सच्या जामनगर प्लांटच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये २५००० कामगार आणि अधिकारी राहतात असं सांगण्यात येतं पण त्याचा कन्फर्म असा सोर्स नाहीये.

आता हे झालं प्रत्यक्ष रोजगाराचं. आता एवढे मोठे प्रकल्प आल्यानंतर तिथल्या लोकल जनतेला कसा फायदा होतो.

तर पुन्हा यासाठी पण आपल्याला सध्या ज्या रिफायनरी अस्तित्वात आहेत त्यांची माहिती घ्यावी लागेल.

सुमना चौधरी, शोवन रे या संशोधकांनी एस्सार कंपनीच्या  गुजरातमधील वाडीनार रिफायनरीच्या सामाजिक आणि आर्थिक प्रभावाचे त्यांच्या रिसर्च पेपरमध्ये विश्लेषण केले आहे त्यातून आपल्याला रिफायनरीचा लोकल जीवनावर होणार प्रभाव कळतो. 

त्यांच्या पेपरनुसार वाडिनरी रिफायनरीमच्या शेजारील १२ गावांमध्ये  मोठ्या प्रमाणावर आर्थिक  विकास झाल्याचे पाहायला मिळते. वाडीनार रिफायनरीची स्थापना झाल्यानंतर या आजूबाजूंच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाले आहे.  रिफायनरी उभारल्यानंतर एकूण ९२५नवीन घरे  उभारण्यात आल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं. रिफायनरी येणाच्या आधी या गावांत घरांच्या बांधकामावर होणारा खर्च होता फक्त सहा कोटी आणि जो रिफायनरी आल्यानंतर ९२ कोटींच्या घरात गेला. आणि यामुळे ९ हजारपेक्षा जास्त लोकांना रॊजगार देखील मिळाल्याचं म्हटलं आहे. 

रिफायनरीच्या स्थापनेमुळे गावांमध्ये वाहने, ट्रेलर्स, जेसीबीसह इतर पायाभूत सुविधांमध्येही वाढ झाली . 

याआधी गावांमध्ये अशी २०८५ वाहने, जेसीबी आणि ट्रेलर खरेदी करण्यात आले. ज्यामध्ये  ३१ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आणि यामुळे ९० लोकांना रॊजगार देखील मिळाला. त्याआधी फक्त २१५ लोकांना अशाप्रकारचा रोजगार मिळत होता.

रिफायनरीच्या स्थापनेनंतर  या गावांत १२ दवाखाने आणि मेडिकल  सुरू करण्यात आली याआधी अशी केवळ ४ दवाखाने आणि मेडिकल होती.

 रिफायनरी आल्यांनतर गावात शिक्षणाच्या सोयींमध्ये  पण वाढ झाली. गावात रिफायनरी आल्यानंतर ४४ शाळा, स्टेशनरी दुकाने आणि शिकवणी केंद्रे चालू झाली जे रिफायनरी येणाच्या आधी फक्त १३ होती. त्यांनतर गावात पोस्ट ऑफिस, बँका, चांगले रस्ते या सुविधा देखील आल्याचं या पेपरमध्ये सांगण्यात आलं. म्हणजे एकंदरीत सुधारणा झाली.

मात्र कोकणात पण असंच होईल का? ज्यांच्या आंब्याच्या, नारळाच्या बाग जाणार आहेत त्यांच्या उत्पन्नाची गॅरंटी राहील का? निसर्गरम्य कोकनात फक्त रिफायनरी आणूनच विकास होईल का ?याचाही नीट अभ्यास झाला पाहिजे.

अजून एक प्रश्न कोकणात विरोध होतंय तर इकडं आमच्या मराठवाड्यात, विदर्भात आणा ना तो प्रोजेक्ट या प्रश्नाबद्दल?

तर भारतातल्या जास्तीत जास्त रिफायनरी या समुद्र किनारी आहेत. यामागही कारणं आहेत. भारतात कच्चं खनिज तेल हे समुद्रावाटे येतं. त्यानंतर प्रक्रिया करून त्याचं एक्स्पोर्ट देखील जहाजांद्वारे होतं. त्यामुळे समुद्रकिनारी असेल तर मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक कॉस्ट वाचते. 

त्याचबरोबर कच्च्या तेलाचा  एक बॅरल शुद्ध करण्यासाठी सरासरी ४६८ गॅलन पाणी लागते. 

एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी हे समुद्रकिनारीच उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे असे प्रकल्प जगभरात सगळीकडेच समुद्रकिनारी असतात.  मराठवाड्यात किंवा विदर्भात असे प्रकल्पनेण खर्चिक काम आहे. भारतात पूर्वी काही रिफायनरी लँडलॉक राज्यात होत्या मात्र आता तसं केलं जात नाही.

आता आपण जवळपास आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेतली आहेत. बाकी तुम्हाला आणखी काय प्रश्न असतील तर आम्हला खाली कमेंट करून जरूर सांगा.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

   

Leave A Reply

Your email address will not be published.